Wednesday, 27 August 2014

मार्क झुकेरबर्ग आणि डॉ.विकास बाबा आमटे



फेसबुक नावाच्या विशाल आभासी जगाची निर्मिती मार्क झुकेरबर्ग या तरूणाने केली आहे. ४ फेब्रुवारी २००४ रोजी अमेरिकेतील महाविद्यालयीन मित्रांना बरोबर घेऊन १९ वर्षाच्या मार्कने फेसबुकची पायाभरणी केली. मार्कने सध्या १ अब्ज २३ कोटीपेक्षा जास्त लोकांना या आभासी जगात आणलं आहे. या कामाचा मोबदला म्हणजे तो आता जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत गेला आहे.

कोणी फेसबुकचा कसाही वापर करो; पण मार्क म्हणतो, “फेसबुकला मी कंपनी म्हणून स्थापन केलं नव्हतं. एक सामाजिक अभियान सुरू करण्याचाच तो प्रयत्न होता. मला हे जग अधिक मोकळं आणि जवळ आणायचं होतं.”

मार्कच्या विराट आभासी जगात कसे वागायचे याची शिकवण मराठी माणसाला डॉ.विकास बाबा आमटे यांनी दिली. माझ्यासाठी ते या भासामय जगाचे कुलगुरूच आहेत. फेसबुकच्या जगात कसे वागायचे,कसे लिहियचे,कोणते फोटो दाखवायचे,कोणत्या चित्रफिती सादर करायचे, काय वाचायचे आणि काय शेअर करायचे याचे सुंदर आणि कष्टमय काम डॉ.विकास आमटे यांच्याकडून होतेय. मार्कमुळे डॉ.विकास आमटे यांच्या आनंदवनात थेट प्रवेश मिळवतो. मानवता समजते,निसर्ग ज्ञान होते, पशू-पक्ष्यांची भाषा कळते. डॉ.आमटे यांच्यामुळेच आई कळते, बाबा कळतात, मुले कशी घडवावीत, स्वतःला कसे घडवावे हे कळते. मित्र म्हणजे काय, मैत्री म्हणजे काय याचे धडे डॉ.विकास आमटे यांच्याकडून मिळतात. त्यामुळेच फेसबुकच्या माध्यमातून व्याधीग्रस्त माणसांचे प्राण वाचवण्यासाठी लोक मदतीसाठी धावून जातात.

प्रिय मार्क… तुम्ही एका सुंदर आभासी सृष्टीची निर्मिती केली आहे. ही सृष्टी पाषाणयुगात आहे. त्यात लक्षावधी गुहा आहेत. आम्ही देखील पाषाणयुगातील एका गुहेत आहोत. या गुहेतील पाषाणांवर सध्या मानवजातीच्या इतिहासातील नानाविध चित्रे काढली जात आहेत. त्यात प्राणी,मानव,पक्षी,झाडे, निसर्ग सर्व काही आहेत. आणि ही चित्रे रेखाटणारा महान चित्रकार म्हणजे आमचे.....डॉ.विकास बाबा आमटे..!

प्रकटण्यापूर्वी देव देखील तावूनसुलाखून घेतो



 मूर्तीकाराकडून स्वतःला आकार प्राप्त करून घेणा-या श्रीगणेशाचे आज सकाळी नाशिकमध्ये घेतलेले हे ताजे छायाचित्र.

कष्टाशिवाय फळ नाही. कष्टाशिवाय सुख नाही. कष्टाशिवाय समाधान-शांती नाही. थोर माणसं तहानभूक विसरून आयुष्य झिजवतात;  तेव्हा कुठे सुंदर संकल्पना, वैश्विक तत्त्वांची निर्मिती होते. देवाकडून माणूस घडतो की माणसांकडून देवाची संकल्पना उदयाला येते, असा कूट प्रश्न आहे.

तथापि.....माणसासमोर प्रकट होण्यासाठी देवाला देखील स्वतःला असे भाजून घ्यावे लागते. श्रीगणेशाची सुंदर मूर्ती आपल्यासमोर प्रकटण्यासाठी मानवाकडून अशा प्रकारे तावूनसुलाखून घेते.

“ Your God is ever beside you - indeed, He is even within you”- Alphonsus Liguori (An Italian writer)

महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावरील गाईड



महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीच्या कळसुबाई शिखराच्या पायथ्याजवळ विद्यार्थी दशेतील आदर्शाची उंची गाठलेली एक आदिवासी विद्यार्थीनी रहातेय. तिचे नाव ज्योती काळू खाडे. कळसुबाई माध्यमिक विद्यालयात शिकणारी ज्योती शाळा शिकून कळसुबाईच्या डोंगररांगामध्ये सरबत विकून आई-वडिलांना घरखर्चासाठी पैसे मिळवून देते.

पर्यटक महिलांसोबत ती गाईडचं काम करते. काही वेळा एकाच दिवशी तीन वेळा कळसुबाई शिखरावर महिलांना घेऊन जाण्याचं अवघड जबाबदारी ती पेलते. कळसुबाईच्या डोंगरावर मी ज्योतीची मुलाखत घेतली. “कळसुबाईच्या शिखरावर मला गाईड म्हणून घेवून जाणारे पर्यटक नेहमीच मिळतात असे नाही. पण कधी कधी एका फेरीला १०० ते २०० रुपये मिळतात. हा पैसा मला शिक्षण आणि आई-वडिलांच्या घरखर्चाला उपयोगी येतो. या पैशांमधून आम्ही लिंबू-साखर आणतो आणि त्याचे सरबत विकतो,” असं ज्योती अभिमानानं सांगत होती.

