Monday, 10 August 2015

मानवतेची उपासना करणा-या निसर्गप्रेमी डॉ.सुनितीबाई


“आपल्या वसुंधरेला-पृथ्वीला सर्व बाजूने ओरबडण्याचे,लुटण्याचे सुरू असलेले काम आणि जगातील वाढते प्रदुषण ही या ग्रहावरील आजची सर्वात मोठी आव्हाने आहेत,” हे उदगार आहेत डॉ.सुनितीबाईंचे. त्या मानवतेच्या पुजारीच होत्या.

1986 मध्ये शासकीय रूग्णालयात दाखल झालेल्या 6 महिलांच्या रक्ताची तपासणी डॉ.सुनितीबाईंनी केली. या महिलांना एचआयव्ही असल्याचे त्यांनी सिध्द केले. त्यामुळे भारतातील पहिला एडसग्रस्त रूग्ण आणि ही समस्या अधिकृतपणे देशासमोर आली. त्यांनी एडसग्रस्त महिलांच्या सेवेला आयुष्य वाहून घेतलं होतं.

डॉक्टर सुनितीबाई सोलोमन यांच्या सामाजिक त्यागाला तोड नाही. तामिळनाडूत एक साधी मायक्रोबॉयोलॉजिस्ट म्हणून त्यांनी संशोधन-सेवा सुरू केली होती.

“भारतात 30 वर्ष काम करूनही एचआयव्हीविरोधी लस सापडली नाही. हे दुर्देव आहे,” असे त्या म्हणत असत. संशोधनापेक्षाही त्यांनी एक धक्कादायक निष्कर्ष सांगितला तो असाः एचआयव्हीपेक्षाही रूग्णाचा बळी जातो तो त्या आजाराचे मानसिक शल्य सतत टोचण्याने व रूग्णाला वाळीत टाकण्याच्या प्रकाराने..!

डॉ.सुनितीबाई म्हणत असत की,” पुढील 10 वर्षात नव्या आजारांची समस्या असेल. मात्र, 25 वर्षांनंतरची समस्या ही अन्न, नष्ट होणारी जंगलं-वनसंपदा आणि पर्यावरणाची असेल. आणि 50 वर्षानंतर तर जगात पाण्यासाठी युध्द होतील.”

“मनात शुध्द हेतु ठेवून गरजूंना मदत करणं हे माझ्या आयुष्यातील आनंदाचं गुपित आहे,” असेही त्या सांगत.

डॉ.सुनितीबाई सारख्या किती तरी महान स्त्रिया भारतात आहेत. दुर्देवाने त्यांची ओळख देशभर मृत्युनंतर होत असते. या महिलांपासून “भारतरत्न” किंवा “पदमश्री-पद्मविभुषण” असे किताब देखील लांब असतात.

फाशीः एक किळसवाणी परंपरा


एका माणसाने दुस-या माणसाचा किंवा मानवी समुहाचा हेतुपूर्वक जीव घेण्याचा प्रकार किळसवाणा आहे.
निसर्गात माणूस सोडला तर कोणताही प्राणी हेतुतः आणि ते देखील जीव जाईपर्यंत समुहाची हत्या करीत नाही. अगदी वाघ,सिंह देखील झुंडीने आले आणि 10-10 हरणांना मारून निघून गेले, असे दिसत नाही.

मानवी इतिहासात मात्र जगाच्या
सर्व संस्कृतीत माणसांकडून माणसांच्या हत्या होत आलेल्या आहेत. पृथ्वीवरील किंवा पृथ्वीबाहेरील दिव्य शक्तींसाठी माणसाचा जीव माणसाकडून घेतला जात होता. ते समाज असंस्कृत,रानटी,तर्क-विचार-बुध्दी समृध्द नव्हते. मात्र, आधुनिक युग सुरू झाले तरी माणसाने माणसाला मारणे कायदेशीररित्या सुरू आहे.

