Monday, 21 December 2015

सामान्य मराठी माणूस आणि फोर्ड मोटार


सामान्य,प्रामाणिक,पापभीरू,चाकरमान्या मराठी माणूस म्हणून मी शिक्षक श्री.संजय जाधव यांना भेटत असतो. त्यांना भेटल्यानंतर आपल्यातील पापभिरूतेची पातळी आणखी वाढवून घेण्याचा हेतू असतो.

जिल्हा परिषदेच्या शाळेत लहान मुलांना शिकवण्याचं काम करणारे श्री.जाधव सर काही वर्षांपूर्वी इमारतींच्या बांधकामावर मजूर म्हणून कामाला जात असत. फाटलेल्या पॅंटवर मिळेल ते काम करीत; पण ते शिकत राहिले.

शिक्षक बनल्यावरही सरांच्या हातात छडी कधी आली नाही. छडीऐवजी सरांच्या खिशात चॉकलेट असतात. सरांचं पर्यावरणावर, पशुपक्ष्यांवर प्रेम आहे. शाळेत एखादा जखमी पक्षी सापडला की त्यांच्या उपचारासाठी सर काम सोडून शहराकडे धाव घेतात.

एकेकाळी फाटकी चप्पल, तुटकी सायकल वापरणारे जाधवसर कधी-कधी शिकवतांना मुलांना सांगत की ‘हेनरी फोर्ड यांनी मोटारीचा शोध 100 वर्षांपूर्वी लावला होता.’

फोर्ड मोटारीची कहाणी सांगतांना ती आपल्याही दारात असावी, असं स्वप्न सरांना पाहिलं. आयुष्यभर एसटीतून फिरणा-या वयोवृध्द आईला फोर्ड मोटारीत बसवावं, असं सरांना वाटून राही.

आनंदाची बाब म्हणजे गेल्या महिन्यात सरांनी कर्ज काढून फोर्ड मोटार विकत घेतली. शोरूममध्ये मलाही नेले होते. सरांच्या डोळ्यात कमालीचा आनंद होता. मी स्वतः दार उघडून सरांना मोटारीत बसवले. सरांना अजुनही गाडी चालवता येत नाही. मात्र, एक स्वप्नपूर्ती झाली आहे.

आयुष्याच्या रंगमंचावर सरांनी अनेक भूमिका प्रामाणिकपणे केल्या. त्यांनी गवंडयाच्या हाताखाली बिगा-याचे काम केले, त्यांनी रस्त्यावर बॉलपेन विकले, त्यांनी दारोदार फिरून ऊसळ-मटकी विकली,सरांनी पिग्मी एजंटचं काम केलं. ते सुताराच्या हाताखाली रंधा मारत होते. लहान मुलांसाठी ते पोंगे देखील विकत होते.

एका मराठी मजुराच्या हाती खडु-फळा येतो आणि नंतर तो फोर्ड मोटारीचा मालकही बनतो. हल्ली मोटारीचे मालक कोणीही होतात. मात्र, जाधव सरांसारखा प्रामाणिक-कष्टाळू-दयाळू मालक दुर्मिळच...!

रक्त आटतं...म्हणून दुधाला घट्ट साय येते


उन-वारा-थंडी-पावसात 365 दिवस दुध वाटणारे शेतकरी श्री.दिलीप लक्ष्मण शिंदे हे श्रमशक्तीचं एक आदर्श रुप आहे.
नाशिकच्या गोदाकाठी त्यांची शेती-गोठा आहे. मी त्यांच्या गोठयाचे दर्शन घेऊन आलो. त्यामुळे मन प्रसन्न झाले आहे.

गोठयातील कामे करण्यासाठी श्री.शिंदे हे रोज सकाळी चार वाजताच झोपेतून उठतात. शेण-गोमूत्र काढून वैरण टाकून ते सकाळी साडेपाचला दुध काढण्यास सुरूवात करतात. बारा म्हशींचे दुध काढण्यासाठी दीड-दोन तास लागतात.

80 लिटर दूध काढल्यानंतर श्री.शिंदे सकाळी मोटरसायकलवर शहराकडे निघतात. 15 किलोमीटरच्या वर्तुळात 70 घरे फिरून दुध वाटल्यानंतर ते घरी परतल्यानंतर सकाळी 9 ते 11 पुन्हा गोठयाची सफाई,जनावरांना धुणे, कडबा-ढेप तयार करून जनावरांना देणे अशी कामे करावी लागतात.

पहाटे चार वाजता उठलेला हा माणूस दुपारी बारा वाजता कामातून थोडासा मोकळा होतो. जेवण करून पुन्हा द्राक्षबागेसहीत हळद,आले,कोथिंबिरीची शेतीची कामे ते करतात.

दुपारनंतर पुन्हा गोठयात येता. भरपूर कामे करून संध्याकाळी पुन्हा दुध काढून रात्री परत लोकांच्या घरी फिरून दुध वाटतात. श्री.शिंदे रोज पहाटे चार ते रात्री दहा वाजेपर्यंत शेती आणि गोठयाची कामे असे वर्षानुवर्षे करीत आहेत.

‘मी कधीही कोणत्याही म्हशीला इंजेक्शन टोचून दूध काढले नाही. कसायाला कधीही जनावर विकले नाही. दुधात भेसळ केली नाही. ग्राहकाशी उद्धट बोललो नाही.’ असे ते सांगतात.

हा माणूस फक्त कष्टाळूच नाही तर नीती-सचोटी-प्रामाणिकपणावर श्रध्दा ठेवणारा आहे. आई-वडीलांना ते देव मानतात.
दुधाच्या व्यवसायामुळे ते सभा-समारंभ-सिनेमा-नाटक-जत्रा-यात्रा-पिकनिक असे कुठेही जात नाहीत.

घमेल्यात शेण गोळा करता करता श्री.शिंदे म्हणाले, “साहेब...मी कष्ट करतो..रक्त आटवतो..म्हणून माझ्या दुधाला घट्ट साय येते..!

कचराकुंडीतील पेनची कहाणी



मी साध्या शाळेत शिकत होतो. घरची गरिबी होती. शाळेत गुरूजींनी सांगितले की शाईचा पेन वापरल्यास अक्षर चांगले येते. वर्गात चांगली परिस्थिती असलेल्या मुलांनी नंतर सोनेरी टोपणाचे काळ्या रंगाचे शाईचे पेन आणले होते.

माझ्याकडे साध्या कांडीचा पेन होता. शाईचा पेन घरातून मिळण्याची शक्यता नव्हती. कारण तो वडिलांकडेही नव्हता.
माझा मित्र राजूने मग युक्ती सांगितली. तो म्हणाला की, ‘शाईचा पेन मिळू शकतो पण फिरावे लागेल.’ मी होकार दिला.
त्याने दुस-याच दिवशी मला गावाकडून शहराकडे नेले. आम्ही पायी गेलो. त्यानंतर एका सरकारी कॉलनीच्या पाठीमागे नेले. कॉलनी मोठी होती. तेथे सात-आठ कचराकुंडया होत्या.

राजू म्हणाला की, ‘आता तुला तुझा पेन फुकट मिळेल. या कचराकुंडया आपण दोघांनी चाळायच्या. इकडं गावाकडची माणसं येत नाही. कोणी कोणाच्या ओळखीचं नाही. तू पेन शोध- मी माझ्या वस्तू शोधतो.’

कचराकुंडया चाळण्यात राजू पटाईत होता. तो प्लास्टिक,तारा,लोखंड,काचेच्या बाटल्या अशा वस्तू बाजुला काढीत असे. त्याच त्याच्या वस्तू होत्या. मला तुटलेले पेन,संपलेल्या रिफिल सापडत असत. मात्र, माझ्या डोळ्यासमोर सोनेरी टोपणाचा काळ्या रंगाचा शाईचा पेन होता.

