Saturday, 5 August 2023

सह्य प्रदेशातील सखीचे हळवे रुप

🌷 _सह्य प्रदेशातील सखीचे हळवे रुप_ 

कात टाकलेल्या रुपवान नागणीसारखी अचानक ती समोर आली आणि मी दचकलो. पण, त्याचवेळी तीची भेट झाल्याचा आनंदही झाला होता. 

मी आनंदी आणि ती नाराज होती. काही बोलायचं सोडून तीने मात्र उद्वेगाने माझ्यावर प्रश्नांची सरबत्तीच केली, 

ती : “यात्रिका, हे तुझं वागणं किती विचित्र आहे. दरवेळी माझा जीव असा टांगणीला का लावतोय? आधुनिक वसाहतीत तुझी होणारी घुसमट इथल्या निसर्गात विरघळून टाकण्यासाठी तू जंगलात येतोस हे मान्य. पण, अरे या निसर्गाच्या गाभाऱ्यात फिरता फिरता सहज कोणत्याही भागाकडे जाणे तुला धोक्याचे का वाटत नाही..?"

मी : “आधी तू थोडे शांत होशील का? काही तासांपासून मी तुला शोधतो आहे. हवेत हलका पाऊस आणि मऊ गारवा आहे. पण, तुझ्या शोधात मी वेड्यासारखा फिरून घामाने चिंब झालो आहे. धुके आणि हिरवाईनं हा निसर्ग नटलेला असताना तू मात्र सापडत नव्हती. मी चिंतेत भटकत होतो. त्यामुळे मला या शीळेवर थोडा विसावा घेऊ दे. तुझ्या साऱ्या प्रश्नांना मी उत्तरे देईन.” पर्वत धारेतील सोंडेच्या एका गोलाकार छोट्या पठारावरील शीळेवर थकलेले शरीर सोडत मी उत्तरलो. 

माझ्याकडे दुर्लक्ष करीत ती म्हणाली : "यात्रिका, किती वेळा मी तुझी आर्जव केली. सह्याद्रीच्या कुशीत हजारो वाटा फसव्या आहेत. काही शापित, काही कातळ कड्यात नेणाऱ्या, काही अंधारबनात नेणाऱ्या. तू शोधत असलेल्या समाधान, शांतीच्या स्त्रोताकडे त्यातील अनेक वाटा जात नाहीत. त्या तुला भुलवतात आणि देतात फक्त यातना, दुःख. पण, तू निसर्गात बेधुंद होतोस. मी आणि त्यांच्यातला हाच फरक तू अनेकदा अचानक विसरतोस. मला सोडून फसव्या वाटांच्या सापळ्यात अडकतोस."

मी तीचं बोलणं श्वास रोखून ऐकत होतो. तीच्या रागात माया दडलेली होती. “तू मागे सालेरीला गेलास पश्चिमेला असलेल्या सालोटा दुर्गाला जाण्यासाठी मी उजवीकडे उभी असताना तू दुर्लक्ष केले आणि धुंदीत डावीकडे गेलास. पवित्र रायरीला जाताना बोराट्याच्या नाळेत तू रफी साहेबांची गाणी गात होतास. नाळेत कातळांच्या ठिकाणी मी नसल्याचे पाहून तुला यत्किंचितही भीती वाटली नाही. डावीकडे बालेकिल्ल्याच्या बाजूला तू माझा शोध घेतला नाहीस. उलट गाणं म्हणत समोर कोकणदिव्याच्या डोंगररांगाखालील जंगलात भटकत गेलास. जावळीच्या खोऱ्यात मला पवित्र मानतात आणि कोणीही माझ्याकडे दुर्लक्ष करीत नाही. तू मात्र फुलपाखरांच्या झुंडीमागे जंगलात निघून गेलास. तू भानावर ये. एरवी कधी तू त्या पाळंदे काकांचे, कधी उषाप्रभाताईंचे गोडवे गात असतो; पण त्यांच्यासारखा वागतो का? ती माणसंदेखील सह्यवेडी होती. पण, मला सोडून ती अशी स्वतःहून भरकटली नाहीत."

तीच्या या साऱ्या युक्तिवादाने मी अवाक् झालो. माझा थकवा पळून गेला आणि काय उत्तर द्यावे या विचारात मी पुन्हा गुंग झालो…!

(क्रमशः)

✒️मनोज कापडे, 
सह्याद्री पर्वतरांगा, पुणे.
९८८११३१०५९
🏞️🌞🦚🕊️🕊️🕊️

Thursday, 6 July 2023

धुक्यातील नदी

🌷सह्याद्रीच्या कुशीतील आजच्या भटकंतीत ही घाटवाट मला मनोहारी निसर्ग भूमिकडे घेऊन गेली. हिरव्याकंच डोंगर रांगामधील धुक्यात तेथे नदी अगदी निवांत पहुडली होती..!