अमानवी कृत्य करणा-या माणसाला कायद्याचा आधार घेवून पुन्हा मारावे म्हणजे हिंसेला हिंसेने उत्तर देण्याचे तत्वज्ञान आहे. या तत्वातून हिंसा कधीही संपत नाही. त्यावर मधला उपाय म्हणजे अशा अमानवी व्यक्तींना मानवी समुहापासून आयुष्याच्या अंतापर्यंत बंदीखान्यात ठेवणे.

जगात किती तर देश आता फाशीच्या संकल्पनेपासून बाजूला जात आहेत. माणूस सुसंस्कृत आणि मानवतावादी होत असल्याचे ते लक्षण आहे. जीव घेणे हे मानवी ध्येय कधीही असू शकत नाही. बुध्दीजिवी आणि सुसंस्कृत मानवी समुहाचे तर कधीच नाही.

सुखी शेतक-याची कथा


काही शेतकरी अपार कष्ट करतात. त्यांच्या जिद्दीला आणि घामाला सलाम करावासा वाटतो. अहमदनगर सारख्या अवर्षण भागात निवृत्ती देवकर नावाचा असाच एक शेतकरी रहातो.

2007 सालापर्यंत दोन वेळच्या जेवणाची भ्रांत निवृत्तीरावांना होती. भाऊ ज्ञानेश्वरला घेत निवृत्तीरावांनी पाणीटंचाईवर तोडगा शोधला. कर्ज घेण्याचं ठरवलं.

कष्ट आणि तांत्रिकदृष्ट्या शेती केल्याशिवाय तरणोपाय नाही, असे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पाण्यासाठी सव्वा कोटी लिटर क्षमतेचे शेततळे उभारले. 10 लाखाचे कर्ज काढून डाळिंबबाग आणि झेंडुशेती केली.

तीन वर्षांत त्यांनी कर्ज फेडले. आता हाती पैसा आहे. मनगटात बळ आहे. कष्ट करण्याची वृत्ती वाढली आहे.
निवृत्तीराव मला म्हणाले, “शेतीत भरपूर लूट असते. पण लढावं लागतं. आता मी सुखी आहे.”

या निवृत्तीरावांचं शिक्षण आहे इयत्ता आठवी पास..!

कॉस्मोपॉलिटन संस्कृतीची झाकलेली दुसरी बाजू



महाराष्ट्राच्या 250 शहरांमध्ये अजूनही पावणेदोन लाख घरांमध्ये अशी शौचालये आहेत की ती स्वच्छ करण्यासाठी कामगारांचा वापर करावा लागतो. हाताने मानवी मैला वाहून आपला उदरनिर्वाह करणारे कामगार आणि अशा प्रथा चालू ठेवणारी आपली प्रजा म्हणजे आपल्या सुशिक्षित संस्कृतीला काळिमा फासणारी बाब म्हणावी लागेल.


जगण्यासाठी गरीब माणूस काहीही करतो आणि आपल्याला हवे तसे जगण्यासाठी काहीजण माणुसकीही गहाण टाकतात, याचे उदाहरण म्हणजे आजही हाताने मैला वाहण्याची चालू असलेली प्रथा.


शहरे वाढलीत पण स्वच्छतेचे महत्व अजूनही पटलेले नाही. अस्वच्छ परिसर हा आपल्याला माणुसकीला लागलेला डाग वाटत नाही. स्मार्टसिटी संकल्पना आली पण गावच्या,शहरातील टॉयलेटस् अजून स्वच्छ दिसत नाहीत.


रस्त्यात पडलेली घाण, कचरा फेकणारी माणसं, थुंकणारी सुशिक्षित किंवा अशिक्षित व्यक्ती पाहून हे चालायचंचअसं सांगून लोक आपआपली काम करतात. त्यामुळे राज्यकर्तेही फारसे लक्ष देत नाहीत. नोकरशाही देखील मग जशी प्रजा-तसा राजा आणि तसेच आपण, असे सांगत पुढे सरकत असते.


