राज्याच्या शेतीचा कणा असलेल्या बैलांचा उद्या सण. पोळा म्हणजे बैलांची दिवाळी. शेतकरी राजा बैलांची मनोभावे पुजा करतो. बैलाविना पोळा साजरा करणा-या परिवारात मातीच्या बैलांची पुजा करून गोड जेवणाचा नैवेद्य दिला जातो.
राज्याच्या शेतीचे चित्र पाहिल्यास बैलांची संख्या झपाटयाने घटते आहे. ट्रॅक्टर वाढत असले तरी बैलांचा सांभाळ करण्याइतकी देखील चारा-पाण्याची सुविधा नसल्यामुळे असंख्य शेतकरी बैलाविना आहेत. शेतक-यांना स्वतः जगणं असह्य झाल्यामुळे बैल सांभाळणे ही आवाक्याबाहेरची बाब झाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्याच अधिकृत अहवालाचा संदर्भ घेतला तर १९९२ मध्ये बैलांची संख्या राज्यात ६४ लाख होती. २००३ मध्ये ६२ लाख झाली आणि त्यानंतर २००७ मध्ये हीच संख्या ५५ लाखांवर आली. आता ही संख्या अजून झपाटयाने खाली जाते आहे. दुष्काळाविना हजारो बैलांना कत्तलखान्याकडे पाठवले जाते. दुसरीकडे जगण्याची दिशा हरवलेले शेतकरी आय़ुष्य संपवतात. २०११ मध्ये देशात १४२००७ शेतक-यांनी आत्महत्या केल्या. २०१२ मध्ये महाराष्ट्रातील ३७८६ शेतक-यांची आयुष्ययात्रा संपली. अशाही वातावरणात पोळा दरवर्षी हूरूप देतो. शेतकरी आणि बैल दोघे जण यादिवशी आपले दुःख विसरून आनंदाच्या डोही डुंबतात. भारतीय सण म्हणजे दुःखावर घातलेली मायेची फुंकर असते. पोळा सण त्यापैकीच एक...!
(जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव असा कृषीप्रधान देश आहे की जेथे आर्थिक संकटात सापडल्यावर बैल शेती सोडून कत्तलखान्याकडे जातात. तर, शेतकरी शेती सोडून स्वर्गाकडे जातो.)
No comments:
Post a Comment