ज्योतीच्या मैत्रिणी कोमल सखाराम खाडे, अलका धर्मा झुरडे, मंगल विठ्ठल खाडे या विद्यार्थीनी देखील गाईडचं काम करतात. “ आम्ही सर्व मैत्रिणींना आता शाळा शिकून कामं करण्याची सवय झाली आहे. कळसुबाईच्या शिखरावर जायला चांगल्या-भक्कम पर्यटकांना अडीच तास लागतात. मी मात्र एक तासात जाऊन येते. त्यामुळेच काही वेळा दिवसभरात तीनदा मी शिखर चढून येते.” ज्योतीनं गाईड म्हणून मी कोणतं शिक्षण घेतलेलं नाही. तिला पर्यटन विभागाकडून देखील काही मदत मिळालेलं नाही. तिची जिद्द कौतुकास्पद आहे. ती खूप आनंदी आहे.

(ज्योतीच्या शिक्षणासाठी कुणाला मदत करण्याची इच्छा असल्यास कळसुबाईच्या पायथ्याजवळ असलेल्या पहिल्या टेकडीवरील झोपडीत ती भेटू शकते. सरबत विकतांना..!  भारतमातेच्या अशा लढवय्या कन्यांमुळे ग्रामीण भारत कष्टातही फुलतो. दुःखातही आनंदानं भरारी घेतो.)

स्वातंत्र्यदिनाची शुभ्र सोनेरी सकाळ

सकाळी लवकर उठून मी रूदनबरोबरच त्याच्या शाळेत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी गेलो. मुलांमध्ये बसून स्वातंत्र्यदिन साजरा करतांना खूप आनंद मिळत होता. समोर बसलेल्या शेकडो मुलांकडे बघत रुदनच्या मुख्याध्यापिका म्हणाल्या, “ भारत हा सोने की चिडिया होता. लाखो लोकांच्या बलिदान हा देश स्वतंत्र झाला आहे. आता कुणाला बलिदानाची आवश्यकता नाही. मात्र, तुमचे काम तुम्ही निष्टेने केले तर देश पुन्हा सोने की चिडिया बनू शकतो. परीक्षेत ९९ टक्के गुण मिळवणं म्हणजे तुम्ही बुध्दिमान-हुशार होत नाहीत. तुम्ही किती नीतिवान झाला, सुदाचारी झालात यावर तुमची देशभक्ती ठरते.”

वायुसेनेत उच्चपदस्थ अधिकारी असलेले प्रमुख पाहुणे म्हणाले, “ आझादी म्हणजे आपले राज्य असे नव्हे. देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळणे म्हणजे खरे स्वातंत्र्य होय. एका माणसाने स्वातंत्र्य उपभोगतांना दुस-याच्या माणसाची हानी करून त्याचे स्वातंत्र्य हिसकावून घेऊ नये. आपल्या आनंदात इतरांना आनंदी ठेवणे म्हणजे स्वातंत्र्य होय.”

उपमुख्याध्यापकांनी सर्वांचे आभार मानले. तिरंगा आणि विद्यार्थ्यांकडे पाहून त्यांनी एक शेर जोशात पेश केला. ते म्हणाले..                                                                                              
 करो ना फिक्र,
 हम देंगे लहू का तेल
 चिरोगों को जलने के लिए....

मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला. चिमुरडया मुलांनी देशभक्तीपर गाणी सुंदरपणे सादर केली. शेवटी लाडूचे वाटप झाले. लाडू घेण्यासाठी मुलांनी मोठी रांग केली. रांगेत उभे राहून रुदनने लाडू घेतला. मी शाळेचा अधिकृत विद्यार्थी नसल्यामुळे रांगेत उभा रहाण्याचा मोह टाळला. मात्र, शाळेच्या गेटमधून बाहेर येताच आम्ही बाप-लेकांनी लाडू वाटून खाल्ला. स्वातंत्र्यदिनाच्या शुभ्र सोनेरी सकाळी रुदनच्या जिभेवर लाडूची चव होती. माझ्या जिभेवर एक अविट गोड असा शेर होता.  
 करो ना फिक्र,
 हम देंगे लहू का तेल
 चिरोगों को जलने के लिए....

माणुसकीची इमारत रचणारा आर्किटेक्ट- भाग 2

गरीब मुलींच्या शिक्षणासाठी उपाशीपोटी डोंगराळ भागात फिरून कष्टाच्या पैशातून रुख्मिणी आणि यशोदाच्या घरात शिक्षणाची ज्योत पेटवणारे आर्किटेक्ट अतुल देशमाने यांच्या हदयी माणुसकीचा झरा अखंड वाहतो आहे. त्या झ-याचे पूर्ण दर्शन होत नाही. मात्र थोडेफार लपून-छपून मला दिसलेले प्रतिबिंब असेः



सामाजिक भावना महाविद्यालयीन जिवनापासून अतुलरावांमध्ये रुजलेली. एकदा अहमदनगर भागात त्यांच्या मोटरसायकलवर एक चिमुकली पळत येत धडकली. चूक त्यांची नव्हती. अतुलराव पळून जाऊ शकले असते. मात्र, चिमुरडीसाठी जागेवर थांबले. जखमी मुलीला उचलले. मुलीच्या औषधोपचाराचा पूर्ण खर्च केला. तिचे प्राण वाचले होते.

