Tuesday, 5 May 2015

पर्यावरणमित्र शेखर गायकवाड यांची मुलाखत


"वन महोत्सवातून मला वृक्षारोपण नव्हे तर 10 हजार –हदयात निसर्गप्रेम निर्माण करायचंय..!"
…………………………………………………………



जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्ताने नाशिकमध्ये 10 हजार नागरिकांना एकत्र आणण्याचं शिवधनुष्य उचलून 10 हजार झाडांचं एकाच वेळी रोपण करण्याची एक ऐतिहासिक घटना येत्या 5 जूनला घडणार आहे. या घटनेचे शिल्पकार ठरू पाहणारे सामाजिक भान असलेल्या तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनलेले नाशिकचे पर्यावरणमित्र शेखर गायकवाड यांच्याशी साधलेला हा मुक्त संवाद.

प्रश्नः आयटी,इंडस्ट्री,टेक्नॉलॉजी, स्मार्ट सिटी अशा व्याख्यांनी आज नागरिक गुरफटून जात असतांना तुम्ही वृक्षारोपणाची सामुहिक संकल्पना राबवायला निघालेला आहात. तुमची नेमकी भूमिका सांगाल का..?
श्री.गायकवाड- होय. तुम्ही म्हणता तशाच व्याख्यांनी माझा निसर्ग-माझी झाडे-माझे पक्षी-लता-वेली आज ओरबाडून काढली जात आहेत. झाडांची कत्तल करून आजचे दिवाणखाणे सजवले जात आहेत. निसर्गाची लूट करता करता तो आता शेवटच्या घटकेकडे निघाल्याचे मला सतत जाणवतेय. म्हणून मी म्हणतो की आता नागरिकांनी निसर्गाकडून घेणं थांबवावं आणि देणं सुरू करावं.

मला भीती वाटते ती पुढच्या पिढ्यांची. काय बघतील ती मुलं ? कुठं सापडतील माझी झाडे आणि पक्षी त्यांना ? पुस्तकात ? अर्थात पुस्तकेही नसतील. मला वाटते केवळ व्हिडिओ क्लिप दाखवली जाईल या पिढीला. आजच्या पालकांनी निसर्गाविषयी स्वतःमध्ये जागृती घडवून आणायला हवी. चांगल्या नोक-या, गाडया,बंगले म्हणजे जीवन नव्हे. तुमची मुले ही केवळ कार्टूनसारखी वाढवू नका. पैसा हा तुमच्या जिवनाचे ध्येय कधीच नसावे. आनंदी जीवन हेच मानवी ध्येय आहे आणि तो आनंद केवळ निसर्गात आहे. त्यामुळेच सामान्य रिक्षाचालकापासून ते उद्योजकाला देखील पर्यावरणाचं महत्व कळावं म्हणून मी 10 हजार नागरिकांकडून 10 हजार झाडे लावण्याची संकल्पना मांडली.

तुमच्या झगमगाटी जिवनाला वाळवी लागली आहे. ती निघावी आणि जिवनाचं मुलभूत अंग कळावं म्हणून आम्ही 5 जून रोजी नाशिकमध्ये वन महोत्सव भरतोय.

प्रश्नः पर्यावरणाची कत्तल इतक्या मोठया प्रमाणात होतेय की एक वन महोत्सव हा त्यावर अंतिम उपाय ठरत नाही.
श्री.गायकवाड- अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण, मला वन महोत्सवातून 10 हजार झाडं लावायची नाहीत तर 10 हजार –हदय घडवायची आहेत. ही –हदय पर्यावरणप्रेमानं भरलेली असतील. त्यातून 10 हजार कुटुंबांना पर्यावरण कळावं, हा माझा हेतू आहे. 10 हजार झाडे मी आणि आमचा आपलं पर्यावरणनावाने काम करणारा ग्रुप देखील केव्हाही लावू शकतो. आम्ही ती झाडं जगवू देखील दाखवू. पण, इथे माझा हेतू मन घडवण्याचा आहे. आम्हाला आनंदी जिवनाची गुरूकिल्ली लोकांना द्यायची आहे. ती किल्ली निसर्गात आहे. ती किल्ली झाडांजवळ,पशुपक्ष्यांजवळ असल्याची याची जाणिव मला लोकांना करून द्यायची आहे. म्हणून हा वन महोत्सव आहे.