🏞️⛺🪢🦚🕊️🕊️🕊️

Friday, 30 June 2023

सह्याद्रीचे विचारपुष्प ९

 


🌷सह्याद्रीचे विचारपुष्प ९ :

" सह्याद्रीला यातना कमी नाहीत. लोक कुऱ्हाड चालवतात. आगी लावतात. वणवे पेटतात. उन्हाळा भाजून काढतो. पण, माझा सह्याद्री सुडाने पेटत नाही. तो कुणाचा तिरस्कार, क्रोध करीत नाही.


पहिल्याच पावसानंतर सह्याद्री सारी दुःख विसरून आपल्या माळरानावर पुन्हा हिरवाई आणण्यासाठी  स्वतःला गुंतवून घेतो. हे झुडप बघा पहिल्याच पावसानंतर कसे ठाम उभे राहिले आहे. 


माझ्याही मनात एक माळरान आहे. त्यासाठी जगाला दोष न देता या माळरानाचे नंदनवन करण्यासाठी परिश्रम घेईल. माळरान वाढू न देता तेथे मी  आनंदाचे बी रुजवेन. त्याला चैतन्याची कोमल पालवी आणेन. या पालवीत मग विवेकाचे पक्षी गाणे गातील. निर्मळ व्यवहाराच्या काडीने हृदयी आत्मानंदाचा एक खोपा गुंफेल. आणि, त्याकरिताच या अनमोल सह्य सृष्टीच्या सतत सान्निध्यात राहीन."


🏞️⛺🪢🦚🕊️🕊️🕊️


Wednesday, 28 June 2023

सह्याद्रीचे विचारपुष्प ८

🌷 _सह्याद्रीचे विचारपुष्प ८_ : 

 "भटकंती करताना तेव्हा ही वाट काटेकुटे आणि पानगळीने माखलेली होती. आता ती पाचूपर्ण पालवीने वाट सजलेली आहे. पर्वतरांगेतील त्या स्थानिक माणसाने तेव्हा चुकीची वाट दाखवून मला दुःख दिले होते. आता मात्र तो भाजीभाकरी, पाणी घेऊन योग्य वाट दाखविण्याकरीता माझ्यासाठी त्याच घाटमाथ्यावर ताटकळत उभा असतो.

 _कोणताही माणूस आणि कोणतीही वाट सतत सारखी राहू शकत नाही._ काळ-वेळ परिस्थितीनुसार ते बदलू शकतात. आणि म्हणून कधी दुःख तर कधी सुख देणारी बदलती माणसं, बदलत्या वाटा आनंदाने स्वीकारायला तुम्ही सतत तयार रहायला हवे."

🏞️⛺🪢🦚🕊️🕊️🕊️

सह्याद्रीचे विचारपुष्प ७

🌷सह्याद्रीचे विचारपुष्प ७ : 

गर्दीत, समूहात नसला तर कधीही घाबरु नकोस; गर्दी पुढे गेल्यानंतर मागे उरलेली असीम शांतता तुझ्या मालकीची आहे.

🏞️⛺🪢🦚🕊️🕊️🕊️

एक प्रभात आणि एक सांज



एक प्रभात आणि एक सांज 

पर्वतावर प्रभात झाली होती. ते काय आहे याचा शोध मी घेऊ लागलो. नाही ते धुकेच होते; पण वणवा पेटल्यानंतर धुराचे लोळ उठावेत आणि आसमंताला भिडावेत तसे ते दृश्य होते. शुभ्र बदकाची पिले आईमागे एका पाठोपाठ ओळीने रस्ता ओलांडतात जावीत त्यासारखा तो नजारा होता. धुक्याचा एक महाकाय गोळा घाटमाथ्यावरून थाटात दरीत उतरला. तीच धुक्यांची राणी असावी. त्यानंतर त्यामागोमाग तिचे अनेक पुंजके पिलांसमान दुडूदुडू धावत तो डोंगरमाथा ओलांडत आणि मग दरीत झेपावत होती. वाटले की याच धुक्याचा एक पुंजका असतो तर किती उधळलो असतो ना!

इकडे काही कृष्णमेघांनी सूर्यप्रकाश उगाच अडवून धरला होता. त्यामुळे गारवा वाढला व पर्वताने स्वतः आपली हिरवी चादर ओढली होती; पण ती अपूर्णच होती. काही केल्या त्याचे शरीर झाकले जात नव्हते. घाटमाथ्यावरच्या या धुक्यात आणि ऊन सावल्यांचा कधी मंद तर कधी वेगवान सरी अंगाखांद्यावर खेळवत मी माझा सारा दिवस उधळून टाकला.

आता सायंकाळ झाली होती.
पर्वत उतरताना एका झोपडीसमोर किती तरी वेळ रेंगाळलो. तेथे उदयाच्या सूर्य गोळ्यासमान एक दिवा लटकत होता. त्यामुळे तो अवघा परिसर स्वप्नातील महाल भासत होता. 