पुढे मग राजूने काही मुला-मुलींच्या ओळखी करून दिल्या. ते झोपडपट्टीतून येत असत. आम्ही रविवारी मात्र दिवसभर कचराकुंडया चाळत असू. राजू त्या वस्तू विकून आम्हाला खाऊ देखील द्यायचा.

कचराकुंडयांची कामे उरकल्यावर आम्ही पाटामध्ये अंघोळीला जात असू. मला पोहता येऊ लागले. केवळ पेनमुळे मी कचराकुंडया चाळायला येतो, असे राजूच्या लक्षात आले होते.

अनेक महिन्यानंतर मला माझ्या स्वप्नातला पेन कचराकुंडीतच सापडला. मी आनंदाने उडालो. मी पेन वडिलांनाही दाखवला. नवाकोरा पेन सापडल्यानं मी राजूची साथ सोडली. त्यानेही मला नंतर कधी विचारले नाही.

पुढे मी सातवीला गेल्यानंतर झोपडपट्टीतील ती कचराकुंडी चाळणारी मुले पाटावर भेटली. ती मुले म्हणाले की, ‘राजू कुठेतरी निघून गेला आहे. कुठे गेला ते माहिती नाही. पण, तुला कचराकुंडीवर सापडलेला पेन राजूनेच नाशिकच्या दुकानातून विकत आणला होता. तो आदल्यादिवशी त्याने कुंडीत टाकला होता.’

आज कुठेही कचराकुंडी दिसली की मला राजू आठवतो आणि पेन देखील..!

कळसुबाईच्या भेटीला औदुंबर गेला..!


रुदन माझा मोठा मुलगा आहे. तो आठवीत शिकतो. शिक्षणाच्या बाततीत मी त्याच्यावर फारसा दबाव आणत नाही. त्याने अभ्यास सांभाळून स्वच्छंदी जगावे, असे मला वाटत असते. तसे जगण्याचा त्याचाही प्रयत्न असतो.

रुदनने यंदा अनोख्या पध्दतीने ‘जागतिक पर्वतदिन’ साजरा केला. त्याने ‘वर्ल्ड माऊंटेन डे’चे निमित्त साधून कळसुबाईवर वृक्षारोपण केले.

समुद्रसपाटीपासून 1646 मीटर उंची असलेले कळसुबाई म्हणजे महाराष्ट्राचे एव्हरेस्ट. एकेकाळी दाट वनराई आणि वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या कळसुबाई पर्वताची पर्यटकांकडून अवहेलना होत आहे.

खरे तर निसर्गाचे दूत म्हणून पर्वत उभे आहेत. त्यावरील जैवसंपदेचे रक्षण करण्यासाठी मानवाने पुढाकार घेण्यासाठी युनोस्कोने ‘वर्ल्ड माऊंटेन डे’ घोषित केला आहे. मात्र, ‘व्हॅलेंटाईन डे’च्या जमान्यात भारतात ‘वर्ल्ड माऊंटेन डे’कडे फारसे लक्ष दिले जात नाही.

नाशिकच्या नर्सरीमधून खास औदुंबराचे रोप रुदनने घेतले आणि पाण्याची बाटली आणि रोपासहीत तो कळसुबाई पर्वत चढून गेला. पर्वतावर असलेल्या एका झ-याच्या बाजूला त्याने खड्डा खोदून औदुंबराचे मनोभावे रोपण केले.

‘कळसुबाईवर खास औदुंबराचीच अजून काही झाडे मी लावणार आहे. औदुंबर लावण्यामागे माझा एक हेतू असा की त्यापासून पर्वतावरील माकडांना ऊंबर खाण्यास मिळतील. या पर्वतावरील फळझाडे तोडली जात असल्यामुळे माकडे उपाशी रहातात. त्यामुळे मी हा उपक्रम करतो आहे,’ असे रुदन सांगतो.

निसर्गाशी एकरूप झालेल्या मुलाच्या या उपक्रमाचा आमच्या कुटुंबाला आनंद आणि अभिमान आहे. अगदी दहावी-बारावीला बोर्डात आल्यासारखा..!

शरद जोशी नावाचा क्रांतिवीर


जगातील सर्वात मोठया कृषिप्रधान देशात असंघटित, शोषित शेतक-यांची शास्त्रशुध्द तत्वांवर विराट चळवळ उभी करणारे कृषिनायक शरद जोशी काळाच्या पडद्या आड गेले आहेत.

आयपीएस झालेला उच्चविद्याविभूषित असलेल्या या तरूणाने अक्षरशः दुस-या स्वातंत्र्ययुध्दाचा आनंद मिळवला आहे. घरादाराची राखरांगोळी करीत जोशी सरांनी शेतक-यांसाठीच देशभक्तासारखा लढा दिला. हा माणूस शेतक-यांसाठीच जगला आणि त्यांच्यासाठीच मृत्यू पावला.

जोशी सर इतर शेतकरी नेत्यांसारखे अभिनेते नव्हते. शेतक-यांच्या नावाखाली या देशात गेल्या अनेक वर्षांपासून अनेक भागात हजारो शेतकरी नेते जन्माला आले आणि स्वतः मोठे होवून, सत्ता भोगून निघून गेले. जोशी सरांनी शेतक-यांना वेळोवेळी जागतिक अर्थनीती आणि आधुनिक शेतीच्या बदलत्या प्रवाहांची माहिती करून देत शास्त्रसुध्द सिध्दांत दिले.

देशात शेतकरी,शेतमजूर,कामगार,कष्टकरी यांच्या चळवळी या जात,धर्म,प्रांत,पैसा,सत्तेभोवतीच उभ्या रहात असतांना जोशी सरांनी कृषीप्रधान भारतात शेतक-यांसाठी स्वातंत्र्य-समतेच्या तत्वाला अधिष्ठान देणा-या चळवळी उभारल्या. सरांच्या सभा लाखोच्या होत. मुंग्यांसारखे शेतकरी जमत. नजर टाकावी तिकडे माणसेच-माणसे असत. दिल्लीश्वर हादरून जात. असा हा एकटयाचा करिष्मा होता.

दोन-दोन, तीन-तीन लाख लोकांचा सभा घेणारा हा नायक सत्तेचा भुकेला निघाला नाही. त्याने कधी सत्ताधीशांची स्वतःची पिढीही तयार केली नाही. तो शेतक-यांसाठी शेतक-यांच्याच भाकरीवर जगला आणि धनदौलती ऐवजी नाव कमावून चालता झाला.

भारतात पहिली कृषिक्रांती झाल्याचे काही जण सांगत असतात. तर काही जण दुसरी क्रांती झाल्याचे सांगतात. जगातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या भारतात खरोखर कृषीक्रांती झाली की नाही हे माहित नाही. मात्र, शरद जोशी नावाचा एक सच्चा क्रांतीवीर निघून गेला आहे.

लिंबूसरबत विकता-विकता ज्ञानाची ज्योत तेवत आहे


महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचे कळसुबाई शिखर म्हणजे एक आश्चर्य. मात्र, तेथे दुसरे एक दुर्लक्षित आश्चर्य आहे. ती म्हणजे कु.ज्योती काळू खाडे ही विद्यार्थीनी.
आदिवासी समाजाची द-याडोंगरा वाढणारी ज्योती कळसुबाई पर्वतावर लहाणपणापासून गाईडचं काम करीत असे. पर्वतावर ती लिंबू सरबत विकत असे. लहान असूनही अवघड शिखर ती पर्यटकांबरोबर चढून जाई. शाळेला सुटी असल्यास ती शिखरावर दोनदा जात असे. त्यातून मिळणारे 100-200 रुपये ती आई-वडीलांना देत असे.

ज्योतीविषयी यापूर्वी मी लेख लिहिला होता. कळसुबाईच्या भेटीत मला अलिकडे ज्योती व तिचे वडील पुन्हा भेटले. ते म्हणाले, ‘लिंबूसरबत विकता-विकता माझी ज्योती आता अकरावीला गेली आहे. गाईडचं काम मात्र मी थांबवायला लावलं. एकटी दुकटी मुलगी डोंगरावर पाठवणं आता मला बरं वाटत नाही.’