गेल्या वर्षी एक चिमुरडी मुलगी नाशिकला तिस-या मजल्यावरून कोसळली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने खर्चिक शस्त्रक्रिया करावी लागली. त्या परिवाराकडे पैसे नव्हते. अतुलरावांनी त्या मुलीसाठी दारोदार फिरून वर्गणी काढली आणि आईकडे सुपूर्द केले. इतके करूनही चिमुरडी वाचली नाही. त्यामुळे अतुलराव बरेच दिवस दुःखी होते. अव्वल दर्जाचे आर्किटेक्ट असलेले अतुलराव इरवी झाडे लावतात. पक्ष्यांसाठी घरटी वाटतात. जखमी पशूपक्ष्यांना दवाखान्यात पोहचवतात.

एकदा नाशिकरोड रेल्वेस्थानकात अतुलराव प्रवासासाठी थांबले होते. एक आजी अस्वस्थ होती. अतुलराव प्रवास,रिझर्व्हेशन सर्व विसरले. आजी डोळ्यासमोर हटेना. झाले तसेच. काही क्षणात आजींनी रेल्वेरूळावर स्वतःला झोकून दिले. अतुलरावांमध्ये माणुसकीचं बळं होतं आणि तेही रूळाकडे झेपावले. रेल्वे येण्यापूर्वी त्यांनी आजीला रेल्वे-ट्रॅकवरून ओढले. आजी म्हणाली, “सोड मला. पोटचा पोरगा बेईमान निघाला. मला घराबाहेर हुसकलं. मला का वाचवलं तू..” असं सांगत आजी रडू लागल्या. तिच्या अश्रूंना मग आर्किटेक्ट अतुलरावांनी साथ दिली. हमसून रडले. या आजीला पुढे अतुलरावांनी लासलगावला कांदाचाळीवर काम मिळवून दिलं. आता ती आनंदात आहे. अतुलराव सुखी आहेत.

(गरिबांना मदत मिळण्यासाठी आर्किटेक्ट अतुल देशमाने अक्षरक्षः लोकांच्या पाया पडतात. संसारातील पैसेही कधी-कधी वाटून टाकतात. त्यामुळे अडचणीत येतात. अडचणीत आल्यानंतर हा देवदूत फुलासारखं गोड हसतो. मात्र, स्वतःची दुखरी नस इतरांना सापडू देत नाही. ते मला मित्र मानतात, हे माझे भाग्य आहे. देवळाबाहेरच्या देवासोबत माझी मैत्री आहे.)

रद्दी विकली, त्याचा हा मनमोकळा हिशेब



घरात भरपूर वर्तमानपत्र येतात. कचराकुंडीवर चाळता चाळता हळूच सोन्याचं झगझगती नाणं दिसवं तसं वर्तमानपत्र वाचता वाचता काही तरी गवसतं. मग मन प्रसन्न होतं. ती एखादी छोटी बातमी असते, लेख असतो, फोटो असतो, शैक्षणिक माहिती असते, गाण्याची ओळ असते किंवा दोन ओळीचा सुविचार असू असतो. मात्र, त्यातून आयुष्य बदलून जातं.

अर्थात, वर्तमानपत्रांची रद्दी देखील मौल्यवान असते. गाडीवर रद्दी टाकून शहरात विकायला नेणं ही बाब दुर्मीळ. त्यात कमीपणा वाटतो. रद्दी विकतांना कोणी पाहिलं तर इभ्रत जायची अशी पक्की भावना असते. त्यामुळे जाहीरपणे कुणी रद्दी विकतांना दिसत नाही. मी थोडा वेगळा प्रयोग करतो. रद्दी जाहीरपणे विकतो. यंदा मुलाला गाडीवर बसवलं. त्याला संकोच वाटला. रद्दीच्या दुकानात गेलो. ३२५ रुपये मिळाले. मुलाला म्हटले, “संकोच करू नको..तू फक्त धीर धर.”  पुढे मुलाच्याच उपस्थितीत रद्दीच्या पैशातून खरेदी झाली. त्याचा हिशेब असाः

शामची आई (इंग्रजी आवृत्ती) पुस्तकाची खरेदी- १०० रुपये
पितृभक्त-मातृभक्त श्रावणबाळ पुस्तकाची खरेदी- ४० रुपये
गोदाकाठी बसून निवांतपणे खाल्लेली भेळ- ३० रुपये
अंगणातील चिमण्यांसाठी १ किलो बाजरीची खरेदी- २४ रुपये
अंगणात येणा-या पोपटांसाठी मका कणीस,पेरूची खरेदी- २० रुपये
नीतिमुल्य कथासंग्रहाची खरेदी- ३५ रुपये
आईच्या गुडघेदुखीवरील मलम खरेदी- ४० रुपये

(आता रद्दीच्या पैशातून ६० रुपये उरले होते. रूदनने “सिंघम रिटर्न्स” सिनेमा दाखवण्याचा हट्ट धरला. त्यात मी ८० रुपये टाकून सिनेमा दाखवला. सिनेमा सुटल्यावर घरी जातांना मी रुदनाला म्हणालो की, बघ ही रद्दीची कमाल आहे. रद्दीच्या पैशातून भरपूर आनंद मिळवता येतो. जगात कशालाही वाईट म्हणता येत नाही. वाईट काय असतं, हे फक्त आपल्या मनाला माहित असतं. सर्वांना फसवता येतं. मनाला नाही. मनाला जे-जे चांगलं वाटतं ते-ते दुस-याला न दुखवता करावं. आनंद मिळवत जगावं..!)

