Saturday, 17 June 2023

प्रिय वरुणराजा

🌷प्रिय वरुणराजा....

गेल्या पावसाळ्यात तू लवकर आला आणि पर्वतधारेच्या माथ्यावरील हे माझे आवडते झाड पानाफुलांचा गच्च मोरपंखी पिसारा फुलवून आनंदाने वाऱ्यासंगे डुलत वाढत गेले. तू चार महिने थांबलास; नंतरदेखील रेंगाळलास. त्यामुळे किती बरे वाटले या सह्य सृष्टीला. पण, सर्व दिवस सारखे नसतात.

आज तू सांगूनही आला नाहीस. इकडे पर्वतावर हे उंच झाड तृषार्थ आणि विषण्ण स्थितीत उभे आहे तुझ्याकडे डोळे लावून. त्याच्या झडलेल्या फांद्या हातात घेऊन ते कितीतरी दिवसांपासून तुझी वाट पहाते आहे. त्याला पालवी फुटली आहे; पण उष्ण हवेने आता त्या कोवळ्या पालवीचा दाह होतो आहे. 

काळे मेघ क्षणभर येतात त्याच्यावर सावली धरायला; पण त्यांनाही उनाड वारा हुसकावून लावतो आहे. मृग नक्षत्राच्या आधीपासून मी तुला शोधतो आहे. कळसुबाई, कुलंग, तारामती, राजगडाचा बालेकिल्ला अशा कोणत्याही धारेत तू सापडला नाही. रायरी ते जावळीच्या खोऱ्यातही तू नाहीस. काही नभ भेटतात तिकडे; पण ते बहुरूपी आहेत. तुझा भिमकाय काळाकभिन्न देह, त्यात सामावलेली गंगा आणि माथी वीज हे तुझे मूळ रूप. 

तेव्हा प्रिय वरुणराजा, आता तू लवकर ये. तुझा पुजक शेतकरीही धास्तावलेला आहे. सह्याद्रीच्या कुशीतील हा माझा प्रिय वृक्ष उन्मळून पडण्याच्या आधी तू ये. तुझ्या आगमनाची आम्ही सह्य भटकेही व्याकुळतेने प्रतीक्षा करीत आहोत. तुझ्या भेटीसाठी अधीर झालेल्या माझ्या नयनातील अश्रूचा पहिला थेंब पडण्यापूर्वी तू ये. मी भटका आहे रे; पण हे डोळे सह्याद्रीच्या मालकीचे आहेत ना. सह्य सृष्टी कासावीस झाली की ते आपसूक कधीही पाझरू लागतात..!

- मनोज कापडे,
सह्याद्री पर्वतरांगा, पुणे,
९८८११३१०५९
तारीख १७ जून २०२३
🏞️⛺🦚🕊️🕊️🕊️

Wednesday, 14 June 2023

राजाधिराज

🌷शिवरायांचे कैसे बोलणे । शिवरायांचे कैसे चालाणे । 
शिवरायांची सलगी देणे ।
 कैसी असे ।।

सकल सुखांचा केला त्याग । 
म्हणोनी साधिजे तो योग । 
राज्य साधनाची लगबग । 
कैसी केली ।।
......

पर्वतावरून उतरताना विस्तीर्ण पठारी भाग दिसत होता. तेथे एक विशाल वृक्ष मोराच्या पिसाऱ्यासमान डौलाने उभा होता. त्याखाली एक सोनेरी वस्तू चमकत होती. माझी उत्सुकता शिगेला पोहोचली. जंगलातून व पुढे पठारी भागातून खूप चालत गेल्यानंतर एका वाडीत पोहोचलो आणि बघतो तर ते प्रत्यक्ष राजाधिराज होते. ते त्या वृक्षाच्या पर्णसंभारातून बाहेर येताना दिसत होते. त्यांची चाल सिंहासमान आणि दृष्टी वाघासमान होती.

त्या पूर्णाकृती पुतळ्याभोवती काहीही देखावा, सजावट, रंगरंगोटी नव्हती. तरीही तो सारा पिंपळपार राजवाड्यासमान भासत होता. कोकणातील वाद्यापाड्या गरीब शेतकऱ्यांनी भरलेल्या असतात. मात्र, त्यांची शिवरायांवर निस्सीम भक्ती आहे. त्याची साक्ष हा परिसर देत होता.