आपण कॉस्मोपॉलिटन होत असलो तरी स्वच्छता,जात,धर्म,प्रांत,बंधुत्वाच्या संस्कृतीत कुठे कुठे मागास राहिलो आहोत. शहरीकरणाच्या धुंदीत असा मागासलेपणा दिसत नाही आणि दिसला तरी तो जाणवत नाही.


विकास आणि सुसंस्कृत माणूस तशी समाजरचना याबाबतीत जपानसारखे देश कितीतरी आदर्शवत आहेत. पण, आपल्याला दुस-याला चांगले म्हटलेलेही चालत नाही. कारण नकळत वैचारिक अस्वच्छतेचाही पुरस्कार आपण बहुमताने, घट्टपणे करतो आहोत.  


आईची मैत्रिण



आयुष्यात सर्वात जास्त आपल्याशी हितगुज साधते ती आई. तिच्या बोलण्यातून जग कळत असतं. मुलं मोठी झाल्यावर आईशी कमी बोलतात. जगण्याचं वेळापत्रक असं बनतं-बनवतात की त्यात मुलगा आपल्या आईला फार वेळ देत नाही. मात्र, मी आईशी ठरवून बोलत असतो. तिच्या मैत्रिणीशी देखील गप्पा मारत असतो.


आईला घेऊन काल तिच्या मैत्रिणीकडे गेलो होतो. माझी आई 71 वर्षाची तर तिची मैत्रिण 75 वर्षांची आहे. कपाळावर लालभडक कुंकु लावणारी ही मैत्रिण गोदावरी नदी काठी एका झोपडीत रहात होती. काही दिवसांपूर्वीच तिला मायबाप सरकारनं घर दिलं आहे.


आईला पाहून मैत्रिण खुश झाली. आईसाठी तिने दहा रुपयाची गोडीशेव घेऊन ठेवली होती. दोघींच्या मग गप्पा झाल्या. आईची मैत्रिण काही महिन्यांपूर्वी पाय घसरून पडलेली. तिच्या जवळ डॉक्टरच्या गोळ्यांचे पाकिट दिसले. ते पाकिट या आजारी मैत्रिणीचे नसून बाबांचे होते. बाबा शेजारच्या खाटेवर बसलेले होते.


80 वर्षांच्या पतीची या वयात काळजी घेणारी 75 वर्षांची ही आजी म्हणजे माझ्या आईची मैत्रिण. गेल्या 50 वर्षांपासून या दोघींची ही मैत्री घनदाट जंगलातल्या झ-यातील नितळ-गोड पाण्यासारखी शुध्दपणे टिकून आहे. 

Monday, 22 June 2015

उडत्या लावण्यावर आता सरकारी मोहोर


फुलपाखरांच्या प्रेमान न पडलेला माणूस सापडणार नाही. बालगोपाळांपासून ते आजी-आजोबांना देखील फुलपाखरांकडे पाहून मिळणारा आनंद इतर कोणत्याही वस्तूमधून न मिळणारा. आता फुलपाखरांना स्वतःची ओळख या महाराष्ट्रात मिळणार आहे.

 ब्ल्यू मॉरमॉन ((Papilio polymnestor)  जातीच्या मोहक फुलपाखराने आता महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू म्हणून मान्यता मिळवली आहे. राज्य सरकारने नुकताच तसा निर्णय घोषित करून उडत्या लावण्यावर एकप्रकारे सरकारी मोहोर उमटली आहे.

मॉरमॉनचं रुप इतकं सुंदर आहे की तो उडता लहानसा मोर म्हणावा लागेल. लांब पंखांवर आभाळाचा निळा रंग माखून फिरणारा मॉरमॉन पंखांच्या चोहू बाजूने काळाजर्द असतो. अमावस्येच्या अंधाराचे थोडे काळे तुकडे आपल्या पंखाला चिकटवून बागडणारा मॉरमॉन रंगीत फुलांवर बसतो तेव्हा एका अप्रतिम लावण्याचा अनोखा संगम होते. ते रूप पाहून पाहून आपलं तन-मन आनंदानं भरभरून जातं.

