🌷अश्रूंचा पाऊस
सह्याद्रीचा एक छोटा घाट चढून एका गावाकडे जाणाऱ्या सडकेवर मी पोहोचलो. दुतर्फा गच्च झाडी होती आणि समोरच्या शुभ्र धवल धुक्यात एक काळाशार रस्ता अंतर्धान पावत होता.
हलका पाऊस झाल्याने गारवा वाढला होता. सकाळचे साडेसहा वाजले होते. त्या धुक्यात अचानक हालचाल दिसली. एक मानवी आकृती हळूहळू समोरून येताना दिसली. त्या आकृतीचा डोक्या कडचा भाग मात्र खूप मोठा होता. ते एक भले मोठे बोचके होते. मीही चालत होतो. आकृती समोर आली आणि मी थक्क झालो. डोंगरात घर करून पशुपालन करणारे ५०-५२ वर्षांचे ते एक गुराखी बाबा होते. भल्या पहाटे दूध काढून दुधाच्या छोट्यामोठ्या किटल्यांचा एक भारा त्यांनी तयार केला होता. ३०-४० लिटरचे ते बाचके डोक्यावर घेत बाबा गावाकडे निघाले होते. ते थकलेले होते आणि त्यांना धाप लागली होती. इतके ओझे असूनही बाबांनी माझ्याकडे दुर्लक्ष केले नाही. आस्थेवाईकपणे चौकशी केली.
बाबा म्हणाले, " मी असा रोज सहा- सात किलोमीटर चालत जातो आणि गावात दूध देतो. तेच दूध आणि त्याचा तुम्हाला शहरात मिळतो."
मी : बाबा, पण या वयात धावपळ कमी करायला पाहिजे.
बाबा : धावपळ केली नाही तर जगू कसा? आणि, हे आता रोजचं झालं आहे. माझे वडील असेच डोंगरातून दूध वाहून न्यायचे. तेव्हा बैलगाडीची कच्ची वाट होती. ही डांबरी सडक आता झाली आहे. खरं तर हा दूध धंदा परवडत नाही. राब राब राबून लिटरला ३०-३५ रुपये मिळतात. तुम्ही शहरात हेच दूध ६०-७० रुपयांनी विकत घेतात.
बाबा व्यथित झाले होते. त्याच्या डोईवर बोजा होता. मी गोंधळलो. त्यामुळे पट्कन विषय बदलला.
मी : बाबा, पण तुम्ही चहा घेता की नाही?
बाबा : कामाच्या व्यापात चहापाणी कधी होतो; तर कधी नाही. पण, आता तुम्ही मात्र जमल्यास आमच्या झोपडीकडे जा. गरम चहा घ्या आणि मग पुढच्या वाटेला लागा. पुढे मग ४-५ तास वाटेत काही मिळणार नाही.
मी 'हो' म्हणालो. पण तिकडे गेलो नाही. बाबांनी चहा घेतलेला नव्हता आणि त्यांच्या पोटात अन्नही नव्हते. ते जीवापेक्षाही डोक्यावरच्या दुधाला जपत होते.
आता पाऊस बरसू लागला आणि भिजत, कुडकुडत ते दूधवाले बाबा डोक्यावरचा बोजा सांभाळत गोगलगायीप्रमाणे घाटवाट चढू लागले. धुक्यातून बाबांच्या धापांचा मंद आवाज येत होता. सह्याद्रीतील कथित दुग्धक्रांतीचे ते एक नागावलेले,शोषित साक्षीदार होते.
रस्ता ओलांडून मी जंगलाकडे गेलो. बरेच फिरून घाटातील दुसरी वाट पकडली आणि कासवाच्या गतीने मीदेखील घाट चढू लागलो. चालताना सारखी बाबांचीच आठवण येत होती. आभाळ आणि माझे डोळेही दाटून आले होते. आकाशातून हलक्या सरी येऊ लागल्या. माझ्या जुन्या आसवांमध्ये बांध हळूच फुटले आणि त्यात पावसाचे ताजे थेंब मिसळू लागले. माझ्या डोळ्यातून आता मुक्त धारा वाहू लागल्या. तो अश्रूंचा पाऊस होता..!
- मनोज कापडे
सह्याद्री पर्वतरांगा पुणे
तारीख २२ जून २०२३
🏞️⛺🦚🕊️🕊️🕊️