सह्याद्रीच्या कुटीत
आज सूर्य निजला होता
आहे आकाश साक्षीला
आज पर्वत लाजला होता

विलासात या सृष्टीच्या
शुभ्र धुके उधळते अंगणी
अवतरली ही बेधुंद सांज
हरवलीस कुठे सह्य साजणी 


त्या पर्वरांगांमध्ये आकाराला येणाऱ्या नवसृष्टीतील सत्य शोधायला पुन्हा येईन, असे ठरवून मी ती मदभरी सांज अनिच्छेने तेथेच सोडली; आणि उतराईच्या वाटेने चालू लागलो..!

- मनोज कापडे,
सह्याद्री पर्वतरांगा, पुणे,
तारीख २६ जून २०२३

पहिला मॉन्सून

🌷आज सह्याद्रीच्या कुशीत मॉन्सून आगमनाचा सोहळा पार पडला. कोकण पादाक्रांत करीत मॉन्सूनने घाटमाथ्यावर आरोहण केले.

 सुरुवातीला नैऋत्य दिशेला श्यामश्वेत मेघांनी गर्दी केली. पण, ते बरसत नव्हते. त्यानंतर रुसलेल्या मेघांची समजूत काढण्यासाठी एक शीतल पारदर्शक दुलई घेऊन वारा आला. तो मेघांना बरसण्यासाठी विनवू लागला. ती विनंती फळाला आली.

 आता पर्वतरांगेच्या मुखासमोर बरोबर मध्यभागी पठारी भागात मॉन्सूनच्या धारा बरसू लागल्या होत्या. डोंगर माथ्यावरून दिसणारा मॉन्सूनचा तो पहिला अभिषेक पाहून मी प्रसन्न झालो. नतमस्तक झालो. आनंदाच्या सह्य धारेत पहिल्या जलधारांसोबत चिंब बागडलो. 

ऐसी ही पवित्र भटकंती अमृत धारासंगे सफल जाहली..! 
🏞️⛺🦚🕊️🕊️🕊️

Saturday, 24 June 2023

मॉन्सून रुसला

🌧️मॉन्सून रुसला आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात पाण्याची तीव्र टंचाई भासते आहे. डोंगर उजाड आहेत. डोंगरधारांवर निष्पर्ण वृक्ष पावसाची वाट पहात आहेत. जनावरांना आता 
हिरवा तर नाहीच नाही; पण कोरडाही चारा कुठे राहिलेला नाही. भटकंतीच्या वाटेत चाऱ्याच्या शोधार्थ रानोमाळ फिरणारी एक काळीमाय दिसली. एका उजाड गोठ्यात तप्त उन्हात सर्जा राजा हताश बसलेले होते..! 🏞️⛺🕊️

Wednesday, 21 June 2023

अश्रूंचा पाऊस

🌷अश्रूंचा पाऊस 

सह्याद्रीचा एक छोटा घाट चढून एका गावाकडे जाणाऱ्या सडकेवर मी पोहोचलो. दुतर्फा गच्च झाडी होती आणि समोरच्या शुभ्र धवल धुक्यात एक काळाशार रस्ता अंतर्धान पावत होता. 

हलका पाऊस झाल्याने गारवा वाढला होता. सकाळचे साडेसहा वाजले होते. त्या धुक्यात अचानक हालचाल दिसली. एक मानवी आकृती हळूहळू समोरून येताना दिसली. त्या आकृतीचा डोक्या कडचा भाग मात्र खूप मोठा होता. ते एक भले मोठे बोचके होते. मीही चालत होतो. आकृती समोर आली आणि मी थक्क झालो. डोंगरात घर करून पशुपालन करणारे ५०-५२ वर्षांचे ते एक गुराखी बाबा होते. भल्या पहाटे दूध काढून दुधाच्या छोट्यामोठ्या किटल्यांचा एक भारा त्यांनी तयार केला होता. ३०-४० लिटरचे ते बाचके डोक्यावर घेत बाबा गावाकडे निघाले होते. ते थकलेले होते आणि त्यांना धाप लागली होती. इतके ओझे असूनही बाबांनी माझ्याकडे दुर्लक्ष केले नाही. आस्थेवाईकपणे चौकशी केली. 

 बाबा म्हणाले, " मी असा रोज सहा- सात किलोमीटर चालत जातो आणि गावात दूध देतो. तेच दूध आणि त्याचा तुम्हाला शहरात मिळतो."

