घरात भरपूर वर्तमानपत्र येतात. कचराकुंडीवर चाळता चाळता हळूच सोन्याचं झगझगती नाणं दिसवं तसं वर्तमानपत्र वाचता वाचता काही तरी गवसतं. मग मन प्रसन्न होतं. ती एखादी छोटी बातमी असते, लेख असतो, फोटो असतो, शैक्षणिक माहिती असते, गाण्याची ओळ असते किंवा दोन ओळीचा सुविचार असू असतो. मात्र, त्यातून आयुष्य बदलून जातं.
अर्थात, वर्तमानपत्रांची रद्दी देखील मौल्यवान असते. गाडीवर रद्दी टाकून शहरात विकायला नेणं ही बाब दुर्मीळ. त्यात कमीपणा वाटतो. रद्दी विकतांना कोणी पाहिलं तर इभ्रत जायची अशी पक्की भावना असते. त्यामुळे जाहीरपणे कुणी रद्दी विकतांना दिसत नाही. मी थोडा वेगळा प्रयोग करतो. रद्दी जाहीरपणे विकतो. यंदा मुलाला गाडीवर बसवलं. त्याला संकोच वाटला. रद्दीच्या दुकानात गेलो. ३२५ रुपये मिळाले. मुलाला म्हटले, “संकोच करू नको..तू फक्त धीर धर.” पुढे मुलाच्याच उपस्थितीत रद्दीच्या पैशातून खरेदी झाली. त्याचा हिशेब असाः
शामची आई (इंग्रजी आवृत्ती) पुस्तकाची खरेदी- १०० रुपये
पितृभक्त-मातृभक्त श्रावणबाळ पुस्तकाची खरेदी- ४० रुपये
गोदाकाठी बसून निवांतपणे खाल्लेली भेळ- ३० रुपये
अंगणातील चिमण्यांसाठी १ किलो बाजरीची खरेदी- २४ रुपये
अंगणात येणा-या पोपटांसाठी मका कणीस,पेरूची खरेदी- २० रुपये
नीतिमुल्य कथासंग्रहाची खरेदी- ३५ रुपये
आईच्या गुडघेदुखीवरील मलम खरेदी- ४० रुपये
(आता रद्दीच्या पैशातून ६० रुपये उरले होते. रूदनने “सिंघम रिटर्न्स” सिनेमा दाखवण्याचा हट्ट धरला. त्यात मी ८० रुपये टाकून सिनेमा दाखवला. सिनेमा सुटल्यावर घरी जातांना मी रुदनाला म्हणालो की, बघ ही रद्दीची कमाल आहे. रद्दीच्या पैशातून भरपूर आनंद मिळवता येतो. जगात कशालाही वाईट म्हणता येत नाही. वाईट काय असतं, हे फक्त आपल्या मनाला माहित असतं. सर्वांना फसवता येतं. मनाला नाही. मनाला जे-जे चांगलं वाटतं ते-ते दुस-याला न दुखवता करावं. आनंद मिळवत जगावं..!)
No comments:
Post a Comment