आज जागतिक छायाचित्रदिन



आज जागतिक छायाचित्रदिन...छायाचित्रकारांवर माझी खूप भक्ती आहे. एक छायाचित्र म्हणजे एक कादंबरी असते. या भिकारी आजीचे छायाचित्र मला माझ्याच घरासमोर मिळाले. “भाऊ..मला थोडी भाकर दे..नाही तर एक रुपया दे...तुझी बरकत होईल.” असे सांगत आजींनी आशीर्वादासाठी हात दिला.

आरती प्रभू (चिं.त्र्यं.खानोलकर) यांच्या भाषेत सांगायचे तर...

चार डोळे, दोन काचा, दोन खाचा.
यात प्रश्न येतो कुठे आसवांचा.

(भारतात 35 कोटी लोक दारिद्रयरेषेखाली रहातात. त्यांचा हरवलेला चेहरा म्हणजे ही आजी.)

सिंघम रिटर्न्स...व्हाया...ओशो, बुध्द

रद्दीच्या पैशांचा चांगला विनियोग सुरू असतांना नाशिक शहरात रूदनने “सिंघम रिटर्न्स” सिनेमा दाखवण्याचा हट्ट धरला. मी दडपशाही करीत नसल्यामुळे बालहट्टापुढे सपशेल झुकलो आणि सिनेमागृहात मुलाला घेऊन गेलो. असे सिनेमे बघतांना मी घाबरून जातो. कानठळ्या बसणारे आवाज, घातपात, हाणामा-या, कधीही न ऐकलेले संवाद कानावर पडताच अंगावर काटा उठतो. अशावेळी गप्पगार बसून रहावे लागते. पण, रुदनने सिनेमाचा आनंद लुटला.

“सिंघम रिटर्न्स”मध्ये एक भोंदूबाबा दाखवला आहे. तो भाविकांचा गंडवतो-फसवतो-हत्या करतो. देशाशी देखील इमान राखत नाही. प्रामाणिक अधिका-यांना हा भोंदूबाबा त्रास देतो. रुदन या पात्राभोवती घुटमळत होता. “सिंघम रिटर्न्स” पाहून आम्ही घरी रिटर्न होतांना रुदन म्हणाला की, “ पप्पा, मला सिनेमा आवडला. पण सर्व साधूबाबा असेच फसवाफसवी करतात करतात का?  बाबालोक चांगले नसतात का?”
मी म्हणालो, “नाही. सर्व बाबा मंडळी फसवत नाहीत. जगात चांगले साधूबाबा देखील होऊन गेलेत. अनेक बाबा लोकांनी आनंद मिळवून देण्यासाठी आयुष्य घालवले आहे. अशा बाबांची माहिती तू घ्यायला हवी.”

मला वाटले हा विषय इथेच संपेल. पण रुदन म्हणाला, “ होय पप्पा... ओशो देखील एक चांगले साधूबाबा होते. ते लोकांना लोकांचे डोळे उघडणारी माहिती सांगत. आणि पप्पा..बुध्द देखील वेगळे बाबा होते ना..? ते राजे असूनही जंगलात गेले. साध्या गोष्टींमधून बुध्दांनी लोकांना कसे वागावे ते सांगितले.”

रुदनच्या तोंडी ओशो आणि बुध्द ऐकून मी चकीत झालो. मोटरसायकलची गती कमी केली. सहावीतून अलिकडेच सातवीत गेलेला हा मुलगा ओशो आणि बुध्दांचा माहितगार असल्याचे समजताच माझी मती गुंग झाली. मी त्याचे अभिनंदन केले. मोठा झाल्यावर जगातील बाबांचा अभ्यास कर, असे सांगत मी भोंदूबाबाचा विषय तोडला. दहावी-बारावीच्या एक्झाम रुम ऐवजी ओशो-बुध्द तत्त्वज्ञानाच्या गुहेत मुलगा गेला तर पुढे उपाशी रहाण्याची वेळ येईल, अशी भीती मला वाटते. मुलाला मी अमीरखान-सलमानखान कधीही सांगितले नाही, तसेच ओशो-बुध्द देखील सांगितले नाहीत. मात्र, मुले चौकस असतात. ज्ञानाची,माहितीची,उत्सुकतेची भूक इतकी असते की तुम्ही बांध घालू शकत नाही. पालक दिशा दाखवू शकतो. मात्र, मुलाच्या व्यक्तिमत्त्वाचे जहाज बंदराला लागेल की हिमनगावर आदळेल, याची हमी नसते.

(मुलगा मोठा झाल्यानंतर आम्ही सर्व विषयांवर बोलणार आहोत. चार्वाक-बुध्द-व्यास-वाल्मिकी-टागोर-कालिदास-ओशो-अशोक-राम-कृष्ण असोत की कांट-हेगेल-रसेल-फ्राईड-सार्त्र-कामू-काफ्का तसेच जीए-आरतीप्रभू-ग्रेस असोत की सत्यजित रॉय-गुरूदत्त-गुलजार.. तूर्तास मला रोजीरोटी आणि रुदनला अभ्यास महत्त्वाचा आहे. मधल्या काळात सिंघमचा तिसरा भाग आल्यास आणि रुदनने ह़ट्ट धरल्यास सिंघम सिनेमा पुन्हा दाखवावा लागेल. नाईलाज आहे….यही तो खुबसुरत जिंदगी है ना..!)