आसपास कोणीही नव्हते. राजांना प्रणाम करून मी दुसऱ्या डोंगराच्या दिशेने पुन्हा चालू लागलो..!
🏞️🦚🕊️🕊️🕊️

Sunday, 11 June 2023

झळा आणि झुला

 

झळा आणि झुला
कातळरंगात चोहू बाजूंनी वेढलेल्या डोंगर रांगांच्या कुशीत मी भटकंती सुरू केली. सह्याद्रीत आज सूर्य रागवला होता आणि तळपत होता. त्यामुळे पायवाट, रस्ते, दगडधोंडे आणि माझे डोके असे आम्ही सारेच तापलो होतो.
पायवाटेला मी उद्वेगाने विचारले की, “अगं ताई, थोडे ऐकशील का माझे? रात्रभर प्रवास करुन शहरातून इथे आलोय. सकाळपासून चालतोय. या उन्हात आणखी किती चालायचे? तुला काही त्रास होत नाही का? कुठे तरी जंगलात गारव्याला ने. रानफळे दे. झऱ्याचे पाणी पाज.”
पायवाट हसली आणि माझी थट्टा करण्यासाठी आता ती एका उघड्याबोडक्या डोंगरधारेला अजून चिकटली. सूर्याच्या अगदी समोर असलेल्या कातळधारेकडे ती वाट हळूच वळली. त्यामुळे उन्हाची तीव्रता वाढली. आता जणू काही विराट वणव्यातून मी जात होता. उत्तर बाजूला सरळसोट तापलेली कातळभिंतीची बाजू, आणि दक्षिण बाजूने तप्त सूर्य होता. माझी थट्टा करणाऱ्या पायवाटेकडे मी केविलवाणे पाहिले. आणखी काही बोलावे तर ती अजून बिकट स्थळी नेईल, असे समजून मी गपगुमान पायवाटेबरोबर चालू लागलो.
कसरत करीत तो भाग मी पार केला. आता माझी सत्वपरीक्षा संपली होती. खोडकर पायवाट डोंगरापाठीमागे आली आणि शांत पसरलेल्या एका दाट जंगलात मला घेऊन गेली. मी पुरता हरपून गेलो. वाटेत गावरान आंबे, छोटी जांभळं, भरपूर करवंद असा मेवा मिळाला. उंबराच्या झाडाखाली डोहात पाणीही मिळाले. पुढे मग आम्ही तीन तास चालत होतो. जंगल सोडून डोंगरधारेने पुन्हा चढाई केली. काट्याकुट्यांनी वेढलेल्या एका चिंचोळी खिंडीत आलो.
खिंडीतून धाडधाड आवाज येत होते. कुणाचा तरी पाठलाग होत होता. मी चरकलो. एक हुप्या वेगाने माझ्याकडे आला. त्याच्या मागे त्याचेच तीन आडदांड भाऊबंद पाठलाग करीत होते. त्याला धाकदपटशा दाखवत होते. सारी माकडे म्हणजे काळ्या तोंडाची मोठी वानरं होती. साऱ्यांनी माझ्यावरच राग काढला तर काय, असा प्रश्न मला सतावू लागला. पण, पुढे काही झाले नाही. तिघे जेते आरोळ्या ठोकत निघून गेले. नंतर चौथादेखील हळुच जंगलात नाहीसा झाला. मी पायवाटेसंगे चालू लागलो.
मोठ्या उतराईनंतर विस्तीर्ण पठारी प्रदेशात येताच समोर डोंगर धारांची एक सुंदर वाटी दिसली. त्या वाटीत एक विशाल चंदेरी जलाशय होता. जलाशयासमोरील टेकडीवर एक प्राचीन मंदिर अज्ञातवासात असल्यासारखे उभे होते. ते मंदिर दुरून भव्य मूर्तीसमान भासत होते. निरांजनातील वात मंद तेवत असावी तसे ते डोंगरधारांच्या कुशीत उजळत होते. निळ्या आभाळाखाली त्याचा कळस म्हणजे सह्याद्रीच्या निर्मात्याला अभिवादन करीत होता.
निसर्गाच्या त्या नंदनवनात मी सारी दुपार भक्तिभावाने घालवली. सकाळपासून मला थकवणाऱ्या, चटके देणाऱ्या थट्टेखोर पायवाटेचे मी ह्दयपूर्वक
आभार मानले. ती हसली. तप्त झळांऐवजी आता त्या वाटेने मला थंडगार झुळूक मिळवून देणाऱ्या परिसरात आणून सोडले होते. तापलेली माती आणि दगडगोट्यांऐवजी गवताचे हिरवेगार गालिचे माझ्यासाठी त्या पायवाटेनेच पसरून ठेवले होते. जलाशय ओलांडून डोंगराची ती वाटी मला पार करायची होती. संध्याकाळपर्यंत डोंगरांपलीकडे पोहोचायचे होते.
माझ्यासाठी तो प्रांत अज्ञात होता. पण, पायवाटेला मात्र परिचित होता. तिच्यासोबत मी हिरवाईच्या त्या नयनरम्य प्रदेशातून पुढे चालू लागलो. वाऱ्याची झुळूक आता सतत आमच्याबरोबर एखाद्या खारुताईसारखी येत होती. सारा सह्याद्री एक झुला बनून वावरत होता आणि म्हणून पायवाटेसंगे आता मी चालत नव्हे; तर झुलत झुलत, डोलत डोलत तृप्त पावलांनी पुढे सरकत होतो..!
-मनोज कापडे,
सह्याद्री पर्वतरांगा, पुणे
तारीख १५ /०५/२०२३

