Sunday, 11 June 2023

झळा आणि झुला

 

झळा आणि झुला
कातळरंगात चोहू बाजूंनी वेढलेल्या डोंगर रांगांच्या कुशीत मी भटकंती सुरू केली. सह्याद्रीत आज सूर्य रागवला होता आणि तळपत होता. त्यामुळे पायवाट, रस्ते, दगडधोंडे आणि माझे डोके असे आम्ही सारेच तापलो होतो.
पायवाटेला मी उद्वेगाने विचारले की, “अगं ताई, थोडे ऐकशील का माझे? रात्रभर प्रवास करुन शहरातून इथे आलोय. सकाळपासून चालतोय. या उन्हात आणखी किती चालायचे? तुला काही त्रास होत नाही का? कुठे तरी जंगलात गारव्याला ने. रानफळे दे. झऱ्याचे पाणी पाज.”
पायवाट हसली आणि माझी थट्टा करण्यासाठी आता ती एका उघड्याबोडक्या डोंगरधारेला अजून चिकटली. सूर्याच्या अगदी समोर असलेल्या कातळधारेकडे ती वाट हळूच वळली. त्यामुळे उन्हाची तीव्रता वाढली. आता जणू काही विराट वणव्यातून मी जात होता. उत्तर बाजूला सरळसोट तापलेली कातळभिंतीची बाजू, आणि दक्षिण बाजूने तप्त सूर्य होता. माझी थट्टा करणाऱ्या पायवाटेकडे मी केविलवाणे पाहिले. आणखी काही बोलावे तर ती अजून बिकट स्थळी नेईल, असे समजून मी गपगुमान पायवाटेबरोबर चालू लागलो.
कसरत करीत तो भाग मी पार केला. आता माझी सत्वपरीक्षा संपली होती. खोडकर पायवाट डोंगरापाठीमागे आली आणि शांत पसरलेल्या एका दाट जंगलात मला घेऊन गेली. मी पुरता हरपून गेलो. वाटेत गावरान आंबे, छोटी जांभळं, भरपूर करवंद असा मेवा मिळाला. उंबराच्या झाडाखाली डोहात पाणीही मिळाले. पुढे मग आम्ही तीन तास चालत होतो. जंगल सोडून डोंगरधारेने पुन्हा चढाई केली. काट्याकुट्यांनी वेढलेल्या एका चिंचोळी खिंडीत आलो.
खिंडीतून धाडधाड आवाज येत होते. कुणाचा तरी पाठलाग होत होता. मी चरकलो. एक हुप्या वेगाने माझ्याकडे आला. त्याच्या मागे त्याचेच तीन आडदांड भाऊबंद पाठलाग करीत होते. त्याला धाकदपटशा दाखवत होते. सारी माकडे म्हणजे काळ्या तोंडाची मोठी वानरं होती. साऱ्यांनी माझ्यावरच राग काढला तर काय, असा प्रश्न मला सतावू लागला. पण, पुढे काही झाले नाही. तिघे जेते आरोळ्या ठोकत निघून गेले. नंतर चौथादेखील हळुच जंगलात नाहीसा झाला. मी पायवाटेसंगे चालू लागलो.
मोठ्या उतराईनंतर विस्तीर्ण पठारी प्रदेशात येताच समोर डोंगर धारांची एक सुंदर वाटी दिसली. त्या वाटीत एक विशाल चंदेरी जलाशय होता. जलाशयासमोरील टेकडीवर एक प्राचीन मंदिर अज्ञातवासात असल्यासारखे उभे होते. ते मंदिर दुरून भव्य मूर्तीसमान भासत होते. निरांजनातील वात मंद तेवत असावी तसे ते डोंगरधारांच्या कुशीत उजळत होते. निळ्या आभाळाखाली त्याचा कळस म्हणजे सह्याद्रीच्या निर्मात्याला अभिवादन करीत होता.
निसर्गाच्या त्या नंदनवनात मी सारी दुपार भक्तिभावाने घालवली. सकाळपासून मला थकवणाऱ्या, चटके देणाऱ्या थट्टेखोर पायवाटेचे मी ह्दयपूर्वक
आभार मानले. ती हसली. तप्त झळांऐवजी आता त्या वाटेने मला थंडगार झुळूक मिळवून देणाऱ्या परिसरात आणून सोडले होते. तापलेली माती आणि दगडगोट्यांऐवजी गवताचे हिरवेगार गालिचे माझ्यासाठी त्या पायवाटेनेच पसरून ठेवले होते. जलाशय ओलांडून डोंगराची ती वाटी मला पार करायची होती. संध्याकाळपर्यंत डोंगरांपलीकडे पोहोचायचे होते.
माझ्यासाठी तो प्रांत अज्ञात होता. पण, पायवाटेला मात्र परिचित होता. तिच्यासोबत मी हिरवाईच्या त्या नयनरम्य प्रदेशातून पुढे चालू लागलो. वाऱ्याची झुळूक आता सतत आमच्याबरोबर एखाद्या खारुताईसारखी येत होती. सारा सह्याद्री एक झुला बनून वावरत होता आणि म्हणून पायवाटेसंगे आता मी चालत नव्हे; तर झुलत झुलत, डोलत डोलत तृप्त पावलांनी पुढे सरकत होतो..!
-मनोज कापडे,
सह्याद्री पर्वतरांगा, पुणे
तारीख १५ /०५/२०२३

No comments:

Post a Comment