मुस्कुराते जख्म



आई-वडील रोज एकत्र फिरायला जात. वडील आईची काळजी घेत. वृध्दत्वामुळे दोघांची चालण्याची लय,वेग एकच होता. त्यामुळे दोघांमध्ये अंतर पडत नसे. दोघांमध्ये आयुष्याच्या वाटचालीवर खूप गप्पा होत. वडील गेल्यानंतर आई एकाकी पडली. मी आईची अडचण ओळखली. मी आईला फिरायला घेऊन जाणे सुरू केले. वाटेत पुन्हा गप्पा सुरू झाल्या. मात्र, एक समस्या उद्भवली.

मी तरूण असल्यामुळे आईसारखे चालणे जमत नव्हते. अचानक वेग वाढे आणि मी पुढे,आई मागे असे होऊ लागले. मला संथ चालण्याचा खूप कंटाळा येत होता. वृध्द आईचा वेग वाढत नव्हता, माझ्या सळसळत्या रक्ताची चाल मंद होण्यास तयार नव्हती. त्यामुळे हळू चालते म्हणून आईचा मला राग देखील येऊ लागला.

दोन महिन्यानंतर हा प्रश्न नियतीनेच सोडवला. माझ्या डाव्या पायाची टाच दुखू लागली. तपासणीनंतर अस्थिरोगतज्ञ म्हणाले की, “तुमची टाच दुखावली आहे. नेहमी मऊ पादत्राणे वापरा आणि हळू-हळू चालत जा.”

आता आईबरोबर मी एक रेषेत, संथपणे चालत असतो. थोडा वेग वाढला तर लगेच टाच दुखते. मी हळू चालू लागताच वेदना नाहीशा होतात. चालतांना आई आणि माझ्या गप्पांमध्ये आता कोणतीच बाधा येत नाही. सोबत आता एक तिसरी आनंददायी मैत्रिण आली आहे. ती म्हणजे माझी दुखरी टाच. एरवी सतत हसणारी ही मैत्रिण आईची साथ सोडताच रागवते. आई असेपर्यंत या हस-या मैत्रिणीने कायम मला साथ द्यावी, असे मला –हदयापासून वाटते.

(टाचदुखी बंद होण्यासाठी अस्थिरोगतज्ञांनी दिलेल्या गोळ्या मी फेकून दिल्या आहेत.)

माझे गाव.. तुमचे महानगर


हिरवा शालू नेसलेले डोंगर, हिरव्या लाटांना खेळवणारे धानाचे मळे, डोंगरमाथ्यावर मायेचे हात फिरवत पुढे सरकरणा-या ढगांच्या रांगा आणि मोहित करणारे स्वप्नाळू धुके पाहून मी पूर्ण रिता-रिता होऊन जातो. गार वा-याच्या साक्षीने गायी हुंदडत असतात. गायींच्या अंगाखाद्यावर शुभ्र पक्षी खेळतात. रानफुलांभोवती फुलपाखरे पिंगा घालतात. हिरव्या गवतांच्या विशाल चादरीवर लाल-काळ्या मातीने सजवलेल्या पायवाटा माझी वाट बघतात. हे क्षण सुटू नयेत, हे स्वप्न मिटू नये असे मला सतत वाटते.

कामानिमित्ताने मात्र गावाबाहेर पडावे लागते. दुग्धरंगी धबधब्यांनी न्हाऊन निघालेल्या कडेकपारींना मागे टाकत रेल्वे आता कसारा घाट सोडून महानगराच्या दिशेने निघाली होती. निसर्गाचे ते हिरवे स्वप्न हळूहळू धुसर होत गेले. रेल्वेरुळांच्या खडखडाटात माझ्या –हदयातील धडधड मला देखील जाणवत नव्हती.

लावण्यवतीच्या चेह-यावर हजार कांजण्यांचे पुरळ उमटावे तशा डोंगरांच्या आजूबाजूंनी इमारती अस्ताव्यस्त उभ्या होत्या. झुरळांसारख्या धावणारे सिटीझन, शापित काळेशार पाणी असलेल्या गटारी नासके रक्त वहावे तशा दिसत होत्या. त्यातून मरणयातना देणारा तो दर्प क्रूर वाटत होता. हजार अळयांना घेऊन सडलेल्या मासाच्या तुकडयासकट बेभान धावणा-या रानमांजरांप्रमाणे लोकांना घेऊन पळणा-या लोकल,रेल्वे मला असह्य करीत होत्या. मी घाबरून गेलो. इलाज नव्हता. गावाला तात्पुरता विसरून मी रेल्वेतून उतरलो. माणसांच्या लाटेचा एक भाग झालो. त्या गोंगाटात काही काळापुरता माझा गाव, माझे मन, माझे –हदय वितळून गेले. आणि आता एक “भारतीय” गर्दीत “इंडियन” झाला होता.

शेतकरी व बैलातला फरक नाहीसा होतोय




राज्याच्या शेतीचा कणा असलेल्या बैलांचा उद्या सण. पोळा म्हणजे बैलांची दिवाळी. शेतकरी राजा बैलांची मनोभावे पुजा करतो. बैलाविना पोळा साजरा करणा-या परिवारात मातीच्या बैलांची पुजा करून गोड जेवणाचा नैवेद्य दिला जातो.