सह्याद्रीचे विचारपुष्प २

🌷सह्याद्रीचे विचारपुष्प २ :  निसर्गाच्या बागेत सुंदर घर असते. ते आपल्याला मोहीत करते. मात्र, घरात रहात असलेल्या व्यकीच्या तळहाताचे फोड आणि पायाच्या तळव्याच्या भेगा दिसत नाहीत. 🏞️🦚🕊️

सह्याद्रीचे विचारपुष्प १

🌷सह्याद्रीचे विचारपुष्प १

सह्याद्री म्हणजे केवळ पर्यटन नव्हे; ते जीवनाचे गुरुकुलही आहे.

प्रतिकुल परिस्थिती असल्यास शहरी माणूस अस्वस्थ असतो. अस्वस्थ असल्यास तो स्वतःच हतबध्द असतो आणि इतरांना मदत करणे विसरतो.

मात्र, सह्याद्रीचे तसे नाही. प्रतिकुल स्थितीशी येथे सारे झुंज देत असतातच; पण दातृत्व विसरत नाहीत.

 रखरखत्या उन्हाळ्यात सह्याद्रीमधील झाडे भाजून निघतात; पण पुन्हा जिद्दीने पालवीला खेचून आणतात. या अवस्थेत प्रानिमात्राला रानफळे देतात. आटलेल्या नद्या, ओढे तहानतात; पण या स्थितीतही कुठे तरी जंगलाच्या कोपऱ्यात नितळ पाण्याचे प्रवाह सात्विक नितळता जपत ऊभे असतात. ते पशूपक्ष्यांची तहान भागवतात. 

..आणि म्हणूनच सह्याद्री हा महारठ्ठ देशवासीयांच्या महागुरूदेखील आहे..!

🏞️⛺🦚🕊️🕊️🕊️

Tuesday, 7 March 2023

साल्हेरच्या कुशीतील फुल


👆 निसर्ग वाचन :🌷                           पवित्र सातमाळ पर्वरांगांच्या कुशीत मनमुराद भटकंती केली.  महाराष्ट्राच्या कधी काळच्या वैभवी साम्राज्याचे प्रतीक असलेले हे गिरीदुर्ग पाहिले. साम्राज्य गेले, वैभव गेले; त्यामुळे आता हे भग्न गिरीदुर्ग दीर्घ तपाला बसलेल्या प्राचीन ऋषिंप्रमाणे दिसतात. अर्थात, या रानफुलांनी त्यांची पुजा आजही सोडलेली नाही. उन्हातान्हात ही रानफुले जिद्दीनं फुलतात आणि स्वतःला त्या गिरीदुर्ग चरणी आनंदाने अर्पण करून घेतात..!  🏞️⛺🦚🕊️🕊️🕊️

Thursday, 23 February 2023

सकाळ

👆 आजची प्रसन्न सोनेरी सकाळ..! 🕊️🦚😊🏞️