मी : बाबा, पण या वयात धावपळ कमी करायला पाहिजे.
बाबा : धावपळ केली नाही तर जगू कसा? आणि, हे आता रोजचं झालं आहे. माझे वडील असेच डोंगरातून दूध वाहून न्यायचे. तेव्हा बैलगाडीची कच्ची वाट होती. ही डांबरी सडक आता झाली आहे. खरं तर हा दूध धंदा परवडत नाही. राब राब राबून लिटरला ३०-३५ रुपये मिळतात. तुम्ही शहरात हेच दूध ६०-७० रुपयांनी विकत घेतात.

बाबा व्यथित झाले होते. त्याच्या डोईवर बोजा होता. मी गोंधळलो. त्यामुळे पट्कन विषय बदलला.
 
मी : बाबा, पण तुम्ही चहा घेता की नाही? 
 बाबा : कामाच्या व्यापात चहापाणी कधी होतो; तर कधी नाही. पण, आता तुम्ही मात्र जमल्यास आमच्या झोपडीकडे जा. गरम चहा घ्या आणि मग पुढच्या वाटेला लागा. पुढे मग ४-५ तास वाटेत काही मिळणार नाही.

मी 'हो' म्हणालो. पण तिकडे गेलो नाही. बाबांनी चहा घेतलेला नव्हता आणि त्यांच्या पोटात अन्नही नव्हते. ते जीवापेक्षाही डोक्यावरच्या दुधाला जपत होते.
आता पाऊस बरसू लागला आणि भिजत, कुडकुडत ते दूधवाले बाबा डोक्यावरचा बोजा सांभाळत गोगलगायीप्रमाणे घाटवाट चढू लागले. धुक्यातून बाबांच्या धापांचा मंद आवाज येत होता. सह्याद्रीतील कथित दुग्धक्रांतीचे ते एक नागावलेले,शोषित साक्षीदार होते. 

 रस्ता ओलांडून मी जंगलाकडे गेलो. बरेच फिरून घाटातील दुसरी वाट पकडली आणि कासवाच्या गतीने मीदेखील घाट चढू लागलो. चालताना सारखी बाबांचीच आठवण येत होती. आभाळ आणि माझे डोळेही दाटून आले होते. आकाशातून हलक्या सरी येऊ लागल्या. माझ्या जुन्या आसवांमध्ये बांध हळूच फुटले आणि त्यात पावसाचे ताजे थेंब मिसळू लागले. माझ्या डोळ्यातून आता मुक्त धारा वाहू लागल्या. तो अश्रूंचा पाऊस होता..!

- मनोज कापडे
सह्याद्री पर्वतरांगा पुणे
तारीख २२ जून २०२३
🏞️⛺🦚🕊️🕊️🕊️

Monday, 19 June 2023

मॉन्सूनपूर्व जागी होणारी सह्य सृष्टी

🌷मॉन्सूनपूर्व जागी होणारी सह्य सृष्टी कालच्या भटकंतीत दिसली. कधी चंदेरी तर कधी श्यामल अशी निरनिराळी रूपं पर्वत घेत आहेत. नक्षीदार कीडे बाहेर पडले आहेत. काही फळे पिकून मातीत मिसळत आहेत पुनर्जन्म घेण्यासाठी..!
🏞️⛺🦚🕊️🕊️🕊️

सह्याद्रीचे विचारपुष्प ४

🌷सह्याद्रीचे विचारपुष्प ४ : 

सह्याद्रीसमोर आधी नतमस्तक व्हावे. शुद्ध आचारविचारांची साधना करावी. मग सह्य पर्वतरांगांच्या कुशीत मनसुखद, हृदयसंतुष्ट आणि चिंतामुक्त अवस्थांच्या जवळ नेणारी अनुभूती मिळवता येते. 🏞️⛺🦚🕊️🕊️🕊️

Saturday, 17 June 2023

शिडी


🌷आयुष्याच्या खडतर भटकंतीत इतरांच्या मदतीच्या, उपकाराच्या शिड्या अधूनमधून मिळतात; पण लांबच्या वाटा नेहमी स्वतः शोधायच्या, चालायच्या असतात..!🏞️⛺🦚🕊️🕊️🕊️

इंद्रवज्राच्या जन्मस्थानी

🌷इंद्रवज्राच्या जन्मस्थानी
            ......

भटकंतीत सह्याद्रीच्या नानाविध रुपांचा शोध लागतो. सह्य धारेत एकरुप झाल्यास स्तंभित करणारी दृष्य, थक्क करणारे देखावे, प्रसन्न वातावरण आणि अनोखी दुर्मिळ निसर्गचित्रे सापडतात. यातील काही दृश्य आणि काही चित्रे शौर्याला प्रेरणा देणारी, काही मनःशांती देणारी, काही अध्यात्माची समई तेवत ठेवणारी; तर काही निसर्गातील निरामय जीवनाचा नितळ परिचय करून देणारी असतात.

