🌷इंद्रवज्राच्या जन्मस्थानी
......
भटकंतीत सह्याद्रीच्या नानाविध रुपांचा शोध लागतो. सह्य धारेत एकरुप झाल्यास स्तंभित करणारी दृष्य, थक्क करणारे देखावे, प्रसन्न वातावरण आणि अनोखी दुर्मिळ निसर्गचित्रे सापडतात. यातील काही दृश्य आणि काही चित्रे शौर्याला प्रेरणा देणारी, काही मनःशांती देणारी, काही अध्यात्माची समई तेवत ठेवणारी; तर काही निसर्गातील निरामय जीवनाचा नितळ परिचय करून देणारी असतात.
त्या दिवशी पर्वतरांगेतून मी चालू लागलो तेव्हा एका अज्ञात, गुढ जागी आलो. तेथे आजूबाजूंनी बेलाग पर्वतांचे सुळके दाटीवाटीने उभे होते. चोहू बाजूने कातळ भिंती असल्याने आणि आतल्या वाटीत एक जंगल, असा तो भूभाग होता. बाहेर तीव्र ऊन असताना सह्य धारेच्या त्या वाटीमध्ये अंधार होता आणि तेथे काळे ढग वावरत होते. सूर्य उदयाला येत असताना त्या काळ्याशार धारेची फक्त एक बाजू मात्र प्रकाशाच्या प्रवेशद्वारासारखी उघडी होती आणि तिथून सूर्यकिरण पर्वतरांगांमधील त्या वाटेच्या तळाला पोचत होते. तेथेच इंद्रवज्राचे जन्मस्थान असल्याचेही माझ्या लक्षात आले. त्यामुळे ती जागा अधिक पवित्र होती. चोहुबाजूने अंधार असताना पूर्वेकडून येणाऱ्या प्रकाशाचा प्रवाहाने सह्य धारेतील जंगलाचा केंद्रीय भाग उजळून टाकलेला होता. तोच भाग बघण्याची माझी इच्छा झाली. ती पूर्ण करण्यासाठी दाट जंगल कापत तेथे पोहोचलो. सूर्यकिरणांचा तो प्रकाश सोहळा मी डोळे भरून पाहिला. त्याच सोहळ्यात काही रानफळे मिळाली. शीतल झऱ्याचे पाणी मिळाले. मी किती तरी वेळ तेथेच विश्रांत, ध्यानस्थ होतो. अशा दुर्मिळ स्थळाची सफर घडवून आणल्याबद्दल मी सह्याद्रीचे हृदयपूर्वक आभार मानले. पूर्वेकडे असलेल्या निसर्गाच्या या गाभाऱ्यातून मी बाहेर आलो आणि वाट नसलेल्या जंगलातून पुन्हा पश्चिमेकडे चालू लागलो...!
- मनोज कापडे,
सह्याद्री पर्वतरांगा, पुणे,
९८८११३१०५९,
तारीख १६ जून २०२३.
🏞️⛺🦚🕊️🕊️🕊️
No comments:
Post a Comment