🌷प्रिय वरुणराजा....
गेल्या पावसाळ्यात तू लवकर आला आणि पर्वतधारेच्या माथ्यावरील हे माझे आवडते झाड पानाफुलांचा गच्च मोरपंखी पिसारा फुलवून आनंदाने वाऱ्यासंगे डुलत वाढत गेले. तू चार महिने थांबलास; नंतरदेखील रेंगाळलास. त्यामुळे किती बरे वाटले या सह्य सृष्टीला. पण, सर्व दिवस सारखे नसतात.
आज तू सांगूनही आला नाहीस. इकडे पर्वतावर हे उंच झाड तृषार्थ आणि विषण्ण स्थितीत उभे आहे तुझ्याकडे डोळे लावून. त्याच्या झडलेल्या फांद्या हातात घेऊन ते कितीतरी दिवसांपासून तुझी वाट पहाते आहे. त्याला पालवी फुटली आहे; पण उष्ण हवेने आता त्या कोवळ्या पालवीचा दाह होतो आहे.
काळे मेघ क्षणभर येतात त्याच्यावर सावली धरायला; पण त्यांनाही उनाड वारा हुसकावून लावतो आहे. मृग नक्षत्राच्या आधीपासून मी तुला शोधतो आहे. कळसुबाई, कुलंग, तारामती, राजगडाचा बालेकिल्ला अशा कोणत्याही धारेत तू सापडला नाही. रायरी ते जावळीच्या खोऱ्यातही तू नाहीस. काही नभ भेटतात तिकडे; पण ते बहुरूपी आहेत. तुझा भिमकाय काळाकभिन्न देह, त्यात सामावलेली गंगा आणि माथी वीज हे तुझे मूळ रूप.
तेव्हा प्रिय वरुणराजा, आता तू लवकर ये. तुझा पुजक शेतकरीही धास्तावलेला आहे. सह्याद्रीच्या कुशीतील हा माझा प्रिय वृक्ष उन्मळून पडण्याच्या आधी तू ये. तुझ्या आगमनाची आम्ही सह्य भटकेही व्याकुळतेने प्रतीक्षा करीत आहोत. तुझ्या भेटीसाठी अधीर झालेल्या माझ्या नयनातील अश्रूचा पहिला थेंब पडण्यापूर्वी तू ये. मी भटका आहे रे; पण हे डोळे सह्याद्रीच्या मालकीचे आहेत ना. सह्य सृष्टी कासावीस झाली की ते आपसूक कधीही पाझरू लागतात..!
- मनोज कापडे,
सह्याद्री पर्वतरांगा, पुणे,
९८८११३१०५९
तारीख १७ जून २०२३
🏞️⛺🦚🕊️🕊️🕊️
No comments:
Post a Comment