उत्तर भारतात 1974 मध्ये झाडे वाचवण्यासाठी सुंदरलाल बहुगुणा नावाच्या
सामान्य माणसाने दिलेल्या लढयामुळे भारतीय पर्यावरण चळवळीचा इतिहास रचला आहे.
त्यातून अनेक चळवळी उभ्या राहिल्यात. आजही त्या सुरूच आहेत. महाराष्ट्रातील पर्यावरण
चळवळीचा भविष्यात मागोवा घेतांना नाशिकचे पर्यावरणप्रेमी शेखर गायकवाड यांचा
उल्लेख आदरानं करावं लागणार आहे.
एक सामान्य मराठी माणूस म्हणून श्री.गायकवाड यांनी लोखंडी वेल्डिंग कामातून
आयुष्याची सुरूवात केली. मात्र, दिवसभर घण-हातोडा हाताळून घामातून मिळालेला पैसा
हा माणूस झाडे लावण्यात खर्च करीत गेला. गेल्या 18 वर्षांपासून ते नाशिक आणि
आसपासच्या प्रांतांमध्ये झाडे लावत आहेत. सुरूवातीची अनेक वर्ष लोकांच्या अंगणात
जावून खड्डा खोदणं, झाड लावणं आणि त्याला पाणीही स्वतःच घालण्याचं गाडगेबाबांसारखं
काम श्री.गायकवाड यांनी केलं. आता त्यांच्या या पर्यावरणप्रेमाचा रथ ओढण्यासाठी
असंख्य सारथी तयार झाले आहेत.
झाडांसाठी देहभान हरपलेल्या श्री.गायकवाड सरांनी आपल्या कतृत्वातून
आतापर्यंत 1 लाखाच्या आसपास झाडं लावलीत. पक्ष्यांसाठी 13 हजाराहून अधिक घरटी
वाटली आहेत. आजवर हजारो जखमी पक्ष्यांवर उपचार करून जीव वाचवले आहेत. त्यांनी आपल्या घरीच जखमी पक्ष्यांसाठी उपचार-निवारा
केंद्र उघडलं आहे.
दोन महिन्यांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे आणि डॉ.मंदाताई आमटे
आवर्जुन श्री.गायकवाड सरांकडे गेले. त्यांच्या वृक्ष चळवळीचं दोघांनी भरभरून कौतुक
देखील केलं.
आता येत्या 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं नाशिकमधील
सातपूरच्या डोंगरी भागात पर्यावरणप्रेमी श्री.गायकवाड यांनी 10 हजार लोकांना
जमवण्याचा संकल्प केला आहे. 10 हजार नागरिक एकाच वेळी 10 हजार झाडं लावणार आहेत.
राज्याच्या पर्यावरण चळवळीतील ही एक ऐतिहासिक घटना असेल. ते नाशिकचे नव्हे तर या
देशाचे दुसरे सुंदरलाल बहुगुणा ठरावेत, अशी इच्छा व्यक्त करीत पर्यावरणप्रेमी
त्यांना आता ‘दसहजारी’ शुभेच्छा देत आहेत...!
No comments:
Post a Comment