त्या दिवशी पर्वतरांगेतून मी चालू लागलो तेव्हा एका अज्ञात, गुढ जागी आलो. तेथे आजूबाजूंनी बेलाग पर्वतांचे सुळके दाटीवाटीने उभे होते. चोहू बाजूने कातळ भिंती असल्याने आणि आतल्या वाटीत एक जंगल, असा तो भूभाग होता. बाहेर तीव्र ऊन असताना सह्य धारेच्या त्या वाटीमध्ये अंधार होता आणि तेथे काळे ढग वावरत होते. सूर्य उदयाला येत असताना त्या काळ्याशार धारेची फक्त एक बाजू मात्र प्रकाशाच्या प्रवेशद्वारासारखी उघडी होती आणि तिथून सूर्यकिरण पर्वतरांगांमधील त्या वाटेच्या तळाला पोचत होते. तेथेच इंद्रवज्राचे जन्मस्थान असल्याचेही माझ्या लक्षात आले. त्यामुळे ती जागा अधिक पवित्र होती. चोहुबाजूने अंधार असताना पूर्वेकडून येणाऱ्या प्रकाशाचा प्रवाहाने सह्य धारेतील जंगलाचा केंद्रीय भाग उजळून टाकलेला होता. तोच भाग बघण्याची माझी इच्छा झाली. ती पूर्ण करण्यासाठी दाट जंगल कापत तेथे पोहोचलो. सूर्यकिरणांचा तो प्रकाश सोहळा मी डोळे भरून पाहिला. त्याच सोहळ्यात काही रानफळे मिळाली. शीतल झऱ्याचे पाणी मिळाले. मी किती तरी वेळ तेथेच विश्रांत, ध्यानस्थ होतो. अशा दुर्मिळ स्थळाची सफर घडवून आणल्याबद्दल मी सह्याद्रीचे हृदयपूर्वक आभार मानले. पूर्वेकडे असलेल्या निसर्गाच्या या गाभाऱ्यातून मी बाहेर आलो आणि वाट नसलेल्या जंगलातून पुन्हा पश्चिमेकडे चालू लागलो...!

- मनोज कापडे,
 सह्याद्री पर्वतरांगा, पुणे,
९८८११३१०५९,
 तारीख १६ जून २०२३.
🏞️⛺🦚🕊️🕊️🕊️

प्रिय वरुणराजा

🌷प्रिय वरुणराजा....

गेल्या पावसाळ्यात तू लवकर आला आणि पर्वतधारेच्या माथ्यावरील हे माझे आवडते झाड पानाफुलांचा गच्च मोरपंखी पिसारा फुलवून आनंदाने वाऱ्यासंगे डुलत वाढत गेले. तू चार महिने थांबलास; नंतरदेखील रेंगाळलास. त्यामुळे किती बरे वाटले या सह्य सृष्टीला. पण, सर्व दिवस सारखे नसतात.

आज तू सांगूनही आला नाहीस. इकडे पर्वतावर हे उंच झाड तृषार्थ आणि विषण्ण स्थितीत उभे आहे तुझ्याकडे डोळे लावून. त्याच्या झडलेल्या फांद्या हातात घेऊन ते कितीतरी दिवसांपासून तुझी वाट पहाते आहे. त्याला पालवी फुटली आहे; पण उष्ण हवेने आता त्या कोवळ्या पालवीचा दाह होतो आहे. 

काळे मेघ क्षणभर येतात त्याच्यावर सावली धरायला; पण त्यांनाही उनाड वारा हुसकावून लावतो आहे. मृग नक्षत्राच्या आधीपासून मी तुला शोधतो आहे. कळसुबाई, कुलंग, तारामती, राजगडाचा बालेकिल्ला अशा कोणत्याही धारेत तू सापडला नाही. रायरी ते जावळीच्या खोऱ्यातही तू नाहीस. काही नभ भेटतात तिकडे; पण ते बहुरूपी आहेत. तुझा भिमकाय काळाकभिन्न देह, त्यात सामावलेली गंगा आणि माथी वीज हे तुझे मूळ रूप. 

तेव्हा प्रिय वरुणराजा, आता तू लवकर ये. तुझा पुजक शेतकरीही धास्तावलेला आहे. सह्याद्रीच्या कुशीतील हा माझा प्रिय वृक्ष उन्मळून पडण्याच्या आधी तू ये. तुझ्या आगमनाची आम्ही सह्य भटकेही व्याकुळतेने प्रतीक्षा करीत आहोत. तुझ्या भेटीसाठी अधीर झालेल्या माझ्या नयनातील अश्रूचा पहिला थेंब पडण्यापूर्वी तू ये. मी भटका आहे रे; पण हे डोळे सह्याद्रीच्या मालकीचे आहेत ना. सह्य सृष्टी कासावीस झाली की ते आपसूक कधीही पाझरू लागतात..!