आज नाशिकमध्ये कुणी झाडं तोडलं तर 3-4 लोकं जमा होतात पण उद्या वन महोत्सवातून जागृती झाली तर तेच 40-50 माणसं झाड वाचवण्यासाठी पुढे येतील. मला या शहराच्या भोवती चारही दिशांना जंगल तयार करायचं आहे. त्यालाच मी देवराई म्हणतो. तेथे माझे पक्षी आनंदानं राहतील. निसर्गातच देव आहे हे मला लोकांना सांगायचं आहे. पूर्वी देवराया होत्याच. देवराई म्हणजे काय तर झाडांच, पशूपक्ष्यांचं ठिकाण. अशा देवराया मला नाशिकच्या चारही दिशांना तयार करायच्या आहेत.

प्रश्नः किती सुंदर आहे संकल्पना तुमची. पण, गायकवाड साहेब.. तुम्ही या अभिनव उपक्रमासाठी नाशिकचीच का निवड केली..?
श्री.गायकवाड- मी पर्यावरणाच्या उपक्रमाला नाशिकमध्येच सुरूवात केली. नाशिककरांनी मला भरभरून साथ दिली. माझ्या गोदाघाटविरोधी आंदोलनाला नाशिककरांनी भक्कम पाठिंबा दिला. याच शहरातील पर्यावरणप्रेमींमुळे मी आतापर्यंत 1 लाख झाडे गेल्या दोन दशकात लावू शकलो. 13 हजार पक्ष्यांची घरटी मला वाटता आली. माझ्यावर प्रेम करणारा आपलं पर्यावरणनावाचा सोन्यासारखा ग्रुप मला इथेच मिळाला आहे.
अर्थात, हा नाशिकचाच वन महोत्सव नाही. तो सा-या महाराष्ट्राचा आहे. राज्याच्या अनेक भागातून पर्यावरणप्रेमी या दिवशी नाशिकमध्ये येत आहेत. मला वृक्षारोपणाचा आणि पर्यावरणप्रेमाचा एक नाशिक पॅटर्न तयार करायचा आहे. तो अवघ्या राज्यभर राबवला जावा, अशी माझी इच्छा आहे. 

वन महोत्सव ही संकल्पना मी नाशिक पुरती मर्यादित धरलेली नाही. नागरिकांमध्ये झाडे लावण्याची स्पर्धा लागावी, अशी माझी इच्छा आहे. नाशिकच्या वन महोत्सवात 10 हजार झाडे लागली; मग उद्या ठाणे जिल्ह्यात वन महोत्सव झाल्यास ठाणेकरांनी 20 हजार झाडे लावण्याचं उद्दिष्ठ ठेवावं असं मला वाटतं. मी ठाण्यात काय कुठेही झाडं लावण्यासाठी जाईन.
या कार्यक्रमाला आम्ही राजकीय लोकांना देखील मुद्दाम निमंत्रित केलं आहे. त्यांना आम्हाला हेच दाखवायचं आहे की लोकांना पर्यावरण, निसर्ग आवडतो. फक्त निसर्ग जतन करणारी धोरणं राज्यकर्त्यांनी राबवायला हवीत. मग ती महापालिका, झेडपी असो की ग्रामपंचायत किंवा मंत्रालय. राज्यकर्त्यांनी ठरवलं तरच निसर्ग वाचणार आहे. कारण, लोकांकडे ताकद असली तरी शासनाकडे पैसा आणि कायदा आहे. त्यामुळे निसर्गाचं रक्षण आणि संवर्धन शासनाकडून अधिक वेगानं होऊ शकतं.

राज्याचे मुख्यमंत्री देखील पर्यावरणप्रेमी असल्याचं मला कळल्यानंतर त्यांनी देखील या वनमहोत्सवात यावं, याकरीता मी प्रयत्न सुरू केलेत. येतांना सीएम साहेबांनी फक्त 5 लिटरची पाण्याची कॅन झाडाला पाणी टाकण्यासाठी आणावी, असा माझा आग्रह आहे. कारण, त्यांची ही छोटीशी कृती हाच लोकांसाठी मोठा संदेश असतो.

