आयुष्यात सर्वात जास्त आपल्याशी हितगुज साधते ती आई. तिच्या बोलण्यातून जग
कळत असतं. मुलं मोठी झाल्यावर आईशी कमी बोलतात. जगण्याचं वेळापत्रक असं बनतं-बनवतात
की त्यात मुलगा आपल्या आईला फार वेळ देत नाही. मात्र, मी आईशी ठरवून बोलत असतो.
तिच्या मैत्रिणीशी देखील गप्पा मारत असतो.
आईला घेऊन काल तिच्या मैत्रिणीकडे गेलो होतो. माझी आई 71 वर्षाची तर तिची
मैत्रिण 75 वर्षांची आहे. कपाळावर लालभडक कुंकु लावणारी ही मैत्रिण गोदावरी नदी
काठी एका झोपडीत रहात होती. काही दिवसांपूर्वीच तिला मायबाप सरकारनं घर दिलं आहे.
आईला पाहून मैत्रिण खुश झाली. आईसाठी तिने दहा रुपयाची गोडीशेव घेऊन ठेवली
होती. दोघींच्या मग गप्पा झाल्या. आईची मैत्रिण काही महिन्यांपूर्वी पाय घसरून
पडलेली. तिच्या जवळ डॉक्टरच्या गोळ्यांचे पाकिट दिसले. ते पाकिट या आजारी
मैत्रिणीचे नसून बाबांचे होते. बाबा शेजारच्या खाटेवर बसलेले होते.
80 वर्षांच्या पतीची या वयात काळजी घेणारी 75 वर्षांची ही आजी म्हणजे माझ्या
आईची मैत्रिण. गेल्या 50 वर्षांपासून या दोघींची ही मैत्री घनदाट जंगलातल्या
झ-यातील नितळ-गोड पाण्यासारखी शुध्दपणे टिकून आहे.
No comments:
Post a Comment