राज्याच्या शेतीचे चित्र पाहिल्यास बैलांची संख्या झपाटयाने घटते आहे. ट्रॅक्टर वाढत असले तरी बैलांचा सांभाळ करण्याइतकी देखील चारा-पाण्याची सुविधा नसल्यामुळे असंख्य शेतकरी बैलाविना आहेत. शेतक-यांना स्वतः जगणं असह्य झाल्यामुळे बैल सांभाळणे ही आवाक्याबाहेरची बाब झाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्याच अधिकृत अहवालाचा संदर्भ घेतला तर १९९२ मध्ये बैलांची संख्या राज्यात ६४ लाख होती. २००३ मध्ये ६२ लाख झाली आणि त्यानंतर २००७ मध्ये हीच संख्या ५५ लाखांवर आली. आता ही संख्या अजून झपाटयाने खाली जाते आहे.  दुष्काळाविना हजारो बैलांना कत्तलखान्याकडे पाठवले जाते. दुसरीकडे जगण्याची दिशा हरवलेले शेतकरी आय़ुष्य संपवतात. २०११ मध्ये देशात १४२००७ शेतक-यांनी आत्महत्या केल्या. २०१२ मध्ये महाराष्ट्रातील ३७८६ शेतक-यांची आयुष्ययात्रा संपली. अशाही वातावरणात पोळा दरवर्षी हूरूप देतो. शेतकरी आणि बैल दोघे जण यादिवशी आपले दुःख विसरून आनंदाच्या डोही डुंबतात. भारतीय सण म्हणजे दुःखावर घातलेली मायेची फुंकर असते. पोळा सण त्यापैकीच एक...!

(जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव असा कृषीप्रधान देश आहे की जेथे आर्थिक संकटात सापडल्यावर बैल शेती सोडून कत्तलखान्याकडे जातात. तर, शेतकरी शेती सोडून स्वर्गाकडे जातो.)

सोने,हिरे,माणिक,पाचूने सजलेले अंगण


आधुनिक भारत सुखाच्या शोधात आहे. सुखाच्या व्याख्या देखील माणसागणिक विविध आहेत. व्याख्येप्रमाणे-इच्छेप्रमाणे सुख मिळालेली माणसं बरीच असतात. पण, त्यांच्या चेह-यावर तो आनंद दिसत नाही. तथाकथित सुख त्यांना इतरांना वाटता येत नाही. ते सुख नकली-बेगडी-फसवं असतं. नाशिकचे वृक्षमित्र शेखरकाका गायकवाड यांना इच्छेप्रमाणे सुख मिळालेलं आहे. त्यांचे अंगण सोने,हिरे,माणिक,पाचूने सजलेले आहे. शेखरकाकांच्या या श्रीमंत अंगणात लोकांना प्रवेश असतो. लोक मिळेल तेव्हा ते सुख घेऊन जातात.

शेखरकाकांनी झाडे आणि पशूपक्ष्यांनी आपले अंगण सजवले आहे. त्यालाच ते आपली संपत्ती मानतात. सागापासून ते रक्तचंदनापर्यंतची झाडे त्यांनी जोपासली आहेत. किंगफिशर-भरद्वाजपासून ते पोपटापर्यंत सर्व पक्षी तेथे विहार करतात. खारूताई निर्धास्तपणे फिरतात. सतत आठ वर्ष राबून शेखरकांकांनी सार्वजनिक जागेवर ही बाग स्वतः उभी केली आहे. झाडे विकत आणून, स्वतः दोन वेळ पाणी टाकून रोज देवपुजा करावी, तशी ही बाग शेखरकाकांनी निसर्गपुजेतून सजवली आहे.

निसर्गसुखाच्या मागे लागलेल्या शेखरकांकांना अंगणात भरभरून सुख मिळते आहे. मधमाशांचे थवे, रंगीत भुंगे, नाना रंगाची फुलपाखरे तेथे फिरत असतात. कोकिळेच्या मंजूळ आवाजात इथे देशी,विदेशी,आयुर्वेदिक,जंगली झाडे वाढतात आणि फुले मुक्तपणे फुलतात. पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी पाणवठे आहेत. आता येथे १३० प्रकारची झाडे मुक्तपणे जगत असून अंगणात भेटी देणा-या देणा-या  पक्ष्यांच्या जाती ३३ वर पोहोचल्या आहेत. नाशिकमधील दर्दी वृक्षप्रेमी या अंगणात मनाला वाटले तेव्हा येतात. आनंदी होतात. घरी जाऊन झाडे लावत इतरांनाही आनंद वाटतात. शेखरकाका हे पाहून आनंदाच्या घनदाट जंगलात स्वतः हरवून जातात.

(साधे वेल्डरकाम करून प्रपंच चालवणारे शेखरकाका काही वर्षांपूर्वी वेल्डिंग केलेले दारे-खिडक्या हातगाडयावर टाकून तो गाडा शहराच्या रस्त्यातून लोटत नेत असत. कष्टातून आता शेखरकाकांनी प्रगती केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी तयार केलेल्या या अंगणात पूर्वी एक मोठी कचराकुंडी होती.)