ज्योतीचे वडील म्हणतात, ‘मी कष्ट करतो. ज्योती ते बघत होती. तिने काम करावं असं मी तिला कधीच सांगितलं नव्हतं आणि आजही सांगत नाही. मात्र, तिची समज मोठी आहे. या डोंगरकाठी राहून वादळवा-यातही ज्योतीने शाळा सोडली नाही.’

मी ज्योतीला पुढच्या शिक्षणाचं विचारलं. ती म्हणाली,’ चहा आणि लिंबूसरबत विकता विकताच मी बारावी पूर्ण करणार आहे. कुटुंबाला मदत करण्यात मला आनंद मिळतो.’

शिक्षणासाठी पैसे थोडे अजून मिळावेत म्हणून ज्योतीने सरबताबरोबरच चहा विकण्यास सुरूवात केली आहे.

बोलता-बोलता ज्योतीने भेगाळलेल्या हाताने थंडगार लिंबूसरबताचा पेला पुढे केला. वादळवा-यात सतत तेवत असलेली ही विद्येची ज्योत एक दिवस कळसुबाईच्या पर्वतरांगामधील एक दीपस्तंभ होणार आहे.

Monday, 10 August 2015

मानवतेची उपासना करणा-या निसर्गप्रेमी डॉ.सुनितीबाई


“आपल्या वसुंधरेला-पृथ्वीला सर्व बाजूने ओरबडण्याचे,लुटण्याचे सुरू असलेले काम आणि जगातील वाढते प्रदुषण ही या ग्रहावरील आजची सर्वात मोठी आव्हाने आहेत,” हे उदगार आहेत डॉ.सुनितीबाईंचे. त्या मानवतेच्या पुजारीच होत्या.

1986 मध्ये शासकीय रूग्णालयात दाखल झालेल्या 6 महिलांच्या रक्ताची तपासणी डॉ.सुनितीबाईंनी केली. या महिलांना एचआयव्ही असल्याचे त्यांनी सिध्द केले. त्यामुळे भारतातील पहिला एडसग्रस्त रूग्ण आणि ही समस्या अधिकृतपणे देशासमोर आली. त्यांनी एडसग्रस्त महिलांच्या सेवेला आयुष्य वाहून घेतलं होतं.

डॉक्टर सुनितीबाई सोलोमन यांच्या सामाजिक त्यागाला तोड नाही. तामिळनाडूत एक साधी मायक्रोबॉयोलॉजिस्ट म्हणून त्यांनी संशोधन-सेवा सुरू केली होती.

“भारतात 30 वर्ष काम करूनही एचआयव्हीविरोधी लस सापडली नाही. हे दुर्देव आहे,” असे त्या म्हणत असत. संशोधनापेक्षाही त्यांनी एक धक्कादायक निष्कर्ष सांगितला तो असाः एचआयव्हीपेक्षाही रूग्णाचा बळी जातो तो त्या आजाराचे मानसिक शल्य सतत टोचण्याने व रूग्णाला वाळीत टाकण्याच्या प्रकाराने..!

डॉ.सुनितीबाई म्हणत असत की,” पुढील 10 वर्षात नव्या आजारांची समस्या असेल. मात्र, 25 वर्षांनंतरची समस्या ही अन्न, नष्ट होणारी जंगलं-वनसंपदा आणि पर्यावरणाची असेल. आणि 50 वर्षानंतर तर जगात पाण्यासाठी युध्द होतील.”

“मनात शुध्द हेतु ठेवून गरजूंना मदत करणं हे माझ्या आयुष्यातील आनंदाचं गुपित आहे,” असेही त्या सांगत.

डॉ.सुनितीबाई सारख्या किती तरी महान स्त्रिया भारतात आहेत. दुर्देवाने त्यांची ओळख देशभर मृत्युनंतर होत असते. या महिलांपासून “भारतरत्न” किंवा “पदमश्री-पद्मविभुषण” असे किताब देखील लांब असतात.

फाशीः एक किळसवाणी परंपरा


एका माणसाने दुस-या माणसाचा किंवा मानवी समुहाचा हेतुपूर्वक जीव घेण्याचा प्रकार किळसवाणा आहे.
निसर्गात माणूस सोडला तर कोणताही प्राणी हेतुतः आणि ते देखील जीव जाईपर्यंत समुहाची हत्या करीत नाही. अगदी वाघ,सिंह देखील झुंडीने आले आणि 10-10 हरणांना मारून निघून गेले, असे दिसत नाही.

मानवी इतिहासात मात्र जगाच्या
सर्व संस्कृतीत माणसांकडून माणसांच्या हत्या होत आलेल्या आहेत. पृथ्वीवरील किंवा पृथ्वीबाहेरील दिव्य शक्तींसाठी माणसाचा जीव माणसाकडून घेतला जात होता. ते समाज असंस्कृत,रानटी,तर्क-विचार-बुध्दी समृध्द नव्हते. मात्र, आधुनिक युग सुरू झाले तरी माणसाने माणसाला मारणे कायदेशीररित्या सुरू आहे.

अमानवी कृत्य करणा-या माणसाला कायद्याचा आधार घेवून पुन्हा मारावे म्हणजे हिंसेला हिंसेने उत्तर देण्याचे तत्वज्ञान आहे. या तत्वातून हिंसा कधीही संपत नाही. त्यावर मधला उपाय म्हणजे अशा अमानवी व्यक्तींना मानवी समुहापासून आयुष्याच्या अंतापर्यंत बंदीखान्यात ठेवणे.

जगात किती तर देश आता फाशीच्या संकल्पनेपासून बाजूला जात आहेत. माणूस सुसंस्कृत आणि मानवतावादी होत असल्याचे ते लक्षण आहे. जीव घेणे हे मानवी ध्येय कधीही असू शकत नाही. बुध्दीजिवी आणि सुसंस्कृत मानवी समुहाचे तर कधीच नाही.

सुखी शेतक-याची कथा


काही शेतकरी अपार कष्ट करतात. त्यांच्या जिद्दीला आणि घामाला सलाम करावासा वाटतो. अहमदनगर सारख्या अवर्षण भागात निवृत्ती देवकर नावाचा असाच एक शेतकरी रहातो.

2007 सालापर्यंत दोन वेळच्या जेवणाची भ्रांत निवृत्तीरावांना होती. भाऊ ज्ञानेश्वरला घेत निवृत्तीरावांनी पाणीटंचाईवर तोडगा शोधला. कर्ज घेण्याचं ठरवलं.

कष्ट आणि तांत्रिकदृष्ट्या शेती केल्याशिवाय तरणोपाय नाही, असे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पाण्यासाठी सव्वा कोटी लिटर क्षमतेचे शेततळे उभारले. 10 लाखाचे कर्ज काढून डाळिंबबाग आणि झेंडुशेती केली.

तीन वर्षांत त्यांनी कर्ज फेडले. आता हाती पैसा आहे. मनगटात बळ आहे. कष्ट करण्याची वृत्ती वाढली आहे.
निवृत्तीराव मला म्हणाले, “शेतीत भरपूर लूट असते. पण लढावं लागतं. आता मी सुखी आहे.”

या निवृत्तीरावांचं शिक्षण आहे इयत्ता आठवी पास..!

कॉस्मोपॉलिटन संस्कृतीची झाकलेली दुसरी बाजू



महाराष्ट्राच्या 250 शहरांमध्ये अजूनही पावणेदोन लाख घरांमध्ये अशी शौचालये आहेत की ती स्वच्छ करण्यासाठी कामगारांचा वापर करावा लागतो. हाताने मानवी मैला वाहून आपला उदरनिर्वाह करणारे कामगार आणि अशा प्रथा चालू ठेवणारी आपली प्रजा म्हणजे आपल्या सुशिक्षित संस्कृतीला काळिमा फासणारी बाब म्हणावी लागेल.