वन महोत्सवातून हे देखील दाखवायचं आहे की वृक्षारोपण ही अवघड बाब नाही. 4-5 हजार झाडे लावण्यासाठी शासनाला इरवी खूप प्रक्रिया राबवाव्या लागतात. इथे लोक एकत्र आल्यास एका रात्रीत डोंगर हिरवा होऊ शकतो. तेच वन महोत्सवातून आम्हाला सिध्द करायचं आहे. झाडं देखील कशी व्यवस्थित लावण्याची आवश्यकता असते; अन्यथा ग्रीन डेझर्ट तयार होतात, हे देखील मला शासनापर्यंत पोहोचवायचे आहे.

प्रश्नः सर, तुम्ही ग्रीन डेझर्ट ही संकल्पना सांगितली. ती जरा विस्तारानं समजावून सांगाल का आम्हाला ?
श्री.गायकवाड- चुकीच्या वृक्षारोपणातून काही ठिकाणी ग्रीन डेझर्ट तयार होत आहेत. कोणतीही झाडं चुकीच्या पध्दतीने एकाच ठिकाणी लावल्यास त्याचा उपयोग पशु-पक्ष्यांनाही होत नाही. त्यातून पर्यावरण संतुलनही रहात नाही. काही ठिकाणी नको तितकी ग्लिरिसिडियाची झाडं दिसतात. वृक्षारोपण हे पर्यावरण पुरक हवं. अन्यथा ग्रीन डेझर्ट अवतरल्याचे दिसते. मग, आपण पक्षी दिसत नाहीत म्हणून सर्व दोष मोबाईल टॉवर, कॉंक्रिट इमारती किंवा कारखान्यांना देतो. या बाबींचा दोष आहेच. पण तो 100 टक्के नाही. ग्रीन डेझर्टमुळे देखील पशु-पक्षी नाहीसे होतात.

आज काटेरी झाड शहरात दिसतच नाही. बाभूळ,बोर ही झाडं कुणी लावत नाही. मग पक्ष्यांनी बसायचे कुठे ? त्याकरीता मी वन महोत्सवात झाडे लावतांना फुलपाखरू,वटवाघळं,मधमाशा तसेच पशुपक्ष्यांना पूरक ठरतील अशी झाडं लावण्याचं ठरवलं आहे. वड,उंबर,पिंपळ,चिंच,कडुनिंब,आंबा तेथे असेलच; पण पापडा, विलायती चिंच, बोर, काळा कुडा, कळम, सोनसावर, बाभूळ, ताम्हण, फणशी, चेरी, बुच, वड, पिंपळ, उंबर, पायर, बुच पांगारा, सीता अशोक, तूतु, बकुळ, अर्जून, शिवण, जांभूळ, बेहेडा, आवळा, सुरु, रिठा, काटे सावर, बहावा, वरस, पांढरा कुडा, सळई, सातवीन, नीम, टेम्भूर्णी, जंगली बदाम, खेड शिरणी, करंज, शंकासूर, रान जाई, कृष्णकमळ, शिंदी, करवंद, चिलार अशी नाना जातीची झाडं आम्ही लावणार आहोत. 5 जूनचा वन महोत्सव हा सर्व नागरिकांसाठी कर्तव्य,आनंद आणि अभ्यासाचा देखील विषय ठरणार आहे.

ग्रीन डेझर्टची भीती डोळ्यासमोर ठेवून योग्य वृक्षारोपण केलं तरच पक्षी येतील. मला वन महोत्सवानंतर बहरलेल्या त्या जंगलात भविष्यात हळद्या,धनेश सारखे पक्षी यावेत, असं वाटतं. त्यामुळे झाडांविषयी असलेल्या काही चुकीच्या संकल्पनांविषयी देखील आम्ही जागृती घडवून आणणार आहोत.