महाराष्ट्राच्या कन्या क्रीडाजगताची आयडोल



छोटया गावातून आलेली आणि नाशिकला देशाच्या क्रीडा जगतात मानाचं स्थान मिळवून देणा-या संजीवनी जाधव विषयी ग्रामीण भागातील मुलींमध्ये कमालीचं कुतुहल आहे. डिसेंबर २०१३ मध्ये ब्राझिल येथे झालेल्या वर्ल्ड स्कुल गेम्स ऑलिम्पियाडमध्ये ३००० मीटर अंतरासाठी संजीवनी धावली. संजीवनीनं  ब्राझिलमधील  हे अंतर १० मिनिट ०८.२९ सेकंद इतक्या वेळेत पूर्ण करून रौप्य पदक मिळवलं. संजीवनीची मी छोटीशी घेतलेली ही मुलाखतः

ब्राझिल गाजवणारी संजीवनी आहे तरी कोण, अशी बरीच चर्चा क्रीडाजगतात सुरू असते.
संजीवनीः सध्या मी भोसला मिल्ट्री कॉलेजमध्ये बारावी शिकतेय. आज वयाच्या १८ वर्षात मिळालेलं हे यश तसं खूप नाही. आई इयत्ता दहावी शिकलेली. भाऊ सुरज हा मॅकेनिकल इंजिनिअरिंग करतोय.

बेस्ट अॅथलीट म्हणून तू आता देशपातळीवर पुढे येत आहे. लहाणपणापासून तुला धावण्याची आवड आहे का?
संजीवनीः मी वडाळीभाई गावच्या शाळेत पाचवीला असतांना शर्यतीत भाग घेतला. ३ कि.मी. स्पर्धेत मी तेव्हा पहिली आली होते. पण गम्मत म्हणजे मी उत्कृष्ठ कुस्तीपटू होते. वडील कुस्तीगिर असल्याने ते मला लहाणपणापासून धडे देत होते. मला कुस्तीत पुढे जायचं होतं पण प्रशिक्षक मिळत नव्हता. पुढे सातवीत असतांनाच कुस्ती सोडली आणि रनिंगवर लक्ष देत गेले.माझा रनिंग स्टॅमिना आणि धावण्याचे कसब याची माहिती भोसला मिल्ट्री स्कुलचे एथलेटिक्स कोच विजेंदरसिंग यांना समजली. त्यांनीच मला भोसलात प्रवेश घ्यायला लावला. मी गाव सोडलं आणि इकडे नाशिकमध्ये येऊन प्रॅक्टिस करू लागले.

कशी करतेय प्रॅक्टिस ?
संजीवनीः  सकाळी ३ तास आणि संध्याकाळी ३ तास सराव करावा लागतो. अभ्यास देखील सांभाळावा लागतो. शरीर थकलं भागलं तरी सराव सोडता येत नाही. नाशिकच्या मैदानावरून सध्या मुली मोठया प्रमाणात एथलेटिक्समध्ये पुढे येत आहेत. त्या जास्त कष्ट घेतात. कविता राऊत दिदी हे त्याचंच एक उदाहरण आहे. आमचे सिंगसर खूप काळजी घेतात. आमचे कष्ट आणि सरांचं मार्गदर्शन जुळून येतं.

ब्राझिल गाजवलं आता पुढे काय?
संजीवनीः ती स्पर्धा माझ्यासाठी अंतिम नव्हती. बरोबर अजून दोन वर्षांनी ऑलिम्पिक भरणार आहे. सध्या डोक्यात तेच भरलेलं आहे. मैदानावर आलं की ऑलिम्पिकचा आवाज घुमत असतो. मी खूप ताकदीने त्यासाठी सराव करतेय.

हे झालं धावण्याचं; पण करियरविषयी काही ठरवलंय का?
संजीवनीः होय. मी युपीएससी देणार आहे. भविष्यात आयएएस होण्याचं माझं टार्गेट आहे. हे सर्व करतांना गावाला मी विसणार नाही. मला वाढवणारी नाशिकची भूमी सदैव माझ्या तनामनात भरून राहिली आहे. माझ्या खेळातील आणि शिक्षणातील अचिव्हमेन्टसचा फायदा सामान्यांना पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी पुढे करेन.

(मुलाखत संपली होती. संजीवनीने मैदानाकडे धाव घेतली. चांदवडच्या वडाळीभोई गावातील शाळेत माझे वडील श्री.बाबुराव जाधव हे साधे शिक्षक आहेत.)

एका इंजिनियरने शेतीसाठी सोडले शिक्षण



भारतीय शेतीचे शास्त्र अजब आहे. शेतीत नशिबाचा खेळ चालू असतो. भरपूर शेती आणि सिंचन सुविधा असूनही शेती सोडून महानगरात स्थिरावलेली शेतकरीपूत्र येथे आहेत. दुस-या बाजूला छोटया शेतीत राहून हजार समस्यांचा सामना करीत उदरनिर्वाह करणारे शेतकरीपूत्र आहेत. मात्र, बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर प्रांतात शेती करणारा नितीन ब-हाटे हा एक आदर्श शेतकरी आहे. नितीनरावांनी शेतीसाठी चक्क इंजिनियरींगचे शिक्षण सोडले आहे.

नितीन म्हणतो, “ माझे काळ्या आईशी लहानपणापासून नातं आहे. शेतीत गेल्याशिवाय दिवस सुना-सुना वाटतो. मात्र, वडिलांच्या इच्छेने मी शिकत होतो. बारावीनंतर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगला नंबर लागला. मी पहिले दोन वर्षे कसे तरी इंजिनियरिंगचे केले. शेतीच्या प्रेमामुळे तिस-या वर्षी नापास झालो. नापास होणं ही शेतीत पूर्णवेळ परतण्याची नामी संधी होती. मी शिक्षणाला रामराम ठोकला.”