जगण्यासाठी गरीब माणूस काहीही करतो आणि आपल्याला हवे तसे जगण्यासाठी काहीजण माणुसकीही गहाण टाकतात, याचे उदाहरण म्हणजे आजही हाताने मैला वाहण्याची चालू असलेली प्रथा.


शहरे वाढलीत पण स्वच्छतेचे महत्व अजूनही पटलेले नाही. अस्वच्छ परिसर हा आपल्याला माणुसकीला लागलेला डाग वाटत नाही. स्मार्टसिटी संकल्पना आली पण गावच्या,शहरातील टॉयलेटस् अजून स्वच्छ दिसत नाहीत.


रस्त्यात पडलेली घाण, कचरा फेकणारी माणसं, थुंकणारी सुशिक्षित किंवा अशिक्षित व्यक्ती पाहून हे चालायचंचअसं सांगून लोक आपआपली काम करतात. त्यामुळे राज्यकर्तेही फारसे लक्ष देत नाहीत. नोकरशाही देखील मग जशी प्रजा-तसा राजा आणि तसेच आपण, असे सांगत पुढे सरकत असते.


आपण कॉस्मोपॉलिटन होत असलो तरी स्वच्छता,जात,धर्म,प्रांत,बंधुत्वाच्या संस्कृतीत कुठे कुठे मागास राहिलो आहोत. शहरीकरणाच्या धुंदीत असा मागासलेपणा दिसत नाही आणि दिसला तरी तो जाणवत नाही.


विकास आणि सुसंस्कृत माणूस तशी समाजरचना याबाबतीत जपानसारखे देश कितीतरी आदर्शवत आहेत. पण, आपल्याला दुस-याला चांगले म्हटलेलेही चालत नाही. कारण नकळत वैचारिक अस्वच्छतेचाही पुरस्कार आपण बहुमताने, घट्टपणे करतो आहोत.  


आईची मैत्रिण



आयुष्यात सर्वात जास्त आपल्याशी हितगुज साधते ती आई. तिच्या बोलण्यातून जग कळत असतं. मुलं मोठी झाल्यावर आईशी कमी बोलतात. जगण्याचं वेळापत्रक असं बनतं-बनवतात की त्यात मुलगा आपल्या आईला फार वेळ देत नाही. मात्र, मी आईशी ठरवून बोलत असतो. तिच्या मैत्रिणीशी देखील गप्पा मारत असतो.


आईला घेऊन काल तिच्या मैत्रिणीकडे गेलो होतो. माझी आई 71 वर्षाची तर तिची मैत्रिण 75 वर्षांची आहे. कपाळावर लालभडक कुंकु लावणारी ही मैत्रिण गोदावरी नदी काठी एका झोपडीत रहात होती. काही दिवसांपूर्वीच तिला मायबाप सरकारनं घर दिलं आहे.


आईला पाहून मैत्रिण खुश झाली. आईसाठी तिने दहा रुपयाची गोडीशेव घेऊन ठेवली होती. दोघींच्या मग गप्पा झाल्या. आईची मैत्रिण काही महिन्यांपूर्वी पाय घसरून पडलेली. तिच्या जवळ डॉक्टरच्या गोळ्यांचे पाकिट दिसले. ते पाकिट या आजारी मैत्रिणीचे नसून बाबांचे होते. बाबा शेजारच्या खाटेवर बसलेले होते.


80 वर्षांच्या पतीची या वयात काळजी घेणारी 75 वर्षांची ही आजी म्हणजे माझ्या आईची मैत्रिण. गेल्या 50 वर्षांपासून या दोघींची ही मैत्री घनदाट जंगलातल्या झ-यातील नितळ-गोड पाण्यासारखी शुध्दपणे टिकून आहे. 

Monday, 22 June 2015

उडत्या लावण्यावर आता सरकारी मोहोर


फुलपाखरांच्या प्रेमान न पडलेला माणूस सापडणार नाही. बालगोपाळांपासून ते आजी-आजोबांना देखील फुलपाखरांकडे पाहून मिळणारा आनंद इतर कोणत्याही वस्तूमधून न मिळणारा. आता फुलपाखरांना स्वतःची ओळख या महाराष्ट्रात मिळणार आहे.

 ब्ल्यू मॉरमॉन ((Papilio polymnestor)  जातीच्या मोहक फुलपाखराने आता महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू म्हणून मान्यता मिळवली आहे. राज्य सरकारने नुकताच तसा निर्णय घोषित करून उडत्या लावण्यावर एकप्रकारे सरकारी मोहोर उमटली आहे.

मॉरमॉनचं रुप इतकं सुंदर आहे की तो उडता लहानसा मोर म्हणावा लागेल. लांब पंखांवर आभाळाचा निळा रंग माखून फिरणारा मॉरमॉन पंखांच्या चोहू बाजूने काळाजर्द असतो. अमावस्येच्या अंधाराचे थोडे काळे तुकडे आपल्या पंखाला चिकटवून बागडणारा मॉरमॉन रंगीत फुलांवर बसतो तेव्हा एका अप्रतिम लावण्याचा अनोखा संगम होते. ते रूप पाहून पाहून आपलं तन-मन आनंदानं भरभरून जातं.

मॉरमॉन तसा श्रीलंका आणि भारतात ब-याच ठिकाणी आढळतो. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात आढळणारा मॉरमॉन तसा विदर्भ आणि पश्चिम महाराष्टातही दिसून येतो.


देशात फुलपाखरांच्या 1500 जाती आहेत. रोजच्या जीवनगाडयात आपण कधी फुलपाखरांकडे लक्ष देत नाही. खरे तर फुलपाखरांचं आयुष्य 2-3 महिन्याचंच असतं. माझ्या दृष्टीने फुलपाखरू हे मोहकता, लावण्य, अहिंसा आणि निसर्गाच्या सौंदर्याचं एक उडतं रूप आहे. तूर्तास, राज्य सरकार आणि ब्ल्यू मॉरमॉन बटरफ्लाय या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा...!

Thursday, 18 June 2015

इगो, माणूस आणि प्राणी

माणसातील अहम् (इगो) हा अनेक माणसासाठी अंगांनी कार्य करतो. वास्तवता, बुध्दी, चेतना, तर्क-शक्ती, निर्णय शक्ती, इच्छा शक्ती, अनुकूलता, आकलन, भेदाभेद करण्याची वृत्ती या सर्वांना विकसित करतो. इगो हा मानवाप्रमाणे प्राण्यातही असतो. तथापि, इगोची कार्ये प्राण्यांमध्ये मर्यादित पातळीवर असावित किंवा इगोवर त्यांचे नियंत्रण असावे, असेही म्हणता येईल.

कारण, माणूस हा एकमेव असा आहे की इगोमुळे तो स्वतःला, दुस-या माणसाला किंवा निसर्गाला किंवा त्याच्याशी जगण्याचा संबंध नसलेल्या कोणत्याही जिवंत वा निश्चिल पदार्थाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. उदा. माणूस केवळ गंमत म्हणून डोंगरावरच्या गवताला आग लावतो. उदा. इच्छा झाली म्हणून तो निश्चिल असलेल्या डोंगरावरील दगड फोडतो किंवा गंमत म्हणून कडयावरून दगड खाली ढकलतो.

प्राण्यांमध्ये किंवा सजीव सृष्टीत असे काही नाही. प्राणी देखील स्वतःचे अधिवास,अन्न,परिवार याचे रक्षण करतात. मात्र, सहज वाटले म्हणून कोणताही प्राणी दुस-या प्राण्याला इजा करीत नाही. अथवा, इच्छा झाली म्हणून मानवी वसाहतीवर हल्ला करून मानवाला बंदी करण्याचा प्रय़त्न करीत नाही. त्यामुळे वास्तवता, बुध्दी, चेतना, तर्क-शक्ती, निर्णय शक्ती, इच्छा शक्ती, अनुकूलता, आकलन, भेदाभेद करण्याची वृत्ती अशी वृत्ती असलेला इगो प्राण्यांमध्ये असूनही त्यांचा वापर स्वजातीची किंवा इतर जातीची हानी ते करीत नाहीत. इगोचा वापर सृष्टीशी एकरूप होण्यासाठी प्राणी अधिक करीत असल्याचे आढळून येते. त्यामुळेच प्राणी हे स्वार्थी नाहीत. जगण्यासाठी अत्यावश्यक असते ते मिळवण्याची वृत्ती आहे. मात्र, स्वार्थ नाही.