- मनोज कापडे,
सह्याद्री पर्वतरांगा, पुणे,
९८८११३१०५९
तारीख १७ जून २०२३
🏞️⛺🦚🕊️🕊️🕊️

Wednesday, 14 June 2023

राजाधिराज

🌷शिवरायांचे कैसे बोलणे । शिवरायांचे कैसे चालाणे । 
शिवरायांची सलगी देणे ।
 कैसी असे ।।

सकल सुखांचा केला त्याग । 
म्हणोनी साधिजे तो योग । 
राज्य साधनाची लगबग । 
कैसी केली ।।
......

पर्वतावरून उतरताना विस्तीर्ण पठारी भाग दिसत होता. तेथे एक विशाल वृक्ष मोराच्या पिसाऱ्यासमान डौलाने उभा होता. त्याखाली एक सोनेरी वस्तू चमकत होती. माझी उत्सुकता शिगेला पोहोचली. जंगलातून व पुढे पठारी भागातून खूप चालत गेल्यानंतर एका वाडीत पोहोचलो आणि बघतो तर ते प्रत्यक्ष राजाधिराज होते. ते त्या वृक्षाच्या पर्णसंभारातून बाहेर येताना दिसत होते. त्यांची चाल सिंहासमान आणि दृष्टी वाघासमान होती.

त्या पूर्णाकृती पुतळ्याभोवती काहीही देखावा, सजावट, रंगरंगोटी नव्हती. तरीही तो सारा पिंपळपार राजवाड्यासमान भासत होता. कोकणातील वाद्यापाड्या गरीब शेतकऱ्यांनी भरलेल्या असतात. मात्र, त्यांची शिवरायांवर निस्सीम भक्ती आहे. त्याची साक्ष हा परिसर देत होता.

आसपास कोणीही नव्हते. राजांना प्रणाम करून मी दुसऱ्या डोंगराच्या दिशेने पुन्हा चालू लागलो..!
🏞️🦚🕊️🕊️🕊️

Sunday, 11 June 2023

झळा आणि झुला

 

झळा आणि झुला
कातळरंगात चोहू बाजूंनी वेढलेल्या डोंगर रांगांच्या कुशीत मी भटकंती सुरू केली. सह्याद्रीत आज सूर्य रागवला होता आणि तळपत होता. त्यामुळे पायवाट, रस्ते, दगडधोंडे आणि माझे डोके असे आम्ही सारेच तापलो होतो.
पायवाटेला मी उद्वेगाने विचारले की, “अगं ताई, थोडे ऐकशील का माझे? रात्रभर प्रवास करुन शहरातून इथे आलोय. सकाळपासून चालतोय. या उन्हात आणखी किती चालायचे? तुला काही त्रास होत नाही का? कुठे तरी जंगलात गारव्याला ने. रानफळे दे. झऱ्याचे पाणी पाज.”
पायवाट हसली आणि माझी थट्टा करण्यासाठी आता ती एका उघड्याबोडक्या डोंगरधारेला अजून चिकटली. सूर्याच्या अगदी समोर असलेल्या कातळधारेकडे ती वाट हळूच वळली. त्यामुळे उन्हाची तीव्रता वाढली. आता जणू काही विराट वणव्यातून मी जात होता. उत्तर बाजूला सरळसोट तापलेली कातळभिंतीची बाजू, आणि दक्षिण बाजूने तप्त सूर्य होता. माझी थट्टा करणाऱ्या पायवाटेकडे मी केविलवाणे पाहिले. आणखी काही बोलावे तर ती अजून बिकट स्थळी नेईल, असे समजून मी गपगुमान पायवाटेबरोबर चालू लागलो.
कसरत करीत तो भाग मी पार केला. आता माझी सत्वपरीक्षा संपली होती. खोडकर पायवाट डोंगरापाठीमागे आली आणि शांत पसरलेल्या एका दाट जंगलात मला घेऊन गेली. मी पुरता हरपून गेलो. वाटेत गावरान आंबे, छोटी जांभळं, भरपूर करवंद असा मेवा मिळाला. उंबराच्या झाडाखाली डोहात पाणीही मिळाले. पुढे मग आम्ही तीन तास चालत होतो. जंगल सोडून डोंगरधारेने पुन्हा चढाई केली. काट्याकुट्यांनी वेढलेल्या एका चिंचोळी खिंडीत आलो.
खिंडीतून धाडधाड आवाज येत होते. कुणाचा तरी पाठलाग होत होता. मी चरकलो. एक हुप्या वेगाने माझ्याकडे आला. त्याच्या मागे त्याचेच तीन आडदांड भाऊबंद पाठलाग करीत होते. त्याला धाकदपटशा दाखवत होते. सारी माकडे म्हणजे काळ्या तोंडाची मोठी वानरं होती. साऱ्यांनी माझ्यावरच राग काढला तर काय, असा प्रश्न मला सतावू लागला. पण, पुढे काही झाले नाही. तिघे जेते आरोळ्या ठोकत निघून गेले. नंतर चौथादेखील हळुच जंगलात नाहीसा झाला. मी पायवाटेसंगे चालू लागलो.
मोठ्या उतराईनंतर विस्तीर्ण पठारी प्रदेशात येताच समोर डोंगर धारांची एक सुंदर वाटी दिसली. त्या वाटीत एक विशाल चंदेरी जलाशय होता. जलाशयासमोरील टेकडीवर एक प्राचीन मंदिर अज्ञातवासात असल्यासारखे उभे होते. ते मंदिर दुरून भव्य मूर्तीसमान भासत होते. निरांजनातील वात मंद तेवत असावी तसे ते डोंगरधारांच्या कुशीत उजळत होते. निळ्या आभाळाखाली त्याचा कळस म्हणजे सह्याद्रीच्या निर्मात्याला अभिवादन करीत होता.
निसर्गाच्या त्या नंदनवनात मी सारी दुपार भक्तिभावाने घालवली. सकाळपासून मला थकवणाऱ्या, चटके देणाऱ्या थट्टेखोर पायवाटेचे मी ह्दयपूर्वक
आभार मानले. ती हसली. तप्त झळांऐवजी आता त्या वाटेने मला थंडगार झुळूक मिळवून देणाऱ्या परिसरात आणून सोडले होते. तापलेली माती आणि दगडगोट्यांऐवजी गवताचे हिरवेगार गालिचे माझ्यासाठी त्या पायवाटेनेच पसरून ठेवले होते. जलाशय ओलांडून डोंगराची ती वाटी मला पार करायची होती. संध्याकाळपर्यंत डोंगरांपलीकडे पोहोचायचे होते.
माझ्यासाठी तो प्रांत अज्ञात होता. पण, पायवाटेला मात्र परिचित होता. तिच्यासोबत मी हिरवाईच्या त्या नयनरम्य प्रदेशातून पुढे चालू लागलो. वाऱ्याची झुळूक आता सतत आमच्याबरोबर एखाद्या खारुताईसारखी येत होती. सारा सह्याद्री एक झुला बनून वावरत होता आणि म्हणून पायवाटेसंगे आता मी चालत नव्हे; तर झुलत झुलत, डोलत डोलत तृप्त पावलांनी पुढे सरकत होतो..!
-मनोज कापडे,
सह्याद्री पर्वतरांगा, पुणे
तारीख १५ /०५/२०२३