प्रश्नः होय, चुकीच्या संकल्पना लोकांमध्ये खूप असतात. त्यातून पर्यावरणात अडथळे तयार होतात.
श्री.गायकवाड- अगदी खरे आहे. आपल्या चुकीच्या संकल्पनांमधून अडथळाच नाही तर काही झाडेच धोक्यात आली आहेत. वड,उंबर,पिंपळ खूप वाढतात आणि घरात घूसून सिमेंटचे घरही पाडतात, असा एक भ्रम लोकांमध्ये आहे. कधीही कोणत्याही झाडामुळे घर पडलेलं नाही. नाशिकमध्ये असे किती तरी जुनी घरं,वाडे आहेत की त्या ठिकाणी भव्य वड,उंबर,पिंपळाची झाडं डोलानं उभी आहेत. तुम्ही झाडांना वाढू द्या. गावाकडे खडकाळ भागांमध्ये मुळया थोडया फार पसरतात. शहरात बाकी झाडांमुळे कधीही त्रास होत नसतो. विकास कामे करतांना नियोजन केल्यास झाडे कधीच अडथळा ठरत नाहीत. लोकांनी बेधडक आपली परंपरागत झाडं मोकळ्या जागांमध्ये लावायला हवी.

दुसरं म्हणजे झाडांच पुनर्रोपण. हा एक फसवा प्रकार आहे. एक जुनं झाडं पुरतं छाटून मुळासकट उपटून दुसरीकडे नेलं तर ते जगण्याची शक्यता फार कमी असते. एखाद्या वयोवृध्द माणसाचे हात-पाय तोडून त्याला घरातून हाकलायचे आणि त्याला जंगलात खडकावर घर बांधून देत म्हणायचे की आता तुम्ही जगणार आहात. तसलाच हा प्रकार आहे. झाडांच पुनर्रोपण हा खर्चिक आणि वाईट प्रकार आहे. त्यापेक्षा आहे ती झाडं व्यवस्थित जगवा असं माझं म्हणणं आहे. रविवार कारंजा सारख्या अगदी भरवस्तीत इमारतीला लागून काही महिन्यांपूर्वी आम्ही झाडं लावली. आज ती चांगली वाढत आहेत. निसर्गाविषयीचे भ्रम दूर करणं हे देखील वन महोत्सवाचं वैशिष्टय असेल.

प्रश्नः वन महोत्सवात आणखी काय असेल?
श्री.गायकवाड- तो आनंदाचा मेऴावाच असेल. आम्ही नियोजनपूर्वक सर्व काही करतोय. तेथे एक पर्यावरण जत्रा भरवली जाणार आहे. या जत्रेत निसर्गाविषयी प्रात्यक्षिकांसह माहिती दिली जाणार आहे. झाड कसं लावावं, याच थोडक्यात प्रशिक्षण आम्ही लोकांना देणार आहोत. बरेच वृक्षप्रेमी झाड लावतांना रोपांची पिशऴी सरळ ब्लेडने कापतात. तसे केल्याने मुळं देखील कापली जातात. त्यामुळे पिशवी कशी कापावी, झाड कसे लावावे, मातीवर किती दाब द्यावा, पाणी कसे द्यावे हे देखील बघायला मिऴणार आहे.

 गांडुळपालन,मधमाशीपालन,निसर्गशेती,वनौषधींची शेती,पक्षी आणि झाडे, पक्ष्यांची घरटी कशी बनवावी, नक्षत्रवन कसे असते अशी बरीच माहिती तेथे मिळणार आहे. वनमहोत्सवात 80 वर्षांच्या आजोबांपासून ते 2 वर्षाच्या नातवापर्यंत सर्वांना काही तरी शिकायला आणि बघायला मिळावे, असा आमचा प्रयत्न आहे.
वन महोत्सवात आम्ही झाडांना नंबर देणार आहोत. त्याची माहिती देखील तेथे असेल. आपण लावलेले झाड ते हेच, याची आठवण नागरिकांना सदैव रहावी म्हणून योग्य ते नियोजन आम्ही करणार आहोत.

