सामान्य,प्रामाणिक,पापभीरू,चाकरमान्या मराठी माणूस म्हणून मी शिक्षक श्री.संजय जाधव यांना भेटत असतो. त्यांना भेटल्यानंतर आपल्यातील पापभिरूतेची पातळी आणखी वाढवून घेण्याचा हेतू असतो.
जिल्हा परिषदेच्या शाळेत लहान मुलांना शिकवण्याचं काम करणारे श्री.जाधव सर काही वर्षांपूर्वी इमारतींच्या बांधकामावर मजूर म्हणून कामाला जात असत. फाटलेल्या पॅंटवर मिळेल ते काम करीत; पण ते शिकत राहिले.
शिक्षक बनल्यावरही सरांच्या हातात छडी कधी आली नाही. छडीऐवजी सरांच्या खिशात चॉकलेट असतात. सरांचं पर्यावरणावर, पशुपक्ष्यांवर प्रेम आहे. शाळेत एखादा जखमी पक्षी सापडला की त्यांच्या उपचारासाठी सर काम सोडून शहराकडे धाव घेतात.
एकेकाळी फाटकी चप्पल, तुटकी सायकल वापरणारे जाधवसर कधी-कधी शिकवतांना मुलांना सांगत की ‘हेनरी फोर्ड यांनी मोटारीचा शोध 100 वर्षांपूर्वी लावला होता.’
फोर्ड मोटारीची कहाणी सांगतांना ती आपल्याही दारात असावी, असं स्वप्न सरांना पाहिलं. आयुष्यभर एसटीतून फिरणा-या वयोवृध्द आईला फोर्ड मोटारीत बसवावं, असं सरांना वाटून राही.
आनंदाची बाब म्हणजे गेल्या महिन्यात सरांनी कर्ज काढून फोर्ड मोटार विकत घेतली. शोरूममध्ये मलाही नेले होते. सरांच्या डोळ्यात कमालीचा आनंद होता. मी स्वतः दार उघडून सरांना मोटारीत बसवले. सरांना अजुनही गाडी चालवता येत नाही. मात्र, एक स्वप्नपूर्ती झाली आहे.
आयुष्याच्या रंगमंचावर सरांनी अनेक भूमिका प्रामाणिकपणे केल्या. त्यांनी गवंडयाच्या हाताखाली बिगा-याचे काम केले, त्यांनी रस्त्यावर बॉलपेन विकले, त्यांनी दारोदार फिरून ऊसळ-मटकी विकली,सरांनी पिग्मी एजंटचं काम केलं. ते सुताराच्या हाताखाली रंधा मारत होते. लहान मुलांसाठी ते पोंगे देखील विकत होते.
एका मराठी मजुराच्या हाती खडु-फळा येतो आणि नंतर तो फोर्ड मोटारीचा मालकही बनतो. हल्ली मोटारीचे मालक कोणीही होतात. मात्र, जाधव सरांसारखा प्रामाणिक-कष्टाळू-दयाळू मालक दुर्मिळच...!