स्वार्थ आणि इगोचा गैरवापर माणसात आत्यंतिक आहे. म्हणून तो दुःखी आहे. सगळ्यात गमतीचा भाग म्हणजे दुःखावर मात करण्यासाठी वापरले जाणारे उपाय देखील स्वार्थ आणि इगोचा गैरवापराआधारित असतात. 

Tuesday, 26 May 2015

आईला सुखावणारी जागा अखेर सापडली


तसे पाहिले तर 72 वर्षांची माझी आई माझ्याकडे कधीच काही मागत नाही . तिला हवा असतो माझ्याकडून थोडा वेळ आणि चार गोड शब्द.
मुलाचा पैसा वाया जावू नये म्हणून औषधे संपल्याचं देखील सांगत नाही. त्यामुळे सोनं-चांदी,साडया,हॉटेलिंग असं काही तिनं मागणं खूप लांब राहिलं. या फसव्या,नटव्या आणि दिखमादार आधुनिक जगापासून तशी ती खूप दूर आहे.
औषधोपचारासाठी नाशिकमध्ये जावे लागते. मी अनेकदा तिला काही गोड-धोड खाण्याविषयी विचारले. मात्र, ती नकार देते आणि जमल्यास तर नाशिकच्या काळाराम मंदिरात नेण्याविषयी सांगते. आम्ही मंदिरात गेलो की आई खूप आनंदी होते. प्रदक्षिणा मारून मग ती मंदिरासमोरच्या भव्य दगडी मंडपाच्या रेखीव महिरपीच्या खांबाला पाठ लावून निवांतपणे बसते.
काळारामाच्या मंदिरातील रेखीव दगडी खांबाला टेकून आई का विसावते याचा शोध मला अनेक वर्ष लागला नाही. तो आता लागला आहे. मला असे कळले आहे की माझी आई गरिबा घरची तर वडील मजूर होते. दोघांचं लग्न 50 वर्षांपूर्वी नाशिकच्या काळाराम मंदिरात माळ टाकून झालं होतं. एकमेकांच्या गळ्यात लग्नमाळ टाकून दोघे जण मंदिरात किती तरी वेळ बसून होते...! याच दगडी महिरपीच्या खांबाला टेकून..!

हे असे चेहरे, की ज्यांच्या दर्शनानं उजळतो जीव...!


डॉ.विकास आमटे आणि डॉ.भारतीताई आमटे हे असे शांत,शितल,प्रसन्न,चंदनगंधाचे दोन चेहेरे पाहिले की 33 कोटी देवघराचं एकाच वेळी दर्शन झाल्याचं समाधान मिळतं. त्यांचं छायाचित्र पाहून जीव उजळून निघतो.
या दांम्पत्याच्या डोळ्यात हरणाचं प्रेम, हास्यात मोरपिसारा, चेह-यावर संधीप्रकाशाची शितलता आणि नजरेत हंबरणा-या गायीची माया आहे.
मानवतेच्या सेवेसाठी उभं आयुष्य निःसंगपणे झोकून दिलेल्या या चेह-यांच्या मनगटात मात्र हिमालयाची ताकद आहे. असे चेहरे पाहिले की मानवतेवरील श्रध्दा अजून गाढ होत जाते. असे चेहरे पाहिले की आपलं नखभर दुःख –हदयी तळाला लपवून कुणालाही आनंदानं आभाळाकडे पहात म्हणावसं वाटतः
या जगण्यावर..या जन्मावर...शतदः प्रेम करावे....! शतदः प्रेम करावे....!!

शेतक-यांच्या आत्महत्या आणि आरोग्य खाते


शेतकरी आत्महत्येच्या गहन आणि नाजूक विषयामुळे मी सतत चिंताक्रांत असतो. शेती क्षेत्रात लेखन करतांना रोजच्या उलथापालथीपैंकी अनेक बाबी या समस्येशी निगडीत असतात म्हणून ही चिंता वाढते.
शेतक-यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी राज्याचे आरोग्य खाते आता पुढे आले आहे. सर्व उपाय थकल्यानं शेतक-यांचं समुपदेश करून आत्महत्या थांबवता येतील, असं आरोग्य खात्याला वाटते आहे. मुळात, महाराष्ट्रातील 20 हजाराहून अधिक कर्मचा-यांचा ताफा असलेल्या कृषी खात्याला 24 तास 365 दिवस शेतक-यांमध्ये राहून शेतकरी आत्महत्येमागचं कारण कळलं नाही. (किंवा कृषी खात्याला कळले असल्यास आत्महत्या थांबवता आलेल्या नाहीत.) तर आरोग्य खात्याला ही समस्या काय कळणार, हा प्रश्न आहे.
शेतकरी आत्महत्या हा विषय फक्त आमचा एकटयाचा नाही, अशी भूमिका कृषी खात्याने घेतली असल्यास राज्यकर्त्यांनी ती आतून स्विकारली असावी, असे दिसते. मात्र, पुढे ठोस उपाय करण्यास राज्यकर्ते अपयशी झालेले आहेत. तसेच, काही उपाय करून देखील आत्महत्या सत्र खंडीत झालेले नाही.
अशा स्थितीत राज्याचे आरोग्य खाते आता शेतक-यांनी आत्महत्या करू नये म्हणून शेतक-यांचं कौन्सिलिंग करणार आहे. शेतक-यांच्या आत्महत्या म्हणजे कोणाच्या तरी चुका आणि दोषांचं प्रायश्चित्त आहे. या चुका आणि दोष कोणाचे हे शोधून त्याची कायमची दुरूस्ती करायला हवी. उलट शेतक-यांचं कौन्सिलिंग करणं म्हणजे कुणाचे तरी दोष झाकण्याचा प्रयत्न आहे.
दोष झाकण्याचे हे खटाटोप खरे तर दोषींना हवेच आहे. कारण, टायटॅनिकच्या चालकांना हिमनग नव्हे तर आकाश निरीक्षणात सर्वांना गुंतवून ठेवायचे आहे. म्हणूनच हे प्रयत्न म्हणजे हजारो शेतक-यांना घेऊन निघालेली ही शेकडो टायटॅनिक जहाजे आहेत, असे माझे मत आहे. आकाश निरीक्षणासाठी भरपूर दुर्बिणी पुरवल्या जात आहेत.

शेतकरी आत्महत्या रोखणारी चतुःसूत्री



आत्महत्या रोखण्यासाठी एका चतुःसूत्री कार्यक्रमाची बाजू मला अभ्यासाअंती दिसून आली आहे. अर्थात, त्यावर अजून काम करता येऊ शकते. तथापि, ही चतुःसूत्री चांगला उपाय ठरू शकेल.

केंद्र आणि राज्य सरकारला जर या चतुःसूत्री कार्यक्रमाला चौकट मानून काम करण्याची इच्छा असेल तर शेतकरी आत्महत्या थांबू शकतील. माझ्या मते या चतुःसूत्रीला स्पर्श करणा-या सध्याच्या यंत्रणा कुचकामी किंवा प्रभावहिन ठरल्यामुळे शेतकरी निराशेकडे वळाला आहे आणि त्यातून आत्महत्यांचे धगधगते कुंड पेटले आहे.

