आधुनिक भारत सुखाच्या शोधात आहे. सुखाच्या व्याख्या देखील माणसागणिक विविध आहेत. व्याख्येप्रमाणे-इच्छेप्रमाणे सुख मिळालेली माणसं बरीच असतात. पण, त्यांच्या चेह-यावर तो आनंद दिसत नाही. तथाकथित सुख त्यांना इतरांना वाटता येत नाही. ते सुख नकली-बेगडी-फसवं असतं. नाशिकचे वृक्षमित्र शेखरकाका गायकवाड यांना इच्छेप्रमाणे सुख मिळालेलं आहे. त्यांचे अंगण सोने,हिरे,माणिक,पाचूने सजलेले आहे. शेखरकाकांच्या या श्रीमंत अंगणात लोकांना प्रवेश असतो. लोक मिळेल तेव्हा ते सुख घेऊन जातात.
शेखरकाकांनी झाडे आणि पशूपक्ष्यांनी आपले अंगण सजवले आहे. त्यालाच ते आपली संपत्ती मानतात. सागापासून ते रक्तचंदनापर्यंतची झाडे त्यांनी जोपासली आहेत. किंगफिशर-भरद्वाजपासून ते पोपटापर्यंत सर्व पक्षी तेथे विहार करतात. खारूताई निर्धास्तपणे फिरतात. सतत आठ वर्ष राबून शेखरकांकांनी सार्वजनिक जागेवर ही बाग स्वतः उभी केली आहे. झाडे विकत आणून, स्वतः दोन वेळ पाणी टाकून रोज देवपुजा करावी, तशी ही बाग शेखरकाकांनी निसर्गपुजेतून सजवली आहे.
निसर्गसुखाच्या मागे लागलेल्या शेखरकांकांना अंगणात भरभरून सुख मिळते आहे. मधमाशांचे थवे, रंगीत भुंगे, नाना रंगाची फुलपाखरे तेथे फिरत असतात. कोकिळेच्या मंजूळ आवाजात इथे देशी,विदेशी,आयुर्वेदिक,जंगली झाडे वाढतात आणि फुले मुक्तपणे फुलतात. पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी पाणवठे आहेत. आता येथे १३० प्रकारची झाडे मुक्तपणे जगत असून अंगणात भेटी देणा-या देणा-या पक्ष्यांच्या जाती ३३ वर पोहोचल्या आहेत. नाशिकमधील दर्दी वृक्षप्रेमी या अंगणात मनाला वाटले तेव्हा येतात. आनंदी होतात. घरी जाऊन झाडे लावत इतरांनाही आनंद वाटतात. शेखरकाका हे पाहून आनंदाच्या घनदाट जंगलात स्वतः हरवून जातात.
(साधे वेल्डरकाम करून प्रपंच चालवणारे शेखरकाका काही वर्षांपूर्वी वेल्डिंग केलेले दारे-खिडक्या हातगाडयावर टाकून तो गाडा शहराच्या रस्त्यातून लोटत नेत असत. कष्टातून आता शेखरकाकांनी प्रगती केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी तयार केलेल्या या अंगणात पूर्वी एक मोठी कचराकुंडी होती.)
No comments:
Post a Comment