मॉरमॉन तसा श्रीलंका आणि भारतात ब-याच ठिकाणी आढळतो. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात आढळणारा मॉरमॉन तसा विदर्भ आणि पश्चिम महाराष्टातही दिसून येतो.


देशात फुलपाखरांच्या 1500 जाती आहेत. रोजच्या जीवनगाडयात आपण कधी फुलपाखरांकडे लक्ष देत नाही. खरे तर फुलपाखरांचं आयुष्य 2-3 महिन्याचंच असतं. माझ्या दृष्टीने फुलपाखरू हे मोहकता, लावण्य, अहिंसा आणि निसर्गाच्या सौंदर्याचं एक उडतं रूप आहे. तूर्तास, राज्य सरकार आणि ब्ल्यू मॉरमॉन बटरफ्लाय या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा...!

Thursday, 18 June 2015

इगो, माणूस आणि प्राणी

माणसातील अहम् (इगो) हा अनेक माणसासाठी अंगांनी कार्य करतो. वास्तवता, बुध्दी, चेतना, तर्क-शक्ती, निर्णय शक्ती, इच्छा शक्ती, अनुकूलता, आकलन, भेदाभेद करण्याची वृत्ती या सर्वांना विकसित करतो. इगो हा मानवाप्रमाणे प्राण्यातही असतो. तथापि, इगोची कार्ये प्राण्यांमध्ये मर्यादित पातळीवर असावित किंवा इगोवर त्यांचे नियंत्रण असावे, असेही म्हणता येईल.

कारण, माणूस हा एकमेव असा आहे की इगोमुळे तो स्वतःला, दुस-या माणसाला किंवा निसर्गाला किंवा त्याच्याशी जगण्याचा संबंध नसलेल्या कोणत्याही जिवंत वा निश्चिल पदार्थाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. उदा. माणूस केवळ गंमत म्हणून डोंगरावरच्या गवताला आग लावतो. उदा. इच्छा झाली म्हणून तो निश्चिल असलेल्या डोंगरावरील दगड फोडतो किंवा गंमत म्हणून कडयावरून दगड खाली ढकलतो.

प्राण्यांमध्ये किंवा सजीव सृष्टीत असे काही नाही. प्राणी देखील स्वतःचे अधिवास,अन्न,परिवार याचे रक्षण करतात. मात्र, सहज वाटले म्हणून कोणताही प्राणी दुस-या प्राण्याला इजा करीत नाही. अथवा, इच्छा झाली म्हणून मानवी वसाहतीवर हल्ला करून मानवाला बंदी करण्याचा प्रय़त्न करीत नाही. त्यामुळे वास्तवता, बुध्दी, चेतना, तर्क-शक्ती, निर्णय शक्ती, इच्छा शक्ती, अनुकूलता, आकलन, भेदाभेद करण्याची वृत्ती अशी वृत्ती असलेला इगो प्राण्यांमध्ये असूनही त्यांचा वापर स्वजातीची किंवा इतर जातीची हानी ते करीत नाहीत. इगोचा वापर सृष्टीशी एकरूप होण्यासाठी प्राणी अधिक करीत असल्याचे आढळून येते. त्यामुळेच प्राणी हे स्वार्थी नाहीत. जगण्यासाठी अत्यावश्यक असते ते मिळवण्याची वृत्ती आहे. मात्र, स्वार्थ नाही.

स्वार्थ आणि इगोचा गैरवापर माणसात आत्यंतिक आहे. म्हणून तो दुःखी आहे. सगळ्यात गमतीचा भाग म्हणजे दुःखावर मात करण्यासाठी वापरले जाणारे उपाय देखील स्वार्थ आणि इगोचा गैरवापराआधारित असतात.