समुपदेशन हा कधीही अंतिम उपाय नाही. शेतक-याचे समुपदेश करणा-या डॉक्टरला वैफल्यग्रस्त शेतक-याच्या मनाचा शोध घेता येईल. पण, त्याला उपाय सांगता येणार नाहीत, असे मला वाटते. छिन्नमनस्कतेत सापडलेला शेतकरी मी एक अपयशी माणूस आहे, अशा भूमिकेवर टप्प्याटप्याने येतो आणि नंतर आत्महत्येकडे वळतो. मुळात या छिन्नमनस्कतेची किंवा वैफल्याच्या स्थितीला शेतक-याची शारीरिक अवस्था (असे शेतकरी कमी असावेत, असे माझे ठाम मत आहे.) जबाबदार असल्यास त्यावर काही उपाय डॉक्टर सूचवतील.

मात्र, बाह्य वातावरणाच्या प्रभावातून जर हे शेतकरी मोठया संख्येने एकटेपणा, छिन्नमनस्कता,वैफल्यतेला सामोरे जात असल्यास जगातील कोणत्याही डॉक्टरकडे शेतक-यांच्या या वैफल्यावर औषध नाही.

मी विदर्भात सहा जिल्ह्यांमध्ये फिरलो तेव्हा असे आढळून आले की बाह्य वातावरणाच्या प्रभावातूनच बहुसंख्य शेतकरी एकटेपणा, छिन्नमनस्कता,वैफल्यतेकडे झुकलेले आहेत. हे बाह्य वातावरण म्हणजेच चतुःसूत्रीचा अभाव आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या चतुःसूत्रीवर कोणत्याही पक्षाकडून काम होतांना दिसत नाही. म्हणजेच, गॅंगरिन एका हाताला आणि शस्त्रक्रिया दुस-या हाताला असा पध्दतशीर कार्यक्रम गेल्या 10-15 वर्षांपासून सुरू आहे. आता शेतक-यांना दिलासा देणारं वातावरण हवं आहे.

माझ्या मते पुढे दिलेली एक चतुःसूत्री यावर प्रभावी उपाय आहे. 1) सर्व शेतमालासाठी सर्व बाजारपेठा मुक्त करणे, 2) झेडपीपासून ते राज्य शासन ते केंद्र शासन अशा यंत्रणांकडून शेतक-यांसाठी असलेल्या सर्व योजना कोणताही गैरव्यवहार न होता त्यांच्या दारात पोहोचवणं, 3) कृषी विभागाला शेतकरीभिमुख, जबाबदार करण्यासाठी कामकाजात व्यापक बदल घडवून प्रत्येक गावात कृषी खात्याचा माणूस उपलब्ध करून देणे तसेच 4) कोणत्याही शेतक-याला कोणतीही सेवा लाच न देता-घेता उपलब्ध करून देणं असा आणि हाच एकमेव पर्याय शेतक-यांना दिलासा देणारा ठरेल.

शेतक-यांना दिलासा देणारे वातावरण या चतुःसूत्रीतून तयार झाले तर हा देश माझ्यासाठी आहे आणि मी या देशाचा आहे आणि मी,माझा जीव या देशाला मोलाचा आहे, अशी भावना त्याच्या मनात तयार होऊ शकते. ही भावना पुढे त्याची निराशा कमी करू शकते. कारण, या निराशेतच आत्महत्येचे मुळं आहेत. ही निराशा केवळ या चतुःसूत्रीतून कमी होऊ शकते. या चतुःसूत्रीतील एकही बाजू लंगडी असेल तर शेतक-यांची निराशा कमी होणार नाही, यावर मला तरी कोणतीही शंका वाटत नाही.

या चतुःसूत्रीवर काही शंका असल्यास मी सकारात्मक चर्चेचे स्वागतच करीन. तथापि, त्याचा पाठपुरावा आता झाला पाहिजे.


-मनोज कापडे +91 988 11 31059 (Agri Journalist)  

Tuesday, 5 May 2015

पर्यावरणमित्र शेखर गायकवाड यांची मुलाखत


"वन महोत्सवातून मला वृक्षारोपण नव्हे तर 10 हजार –हदयात निसर्गप्रेम निर्माण करायचंय..!"
…………………………………………………………



जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्ताने नाशिकमध्ये 10 हजार नागरिकांना एकत्र आणण्याचं शिवधनुष्य उचलून 10 हजार झाडांचं एकाच वेळी रोपण करण्याची एक ऐतिहासिक घटना येत्या 5 जूनला घडणार आहे. या घटनेचे शिल्पकार ठरू पाहणारे सामाजिक भान असलेल्या तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनलेले नाशिकचे पर्यावरणमित्र शेखर गायकवाड यांच्याशी साधलेला हा मुक्त संवाद.

प्रश्नः आयटी,इंडस्ट्री,टेक्नॉलॉजी, स्मार्ट सिटी अशा व्याख्यांनी आज नागरिक गुरफटून जात असतांना तुम्ही वृक्षारोपणाची सामुहिक संकल्पना राबवायला निघालेला आहात. तुमची नेमकी भूमिका सांगाल का..?
श्री.गायकवाड- होय. तुम्ही म्हणता तशाच व्याख्यांनी माझा निसर्ग-माझी झाडे-माझे पक्षी-लता-वेली आज ओरबाडून काढली जात आहेत. झाडांची कत्तल करून आजचे दिवाणखाणे सजवले जात आहेत. निसर्गाची लूट करता करता तो आता शेवटच्या घटकेकडे निघाल्याचे मला सतत जाणवतेय. म्हणून मी म्हणतो की आता नागरिकांनी निसर्गाकडून घेणं थांबवावं आणि देणं सुरू करावं.

मला भीती वाटते ती पुढच्या पिढ्यांची. काय बघतील ती मुलं ? कुठं सापडतील माझी झाडे आणि पक्षी त्यांना ? पुस्तकात ? अर्थात पुस्तकेही नसतील. मला वाटते केवळ व्हिडिओ क्लिप दाखवली जाईल या पिढीला. आजच्या पालकांनी निसर्गाविषयी स्वतःमध्ये जागृती घडवून आणायला हवी. चांगल्या नोक-या, गाडया,बंगले म्हणजे जीवन नव्हे. तुमची मुले ही केवळ कार्टूनसारखी वाढवू नका. पैसा हा तुमच्या जिवनाचे ध्येय कधीच नसावे. आनंदी जीवन हेच मानवी ध्येय आहे आणि तो आनंद केवळ निसर्गात आहे. त्यामुळेच सामान्य रिक्षाचालकापासून ते उद्योजकाला देखील पर्यावरणाचं महत्व कळावं म्हणून मी 10 हजार नागरिकांकडून 10 हजार झाडे लावण्याची संकल्पना मांडली.

तुमच्या झगमगाटी जिवनाला वाळवी लागली आहे. ती निघावी आणि जिवनाचं मुलभूत अंग कळावं म्हणून आम्ही 5 जून रोजी नाशिकमध्ये वन महोत्सव भरतोय.

प्रश्नः पर्यावरणाची कत्तल इतक्या मोठया प्रमाणात होतेय की एक वन महोत्सव हा त्यावर अंतिम उपाय ठरत नाही.
श्री.गायकवाड- अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण, मला वन महोत्सवातून 10 हजार झाडं लावायची नाहीत तर 10 हजार –हदय घडवायची आहेत. ही –हदय पर्यावरणप्रेमानं भरलेली असतील. त्यातून 10 हजार कुटुंबांना पर्यावरण कळावं, हा माझा हेतू आहे. 10 हजार झाडे मी आणि आमचा आपलं पर्यावरणनावाने काम करणारा ग्रुप देखील केव्हाही लावू शकतो. आम्ही ती झाडं जगवू देखील दाखवू. पण, इथे माझा हेतू मन घडवण्याचा आहे. आम्हाला आनंदी जिवनाची गुरूकिल्ली लोकांना द्यायची आहे. ती किल्ली निसर्गात आहे. ती किल्ली झाडांजवळ,पशुपक्ष्यांजवळ असल्याची याची जाणिव मला लोकांना करून द्यायची आहे. म्हणून हा वन महोत्सव आहे.

