एक प्रभात आणि एक सांज
पर्वतावर प्रभात झाली होती. ते काय आहे याचा शोध मी घेऊ लागलो. नाही ते धुकेच होते; पण वणवा पेटल्यानंतर धुराचे लोळ उठावेत आणि आसमंताला भिडावेत तसे ते दृश्य होते. शुभ्र बदकाची पिले आईमागे एका पाठोपाठ ओळीने रस्ता ओलांडतात जावीत त्यासारखा तो नजारा होता. धुक्याचा एक महाकाय गोळा घाटमाथ्यावरून थाटात दरीत उतरला. तीच धुक्यांची राणी असावी. त्यानंतर त्यामागोमाग तिचे अनेक पुंजके पिलांसमान दुडूदुडू धावत तो डोंगरमाथा ओलांडत आणि मग दरीत झेपावत होती. वाटले की याच धुक्याचा एक पुंजका असतो तर किती उधळलो असतो ना!
इकडे काही कृष्णमेघांनी सूर्यप्रकाश उगाच अडवून धरला होता. त्यामुळे गारवा वाढला व पर्वताने स्वतः आपली हिरवी चादर ओढली होती; पण ती अपूर्णच होती. काही केल्या त्याचे शरीर झाकले जात नव्हते. घाटमाथ्यावरच्या या धुक्यात आणि ऊन सावल्यांचा कधी मंद तर कधी वेगवान सरी अंगाखांद्यावर खेळवत मी माझा सारा दिवस उधळून टाकला.
आता सायंकाळ झाली होती.
पर्वत उतरताना एका झोपडीसमोर किती तरी वेळ रेंगाळलो. तेथे उदयाच्या सूर्य गोळ्यासमान एक दिवा लटकत होता. त्यामुळे तो अवघा परिसर स्वप्नातील महाल भासत होता.
सह्याद्रीच्या कुटीत
आज सूर्य निजला होता
आहे आकाश साक्षीला
आज पर्वत लाजला होता
विलासात या सृष्टीच्या
शुभ्र धुके उधळते अंगणी
अवतरली ही बेधुंद सांज
हरवलीस कुठे सह्य साजणी
त्या पर्वरांगांमध्ये आकाराला येणाऱ्या नवसृष्टीतील सत्य शोधायला पुन्हा येईन, असे ठरवून मी ती मदभरी सांज अनिच्छेने तेथेच सोडली; आणि उतराईच्या वाटेने चालू लागलो..!
- मनोज कापडे,
सह्याद्री पर्वतरांगा, पुणे,
तारीख २६ जून २०२३
No comments:
Post a Comment