महाराष्ट्राच्या 250 शहरांमध्ये अजूनही पावणेदोन लाख घरांमध्ये अशी शौचालये
आहेत की ती स्वच्छ करण्यासाठी कामगारांचा वापर करावा लागतो. हाताने मानवी मैला
वाहून आपला उदरनिर्वाह करणारे कामगार आणि अशा प्रथा चालू ठेवणारी आपली प्रजा
म्हणजे आपल्या सुशिक्षित संस्कृतीला काळिमा फासणारी बाब म्हणावी लागेल.
जगण्यासाठी गरीब माणूस काहीही करतो आणि आपल्याला हवे तसे जगण्यासाठी काहीजण
माणुसकीही गहाण टाकतात, याचे उदाहरण म्हणजे आजही हाताने मैला वाहण्याची चालू
असलेली प्रथा.
शहरे वाढलीत पण स्वच्छतेचे महत्व अजूनही पटलेले नाही. अस्वच्छ परिसर हा
आपल्याला माणुसकीला लागलेला डाग वाटत नाही. स्मार्टसिटी संकल्पना आली पण
गावच्या,शहरातील टॉयलेटस् अजून स्वच्छ दिसत नाहीत.
रस्त्यात पडलेली घाण, कचरा फेकणारी माणसं, थुंकणारी सुशिक्षित किंवा
अशिक्षित व्यक्ती पाहून “हे चालायचंच” असं सांगून लोक आपआपली
काम करतात. त्यामुळे राज्यकर्तेही फारसे लक्ष देत नाहीत. नोकरशाही देखील मग जशी
प्रजा-तसा राजा आणि तसेच आपण, असे सांगत पुढे सरकत असते.
आपण कॉस्मोपॉलिटन होत असलो तरी स्वच्छता,जात,धर्म,प्रांत,बंधुत्वाच्या
संस्कृतीत कुठे कुठे मागास राहिलो आहोत. शहरीकरणाच्या धुंदीत असा मागासलेपणा दिसत
नाही आणि दिसला तरी तो जाणवत नाही.
विकास आणि सुसंस्कृत माणूस तशी समाजरचना याबाबतीत जपानसारखे देश कितीतरी
आदर्शवत आहेत. पण, आपल्याला दुस-याला चांगले म्हटलेलेही चालत नाही. कारण नकळत
वैचारिक अस्वच्छतेचाही पुरस्कार आपण बहुमताने, घट्टपणे करतो आहोत.
No comments:
Post a Comment