सह्याद्रीचे विचारपुष्प २

🌷सह्याद्रीचे विचारपुष्प २ :  निसर्गाच्या बागेत सुंदर घर असते. ते आपल्याला मोहीत करते. मात्र, घरात रहात असलेल्या व्यकीच्या तळहाताचे फोड आणि पायाच्या तळव्याच्या भेगा दिसत नाहीत. 🏞️🦚🕊️

सह्याद्रीचे विचारपुष्प १

🌷सह्याद्रीचे विचारपुष्प १

सह्याद्री म्हणजे केवळ पर्यटन नव्हे; ते जीवनाचे गुरुकुलही आहे.

प्रतिकुल परिस्थिती असल्यास शहरी माणूस अस्वस्थ असतो. अस्वस्थ असल्यास तो स्वतःच हतबध्द असतो आणि इतरांना मदत करणे विसरतो.

मात्र, सह्याद्रीचे तसे नाही. प्रतिकुल स्थितीशी येथे सारे झुंज देत असतातच; पण दातृत्व विसरत नाहीत.

 रखरखत्या उन्हाळ्यात सह्याद्रीमधील झाडे भाजून निघतात; पण पुन्हा जिद्दीने पालवीला खेचून आणतात. या अवस्थेत प्रानिमात्राला रानफळे देतात. आटलेल्या नद्या, ओढे तहानतात; पण या स्थितीतही कुठे तरी जंगलाच्या कोपऱ्यात नितळ पाण्याचे प्रवाह सात्विक नितळता जपत ऊभे असतात. ते पशूपक्ष्यांची तहान भागवतात. 

..आणि म्हणूनच सह्याद्री हा महारठ्ठ देशवासीयांच्या महागुरूदेखील आहे..!

🏞️⛺🦚🕊️🕊️🕊️

Tuesday, 7 March 2023

साल्हेरच्या कुशीतील फुल


👆 निसर्ग वाचन :🌷                           पवित्र सातमाळ पर्वरांगांच्या कुशीत मनमुराद भटकंती केली.  महाराष्ट्राच्या कधी काळच्या वैभवी साम्राज्याचे प्रतीक असलेले हे गिरीदुर्ग पाहिले. साम्राज्य गेले, वैभव गेले; त्यामुळे आता हे भग्न गिरीदुर्ग दीर्घ तपाला बसलेल्या प्राचीन ऋषिंप्रमाणे दिसतात. अर्थात, या रानफुलांनी त्यांची पुजा आजही सोडलेली नाही. उन्हातान्हात ही रानफुले जिद्दीनं फुलतात आणि स्वतःला त्या गिरीदुर्ग चरणी आनंदाने अर्पण करून घेतात..!  🏞️⛺🦚🕊️🕊️🕊️