आज नाशिकमध्ये कुणी झाडं तोडलं तर 3-4 लोकं जमा होतात पण उद्या वन महोत्सवातून जागृती झाली तर तेच 40-50 माणसं झाड वाचवण्यासाठी पुढे येतील. मला या शहराच्या भोवती चारही दिशांना जंगल तयार करायचं आहे. त्यालाच मी देवराई म्हणतो. तेथे माझे पक्षी आनंदानं राहतील. निसर्गातच देव आहे हे मला लोकांना सांगायचं आहे. पूर्वी देवराया होत्याच. देवराई म्हणजे काय तर झाडांच, पशूपक्ष्यांचं ठिकाण. अशा देवराया मला नाशिकच्या चारही दिशांना तयार करायच्या आहेत.

प्रश्नः किती सुंदर आहे संकल्पना तुमची. पण, गायकवाड साहेब.. तुम्ही या अभिनव उपक्रमासाठी नाशिकचीच का निवड केली..?
श्री.गायकवाड- मी पर्यावरणाच्या उपक्रमाला नाशिकमध्येच सुरूवात केली. नाशिककरांनी मला भरभरून साथ दिली. माझ्या गोदाघाटविरोधी आंदोलनाला नाशिककरांनी भक्कम पाठिंबा दिला. याच शहरातील पर्यावरणप्रेमींमुळे मी आतापर्यंत 1 लाख झाडे गेल्या दोन दशकात लावू शकलो. 13 हजार पक्ष्यांची घरटी मला वाटता आली. माझ्यावर प्रेम करणारा आपलं पर्यावरणनावाचा सोन्यासारखा ग्रुप मला इथेच मिळाला आहे.
अर्थात, हा नाशिकचाच वन महोत्सव नाही. तो सा-या महाराष्ट्राचा आहे. राज्याच्या अनेक भागातून पर्यावरणप्रेमी या दिवशी नाशिकमध्ये येत आहेत. मला वृक्षारोपणाचा आणि पर्यावरणप्रेमाचा एक नाशिक पॅटर्न तयार करायचा आहे. तो अवघ्या राज्यभर राबवला जावा, अशी माझी इच्छा आहे. 

वन महोत्सव ही संकल्पना मी नाशिक पुरती मर्यादित धरलेली नाही. नागरिकांमध्ये झाडे लावण्याची स्पर्धा लागावी, अशी माझी इच्छा आहे. नाशिकच्या वन महोत्सवात 10 हजार झाडे लागली; मग उद्या ठाणे जिल्ह्यात वन महोत्सव झाल्यास ठाणेकरांनी 20 हजार झाडे लावण्याचं उद्दिष्ठ ठेवावं असं मला वाटतं. मी ठाण्यात काय कुठेही झाडं लावण्यासाठी जाईन.
या कार्यक्रमाला आम्ही राजकीय लोकांना देखील मुद्दाम निमंत्रित केलं आहे. त्यांना आम्हाला हेच दाखवायचं आहे की लोकांना पर्यावरण, निसर्ग आवडतो. फक्त निसर्ग जतन करणारी धोरणं राज्यकर्त्यांनी राबवायला हवीत. मग ती महापालिका, झेडपी असो की ग्रामपंचायत किंवा मंत्रालय. राज्यकर्त्यांनी ठरवलं तरच निसर्ग वाचणार आहे. कारण, लोकांकडे ताकद असली तरी शासनाकडे पैसा आणि कायदा आहे. त्यामुळे निसर्गाचं रक्षण आणि संवर्धन शासनाकडून अधिक वेगानं होऊ शकतं.

राज्याचे मुख्यमंत्री देखील पर्यावरणप्रेमी असल्याचं मला कळल्यानंतर त्यांनी देखील या वनमहोत्सवात यावं, याकरीता मी प्रयत्न सुरू केलेत. येतांना सीएम साहेबांनी फक्त 5 लिटरची पाण्याची कॅन झाडाला पाणी टाकण्यासाठी आणावी, असा माझा आग्रह आहे. कारण, त्यांची ही छोटीशी कृती हाच लोकांसाठी मोठा संदेश असतो.

वन महोत्सवातून हे देखील दाखवायचं आहे की वृक्षारोपण ही अवघड बाब नाही. 4-5 हजार झाडे लावण्यासाठी शासनाला इरवी खूप प्रक्रिया राबवाव्या लागतात. इथे लोक एकत्र आल्यास एका रात्रीत डोंगर हिरवा होऊ शकतो. तेच वन महोत्सवातून आम्हाला सिध्द करायचं आहे. झाडं देखील कशी व्यवस्थित लावण्याची आवश्यकता असते; अन्यथा ग्रीन डेझर्ट तयार होतात, हे देखील मला शासनापर्यंत पोहोचवायचे आहे.

प्रश्नः सर, तुम्ही ग्रीन डेझर्ट ही संकल्पना सांगितली. ती जरा विस्तारानं समजावून सांगाल का आम्हाला ?
श्री.गायकवाड- चुकीच्या वृक्षारोपणातून काही ठिकाणी ग्रीन डेझर्ट तयार होत आहेत. कोणतीही झाडं चुकीच्या पध्दतीने एकाच ठिकाणी लावल्यास त्याचा उपयोग पशु-पक्ष्यांनाही होत नाही. त्यातून पर्यावरण संतुलनही रहात नाही. काही ठिकाणी नको तितकी ग्लिरिसिडियाची झाडं दिसतात. वृक्षारोपण हे पर्यावरण पुरक हवं. अन्यथा ग्रीन डेझर्ट अवतरल्याचे दिसते. मग, आपण पक्षी दिसत नाहीत म्हणून सर्व दोष मोबाईल टॉवर, कॉंक्रिट इमारती किंवा कारखान्यांना देतो. या बाबींचा दोष आहेच. पण तो 100 टक्के नाही. ग्रीन डेझर्टमुळे देखील पशु-पक्षी नाहीसे होतात.

आज काटेरी झाड शहरात दिसतच नाही. बाभूळ,बोर ही झाडं कुणी लावत नाही. मग पक्ष्यांनी बसायचे कुठे ? त्याकरीता मी वन महोत्सवात झाडे लावतांना फुलपाखरू,वटवाघळं,मधमाशा तसेच पशुपक्ष्यांना पूरक ठरतील अशी झाडं लावण्याचं ठरवलं आहे. वड,उंबर,पिंपळ,चिंच,कडुनिंब,आंबा तेथे असेलच; पण पापडा, विलायती चिंच, बोर, काळा कुडा, कळम, सोनसावर, बाभूळ, ताम्हण, फणशी, चेरी, बुच, वड, पिंपळ, उंबर, पायर, बुच पांगारा, सीता अशोक, तूतु, बकुळ, अर्जून, शिवण, जांभूळ, बेहेडा, आवळा, सुरु, रिठा, काटे सावर, बहावा, वरस, पांढरा कुडा, सळई, सातवीन, नीम, टेम्भूर्णी, जंगली बदाम, खेड शिरणी, करंज, शंकासूर, रान जाई, कृष्णकमळ, शिंदी, करवंद, चिलार अशी नाना जातीची झाडं आम्ही लावणार आहोत. 5 जूनचा वन महोत्सव हा सर्व नागरिकांसाठी कर्तव्य,आनंद आणि अभ्यासाचा देखील विषय ठरणार आहे.

ग्रीन डेझर्टची भीती डोळ्यासमोर ठेवून योग्य वृक्षारोपण केलं तरच पक्षी येतील. मला वन महोत्सवानंतर बहरलेल्या त्या जंगलात भविष्यात हळद्या,धनेश सारखे पक्षी यावेत, असं वाटतं. त्यामुळे झाडांविषयी असलेल्या काही चुकीच्या संकल्पनांविषयी देखील आम्ही जागृती घडवून आणणार आहोत.