प्रश्नः सर खूपच छान... दुसरं म्हणजे आपल्या वन महोत्सवात शासकीय किंवा इतर काही संघटनांचा सहभाग कसा आहे ?
श्री.गायकवाड- अतिशय चांगला सहभाग आहे. नाशिकचे मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील खूप तळमळीने मार्गदर्शन करीत आहेत. लोकांचा सहभाग पाहून ते चकित झालेत. त्यांची पूर्ण यंत्रणा आमच्या पाठिशी उभी आहे.

नाशिकच्या क्रेडाई संघटनेचा मी ऋणीच आहे. कारण क्रेडाईचे अध्यक्ष जयेश ठक्कर हे स्वतः पर्यावरणप्रेमी असून वन महोत्सवाच्या 40 एकर जागेला कुंपण घालण्यासाठी त्यांनी 5 लाख रुपये मंजूर केले आहे. हेतू हाच की एकाही झाडाचं कुंपणाअभावी नुकसान होऊ नये. प्लंबिग असोसिएशन देखील मदत करते आहे. आम्हाला 1 किलोमीटर अंतरावरून झाडांसाठी पाणी आणायचं आहे. त्याचा खर्च देखील दाते करणार आहेत. आमच्या ग्रुपमध्ये रमेश अय्यर म्हणून ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांनी स्वतःच्या परिवारातूनच एक लाख रुपये उभे केले आहेत. त्यामुळे आम्हाला पर्यावरण पुरक झाडांची खरेदी बाजारातून करण्याची ताकद मिळाली आहे.
आम्ही वन महोत्सव झाल्यावर देखील त्या जागेची काळजी घेणार आहोत. तेथे कुंपण, सुरक्षा, पाणी पुरवठा अशी दीर्घकाळ व्यवस्थापनाची कामं करावी लागणार आहेत.  

वन महोत्सवाच्या निमित्तानं खूप कामं मला आणि माझ्या टिमला करावी लागतात. पण, कुणालाही थकवा येत नाही. लोकांचं पर्यावरण प्रेम पाहून मला चार हत्तींचं बळ मिळतं. नाशिकमध्ये जशी दरवर्षी मॅरेथॉन स्पर्धा भरते; तसा वन महोत्सव भरवला जावा, निसर्गाचं संवर्धन त्यातून व्हावं, अशी माझी इच्छा आहे.
लोक निसर्गाच्या सानिध्यात असावेत. लोकांनी निसर्गाला समजावून घ्यावं आणि आनंदी जिवनाची गुरूकिल्ली मिळवावी, हेच माझं स्वप्न आहे. आणि वन महोत्सवाविषयी लोकांमध्ये तयार झालेला उत्साह पाहून माझे स्वप्न सत्यात उतरेल याचीही खात्री मला वाटते.

मलाखत संपते. मलाखतकार शेवटी म्हणतोः   खूप छान..तुमच्या वन महोत्सवाला आमच्या मनापासून शुभेच्छा. तुमच्या पर्यावरणप्रेमाची ही लाट राज्यभर पसरावी, अशी आम्ही सदिच्छा देतो आहोत.
(हसत-हसत) श्री.गायकवाड- धन्यवाद. मिडियाच्या शुभेच्छा आमच्या कार्यासाठी खूप महत्वाच्या ठरल्या आहेत. आमचा संदेश शेवटी तुमच्यामुळेच लोकांपर्यंत पोहोचतो आहे. सोशल मिडिया असो की प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मिडिया असो की रेडिओ, हा वन महोत्सव तुम्ही लोकांनीच घराघरात पोहोचवला आहे. मिडियाच्या सर्व मंडळींना मी आताच वन महोत्सवात निमंत्रित करतोय. तेथे प्रत्येक पत्रकाराचं आणि त्याच्या परिवाराचं देखील एक झाडं असावं असं मला वाटतं. कारण शेवटी एक माणूस पर्यावरण प्रेमी असला तर त्याच घर पर्यावरण प्रेमी बनतं; पण एक पत्रकार जर निसर्गप्रेमी बनला तर हजारो वाचक पर्यावरण प्रेमी बनतात.

-समाप्त
                                                                                           (मुलाखत-मनोज कापडे, नाशिक)





No comments:

Post a Comment