Thursday, 23 February 2023

सकाळ

👆 आजची प्रसन्न सोनेरी सकाळ..! 🕊️🦚😊🏞️

पांडुरंगाचे दर्शन

👆 भटकंती करताना एका गावाच्या बाजूला देऊळ होते. देवळाची भिंत भक्तीत तल्लीन झालेल्या वारकरी आणि विठुरायाच्या प्रसंगाने सुरेख रंगविली होती. त्या चित्राने अवघे गाव एक गाभारा बनले होते. त्यामुळे मूळ देवळात न जाताच पांडुरंगाचे मनोहारी दर्शन मला झाले.

 खरे तर महाराष्ट्रातील समस्त वारकरी म्हणजे आपले आद्य ट्रेकर्स.  आजचे ट्रेक आणि दिंडी यात फरक नसतो. आपण गडकोट आणि दऱ्याडोंगरांकडे धाव घेतो तर वारकरी संप्रदायाचे गडकोट हे आळंदी, देहू, त्र्यंबकेश्र्वर.    त्यांच्यासाठी पंढरपूर हा भक्तीचा एक बालेकिल्लाच..!

🕊️🦚😊🏞️⛺

सह्याद्रीमधील मर्सिडिज बेंझ

👆 सह्याद्रीमधील मर्सिडिज बेंझ :
  दऱ्याखोऱ्यात शेती करणाऱ्या गरीब शेतकऱ्याच्या दारात उभी असलेली ही बैलगाडी त्याचे खरेखुरे वैभव असते.   😊🦚🏞️⛺

Saturday, 18 February 2023

आमचा मावळा

👆 आमचा मावळा आज राजाधिराजांच्या शौर्य सहवासात होता..!    😊🦚🏞️⛺

Wednesday, 15 February 2023

पळस

👆तप्त उन्हात आणि उजाड रानात राजकुमारासारखा रूपवान भेटतो तो पळस वृक्ष..!

पावसाळ्यानंतर महिना दोन महिन्यात आधीचे मनोहारी हिरवेगार पर्वत पुरते उजाड होतात. त्यामुळे भटकंती करताना कधी कधी उदास माहोल तयार होतो. अशा वेळी जंगलात अचानक गर्द केशरी पळस फुले दिसली की मन मोहोरून जाते. उदासी विरून जाते आणि मन आनंदात चिंब भिजते. त्याचे गर्द रुप न्याहाळताना नयन दिपून जातात.

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सूर्यास्ताच्या वेळी नभांगण लाल, केशरी रंगाने भरून जाते. सूर्यास्तानंतर नभांशी सौदा करून ताजा केशरी रंग हा पळस धरतीवर आणत असावा आणि भल्या सकाळी नटूनथटून जंगलात डोलत इतरांना खिजवत असावा, असा माझा संशय आहे..! 😊🦚🏞️⛺

काजळ सांज

 


👆
हळूहळू काजळताना
शाम ही सुरंगी...
तुझे भास दाटुनी येती
असे अंतरंगी...

सह्यधारेने कालच्या काजळ सांजेला निर्मळ भटकंती केली. त्यावेळी एक सुंदर सखी (रानवाट) भेटली. तीच्यासंगे सूर्यास्ताच्या प्रदेशात चालत गेलो..! 😊🦚🏞️⛺


Wednesday, 8 February 2023

प्रसन्न सकाळ

स्वप्नात पाहिलेली सकाळ प्रत्यक्षात अनुभवायला मिळाली तर..?  असे झाल्यास निसर्गाच्या दारी पदरी पडलेली प्रसन्नता अवर्णनीय असते. आजच्या भटकंतीमधील अनुभवली ही धुंद सकाळ..!

 

Tuesday, 7 February 2023

सह्याद्रीपुत्र

👆 भटकंतीत सह्याद्रीपुत्र भेटला. त्याने त्याच्या थकलेल्या बाळाला कवटाळले होते..!      😊🦚🏞️

फुलांसगे

👆 हृदयी (गिरी) प्रीत जागते.. जाणता अजाणता..! काल या फुलांसगे होतो.   😊🦚🏞️

सूर्यास्त दर्शन

👆 काल पवित्र मुरुमदेव पर्वतरांगांमध्ये सूर्यास्त दर्शन घेतले..! 😊🦚🏞️

रानातले रस्ते

👆 भटकंतीत रानातले रस्ते अलगद मनात घर करुन बसतात. ते छोटे, काट्याकुट्याचे असले तरी भटक्यांसाठी निसर्गातील खरेखुरे समृध्दी महामार्ग असतात..! 😊🦚🏞️