Monday, 21 December 2015

कचराकुंडीतील पेनची कहाणी



मी साध्या शाळेत शिकत होतो. घरची गरिबी होती. शाळेत गुरूजींनी सांगितले की शाईचा पेन वापरल्यास अक्षर चांगले येते. वर्गात चांगली परिस्थिती असलेल्या मुलांनी नंतर सोनेरी टोपणाचे काळ्या रंगाचे शाईचे पेन आणले होते.

माझ्याकडे साध्या कांडीचा पेन होता. शाईचा पेन घरातून मिळण्याची शक्यता नव्हती. कारण तो वडिलांकडेही नव्हता.
माझा मित्र राजूने मग युक्ती सांगितली. तो म्हणाला की, ‘शाईचा पेन मिळू शकतो पण फिरावे लागेल.’ मी होकार दिला.
त्याने दुस-याच दिवशी मला गावाकडून शहराकडे नेले. आम्ही पायी गेलो. त्यानंतर एका सरकारी कॉलनीच्या पाठीमागे नेले. कॉलनी मोठी होती. तेथे सात-आठ कचराकुंडया होत्या.

राजू म्हणाला की, ‘आता तुला तुझा पेन फुकट मिळेल. या कचराकुंडया आपण दोघांनी चाळायच्या. इकडं गावाकडची माणसं येत नाही. कोणी कोणाच्या ओळखीचं नाही. तू पेन शोध- मी माझ्या वस्तू शोधतो.’

कचराकुंडया चाळण्यात राजू पटाईत होता. तो प्लास्टिक,तारा,लोखंड,काचेच्या बाटल्या अशा वस्तू बाजुला काढीत असे. त्याच त्याच्या वस्तू होत्या. मला तुटलेले पेन,संपलेल्या रिफिल सापडत असत. मात्र, माझ्या डोळ्यासमोर सोनेरी टोपणाचा काळ्या रंगाचा शाईचा पेन होता.

पुढे मग राजूने काही मुला-मुलींच्या ओळखी करून दिल्या. ते झोपडपट्टीतून येत असत. आम्ही रविवारी मात्र दिवसभर कचराकुंडया चाळत असू. राजू त्या वस्तू विकून आम्हाला खाऊ देखील द्यायचा.

कचराकुंडयांची कामे उरकल्यावर आम्ही पाटामध्ये अंघोळीला जात असू. मला पोहता येऊ लागले. केवळ पेनमुळे मी कचराकुंडया चाळायला येतो, असे राजूच्या लक्षात आले होते.

अनेक महिन्यानंतर मला माझ्या स्वप्नातला पेन कचराकुंडीतच सापडला. मी आनंदाने उडालो. मी पेन वडिलांनाही दाखवला. नवाकोरा पेन सापडल्यानं मी राजूची साथ सोडली. त्यानेही मला नंतर कधी विचारले नाही.

पुढे मी सातवीला गेल्यानंतर झोपडपट्टीतील ती कचराकुंडी चाळणारी मुले पाटावर भेटली. ती मुले म्हणाले की, ‘राजू कुठेतरी निघून गेला आहे. कुठे गेला ते माहिती नाही. पण, तुला कचराकुंडीवर सापडलेला पेन राजूनेच नाशिकच्या दुकानातून विकत आणला होता. तो आदल्यादिवशी त्याने कुंडीत टाकला होता.’

आज कुठेही कचराकुंडी दिसली की मला राजू आठवतो आणि पेन देखील..!

No comments:

Post a Comment