प्रश्नः होय, चुकीच्या संकल्पना लोकांमध्ये खूप असतात. त्यातून पर्यावरणात अडथळे तयार होतात.
श्री.गायकवाड- अगदी खरे आहे. आपल्या चुकीच्या संकल्पनांमधून अडथळाच नाही तर काही झाडेच धोक्यात आली आहेत. वड,उंबर,पिंपळ खूप वाढतात आणि घरात घूसून सिमेंटचे घरही पाडतात, असा एक भ्रम लोकांमध्ये आहे. कधीही कोणत्याही झाडामुळे घर पडलेलं नाही. नाशिकमध्ये असे किती तरी जुनी घरं,वाडे आहेत की त्या ठिकाणी भव्य वड,उंबर,पिंपळाची झाडं डोलानं उभी आहेत. तुम्ही झाडांना वाढू द्या. गावाकडे खडकाळ भागांमध्ये मुळया थोडया फार पसरतात. शहरात बाकी झाडांमुळे कधीही त्रास होत नसतो. विकास कामे करतांना नियोजन केल्यास झाडे कधीच अडथळा ठरत नाहीत. लोकांनी बेधडक आपली परंपरागत झाडं मोकळ्या जागांमध्ये लावायला हवी.

दुसरं म्हणजे झाडांच पुनर्रोपण. हा एक फसवा प्रकार आहे. एक जुनं झाडं पुरतं छाटून मुळासकट उपटून दुसरीकडे नेलं तर ते जगण्याची शक्यता फार कमी असते. एखाद्या वयोवृध्द माणसाचे हात-पाय तोडून त्याला घरातून हाकलायचे आणि त्याला जंगलात खडकावर घर बांधून देत म्हणायचे की आता तुम्ही जगणार आहात. तसलाच हा प्रकार आहे. झाडांच पुनर्रोपण हा खर्चिक आणि वाईट प्रकार आहे. त्यापेक्षा आहे ती झाडं व्यवस्थित जगवा असं माझं म्हणणं आहे. रविवार कारंजा सारख्या अगदी भरवस्तीत इमारतीला लागून काही महिन्यांपूर्वी आम्ही झाडं लावली. आज ती चांगली वाढत आहेत. निसर्गाविषयीचे भ्रम दूर करणं हे देखील वन महोत्सवाचं वैशिष्टय असेल.

प्रश्नः वन महोत्सवात आणखी काय असेल?
श्री.गायकवाड- तो आनंदाचा मेऴावाच असेल. आम्ही नियोजनपूर्वक सर्व काही करतोय. तेथे एक पर्यावरण जत्रा भरवली जाणार आहे. या जत्रेत निसर्गाविषयी प्रात्यक्षिकांसह माहिती दिली जाणार आहे. झाड कसं लावावं, याच थोडक्यात प्रशिक्षण आम्ही लोकांना देणार आहोत. बरेच वृक्षप्रेमी झाड लावतांना रोपांची पिशऴी सरळ ब्लेडने कापतात. तसे केल्याने मुळं देखील कापली जातात. त्यामुळे पिशवी कशी कापावी, झाड कसे लावावे, मातीवर किती दाब द्यावा, पाणी कसे द्यावे हे देखील बघायला मिऴणार आहे.

 गांडुळपालन,मधमाशीपालन,निसर्गशेती,वनौषधींची शेती,पक्षी आणि झाडे, पक्ष्यांची घरटी कशी बनवावी, नक्षत्रवन कसे असते अशी बरीच माहिती तेथे मिळणार आहे. वनमहोत्सवात 80 वर्षांच्या आजोबांपासून ते 2 वर्षाच्या नातवापर्यंत सर्वांना काही तरी शिकायला आणि बघायला मिळावे, असा आमचा प्रयत्न आहे.
वन महोत्सवात आम्ही झाडांना नंबर देणार आहोत. त्याची माहिती देखील तेथे असेल. आपण लावलेले झाड ते हेच, याची आठवण नागरिकांना सदैव रहावी म्हणून योग्य ते नियोजन आम्ही करणार आहोत.

प्रश्नः सर खूपच छान... दुसरं म्हणजे आपल्या वन महोत्सवात शासकीय किंवा इतर काही संघटनांचा सहभाग कसा आहे ?
श्री.गायकवाड- अतिशय चांगला सहभाग आहे. नाशिकचे मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील खूप तळमळीने मार्गदर्शन करीत आहेत. लोकांचा सहभाग पाहून ते चकित झालेत. त्यांची पूर्ण यंत्रणा आमच्या पाठिशी उभी आहे.

नाशिकच्या क्रेडाई संघटनेचा मी ऋणीच आहे. कारण क्रेडाईचे अध्यक्ष जयेश ठक्कर हे स्वतः पर्यावरणप्रेमी असून वन महोत्सवाच्या 40 एकर जागेला कुंपण घालण्यासाठी त्यांनी 5 लाख रुपये मंजूर केले आहे. हेतू हाच की एकाही झाडाचं कुंपणाअभावी नुकसान होऊ नये. प्लंबिग असोसिएशन देखील मदत करते आहे. आम्हाला 1 किलोमीटर अंतरावरून झाडांसाठी पाणी आणायचं आहे. त्याचा खर्च देखील दाते करणार आहेत. आमच्या ग्रुपमध्ये रमेश अय्यर म्हणून ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांनी स्वतःच्या परिवारातूनच एक लाख रुपये उभे केले आहेत. त्यामुळे आम्हाला पर्यावरण पुरक झाडांची खरेदी बाजारातून करण्याची ताकद मिळाली आहे.
आम्ही वन महोत्सव झाल्यावर देखील त्या जागेची काळजी घेणार आहोत. तेथे कुंपण, सुरक्षा, पाणी पुरवठा अशी दीर्घकाळ व्यवस्थापनाची कामं करावी लागणार आहेत.  

वन महोत्सवाच्या निमित्तानं खूप कामं मला आणि माझ्या टिमला करावी लागतात. पण, कुणालाही थकवा येत नाही. लोकांचं पर्यावरण प्रेम पाहून मला चार हत्तींचं बळ मिळतं. नाशिकमध्ये जशी दरवर्षी मॅरेथॉन स्पर्धा भरते; तसा वन महोत्सव भरवला जावा, निसर्गाचं संवर्धन त्यातून व्हावं, अशी माझी इच्छा आहे.
लोक निसर्गाच्या सानिध्यात असावेत. लोकांनी निसर्गाला समजावून घ्यावं आणि आनंदी जिवनाची गुरूकिल्ली मिळवावी, हेच माझं स्वप्न आहे. आणि वन महोत्सवाविषयी लोकांमध्ये तयार झालेला उत्साह पाहून माझे स्वप्न सत्यात उतरेल याचीही खात्री मला वाटते.

मलाखत संपते. मलाखतकार शेवटी म्हणतोः   खूप छान..तुमच्या वन महोत्सवाला आमच्या मनापासून शुभेच्छा. तुमच्या पर्यावरणप्रेमाची ही लाट राज्यभर पसरावी, अशी आम्ही सदिच्छा देतो आहोत.
(हसत-हसत) श्री.गायकवाड- धन्यवाद. मिडियाच्या शुभेच्छा आमच्या कार्यासाठी खूप महत्वाच्या ठरल्या आहेत. आमचा संदेश शेवटी तुमच्यामुळेच लोकांपर्यंत पोहोचतो आहे. सोशल मिडिया असो की प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मिडिया असो की रेडिओ, हा वन महोत्सव तुम्ही लोकांनीच घराघरात पोहोचवला आहे. मिडियाच्या सर्व मंडळींना मी आताच वन महोत्सवात निमंत्रित करतोय. तेथे प्रत्येक पत्रकाराचं आणि त्याच्या परिवाराचं देखील एक झाडं असावं असं मला वाटतं. कारण शेवटी एक माणूस पर्यावरण प्रेमी असला तर त्याच घर पर्यावरण प्रेमी बनतं; पण एक पत्रकार जर निसर्गप्रेमी बनला तर हजारो वाचक पर्यावरण प्रेमी बनतात.

-समाप्त
                                                                                           (मुलाखत-मनोज कापडे, नाशिक)