“इंजिनियरिंग सोडताच मी शेतीचा शास्त्रीय अभ्यास केला. माझ्या जमिनीचे माती परीक्षण केले. जमिनीत कोणत्या खतांची कमतरता ते ओळखले.सेंद्रिय,रासायनिक आणि जैविक अशा तीन पातळ्यांवर शेतीत काम सूरू केले. जमिनीचा पोत सुधारला. हवामानाचा, पिकांचा, रसायनांचा, बियाण्यांचा अभ्यास केला. इंटरनेटच्या माध्यमातून माहिती घेत गेलो. मी इंजिनियरिंग सोडल्यानंतर अवघ्या गावाने मला वेडयात काढलं आणि पोरगा वाया गेला, असं हिणवलं होतं. आता तेच गाव माझ्या शेताचे प्रयोग पाहून पुढचं नियोजन करीत आहे. मी शेती खूप आनंदी आहे.”

(अवघ्या २९ वर्षाच्या या तरूणाने १५ एकर जमिनीतून गेल्या वर्षी १५ लाख रुपये उत्पन्न मिळवले आहे. म्हणजेच प्रतिमहिना सव्वा लाख रुपये. शेतीत तरूणांना पैसा मिळतो; पण तुमच्या शर्टला परफ्युमचा नव्हे तर घामाचा वास यायला हवा...!)

एक चंदन झिजते आहे. पण...



आज-काल कुणीही स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणून घेतो. खरं तर बहूसंख्य कार्यकर्ते माणूस म्हणण्याच्या लायकीची देखील नसतात. त्यात समाजासाठी उभं आयुष्य अर्पण करणारे मोजकेच सापडतात. ते खरे सामाजिक कार्यकर्ते असतात. सुंदर,आनंदी,मानवतावादी समाज या कार्यकर्त्यांमुळे आकाराला येत असतो.

नाशिकमध्ये अशीच एक दुर्लक्षित सामाजिक कार्यकर्ती आहे. त्यांच नाव शैलाताई कुलकर्णी. आणीबाणीच्या शैलाताईंनी भूमिगत कार्यकर्त्यांबरोबर काम केलं. पुढे शिक्षण सोडून त्या सेवाभावी आमदार बापू उपाध्ये यांच्या कार्यालयात कार्यकर्ती म्हणून जाऊ लागल्या. बापूंचे बंधू नानासाहेब नाशिकला अनाथ बाळांसाठी आधाराश्रम चालवत होते. १९८१ मध्ये शैलाताई मग आधाराश्रमात जाऊ लागल्या. तेथे त्या पडेल ते काम करीत असत. अनाथ बाळांना दत्तक घेण्यास समाजात कुणीही तयार नसल्याचा तो काळ होता. लोकांचे प्रबोधन करण्याच्या कामात शैलाताई आघाडीवर होत्या. अनाथ बाळांसाठी आई-बाबा शोधणे, त्यांना दत्तक मुलाचं महत्त्व पटवून देणे, दत्तक गेलेल्या बाळांच्या घरी भेटी देऊन परिस्थितीचा मागोवा घेणं, अशा कामांमध्ये शैलाताईंनी वाहू घेतलं. पैसा, पद, मानपानाचा कुठेही लवलेश नव्हता.

त्या काळात एमएसडब्ल्यू झालेले मुले-मुली अनाथाश्रमात काम करीत नसत. या कामात पैसा मिळत नसे. शैलाताईंनी आधाराश्रमात दिवसभर काम करून सायंकाळी कॉलेजला जाणे सुरू केले. सायंकाळी ६ ते ८ असे कॉलेज करून त्या समाजशास्त्रात एम.ए. झाल्या. उभं आयुष्य समाजकार्यात जात होतं. १९९४ मध्ये नाशिकच्या आधाराश्रमात शासनाकडून शिशुगृह विभाग सुरू झाला. तेथे एमएसडब्लू पदवी असेल तरच कामावर ठेवण्याचा शासनाचे बंधन होते. शैलाताईंच्या हाताशी पदवी नव्हती.  शैलाताईंनी पुन्हा शिक्षण चालू केले. त्या एमएसडब्ल्यू झाल्या. शैलाताईंना आधाराश्रमाकडून पाठिंबा मिळत गेल्यामुळे त्याचं काम फुलत गेलं. आज त्यांच्या या जिवनाच्या प्रवासात ७०० अनाथ बाळांना आई-बाबा मिळाले आहे. किती भव्य हे काम आहे. कोणत्याही पुरस्काराने हे कामकाज मोजता येणार नाही.

(अनाथ मुलांना आई-बाबा शोधण्याच्या या कार्यात शैलाताई अविवाहित रहाणे पसंत केले. त्यांना पुढे कर्करोगाने ग्रासले. चंदनासारख्या त्या झिजल्या आहेत. या व्याधीवर जिद्दीने मात करीत शैलाताई आजही कामावर जातात. १९८१ पासून ते २०१४ पर्यंतच्या या प्रवासात शैलाताईंकडे तोच उत्साह, तीच जिद्द, तीच आस्था आणि तोच आनंद कायम आहे. आजही त्या अनाथ मुलांमध्ये रमतात. कुठेही प्रसिध्दी नाही की पद नाही. कुठेही पुरस्कार नाही की संपत्ती नाही. असा असतो सामाजिक कार्यकर्ता.)