Saturday, 5 August 2023

सह्य प्रदेशातील सखीचे हळवे रुप

🌷 _सह्य प्रदेशातील सखीचे हळवे रुप_ 

कात टाकलेल्या रुपवान नागणीसारखी अचानक ती समोर आली आणि मी दचकलो. पण, त्याचवेळी तीची भेट झाल्याचा आनंदही झाला होता. 

मी आनंदी आणि ती नाराज होती. काही बोलायचं सोडून तीने मात्र उद्वेगाने माझ्यावर प्रश्नांची सरबत्तीच केली, 

ती : “यात्रिका, हे तुझं वागणं किती विचित्र आहे. दरवेळी माझा जीव असा टांगणीला का लावतोय? आधुनिक वसाहतीत तुझी होणारी घुसमट इथल्या निसर्गात विरघळून टाकण्यासाठी तू जंगलात येतोस हे मान्य. पण, अरे या निसर्गाच्या गाभाऱ्यात फिरता फिरता सहज कोणत्याही भागाकडे जाणे तुला धोक्याचे का वाटत नाही..?"

मी : “आधी तू थोडे शांत होशील का? काही तासांपासून मी तुला शोधतो आहे. हवेत हलका पाऊस आणि मऊ गारवा आहे. पण, तुझ्या शोधात मी वेड्यासारखा फिरून घामाने चिंब झालो आहे. धुके आणि हिरवाईनं हा निसर्ग नटलेला असताना तू मात्र सापडत नव्हती. मी चिंतेत भटकत होतो. त्यामुळे मला या शीळेवर थोडा विसावा घेऊ दे. तुझ्या साऱ्या प्रश्नांना मी उत्तरे देईन.” पर्वत धारेतील सोंडेच्या एका गोलाकार छोट्या पठारावरील शीळेवर थकलेले शरीर सोडत मी उत्तरलो. 

माझ्याकडे दुर्लक्ष करीत ती म्हणाली : "यात्रिका, किती वेळा मी तुझी आर्जव केली. सह्याद्रीच्या कुशीत हजारो वाटा फसव्या आहेत. काही शापित, काही कातळ कड्यात नेणाऱ्या, काही अंधारबनात नेणाऱ्या. तू शोधत असलेल्या समाधान, शांतीच्या स्त्रोताकडे त्यातील अनेक वाटा जात नाहीत. त्या तुला भुलवतात आणि देतात फक्त यातना, दुःख. पण, तू निसर्गात बेधुंद होतोस. मी आणि त्यांच्यातला हाच फरक तू अनेकदा अचानक विसरतोस. मला सोडून फसव्या वाटांच्या सापळ्यात अडकतोस."

मी तीचं बोलणं श्वास रोखून ऐकत होतो. तीच्या रागात माया दडलेली होती. “तू मागे सालेरीला गेलास पश्चिमेला असलेल्या सालोटा दुर्गाला जाण्यासाठी मी उजवीकडे उभी असताना तू दुर्लक्ष केले आणि धुंदीत डावीकडे गेलास. पवित्र रायरीला जाताना बोराट्याच्या नाळेत तू रफी साहेबांची गाणी गात होतास. नाळेत कातळांच्या ठिकाणी मी नसल्याचे पाहून तुला यत्किंचितही भीती वाटली नाही. डावीकडे बालेकिल्ल्याच्या बाजूला तू माझा शोध घेतला नाहीस. उलट गाणं म्हणत समोर कोकणदिव्याच्या डोंगररांगाखालील जंगलात भटकत गेलास. जावळीच्या खोऱ्यात मला पवित्र मानतात आणि कोणीही माझ्याकडे दुर्लक्ष करीत नाही. तू मात्र फुलपाखरांच्या झुंडीमागे जंगलात निघून गेलास. तू भानावर ये. एरवी कधी तू त्या पाळंदे काकांचे, कधी उषाप्रभाताईंचे गोडवे गात असतो; पण त्यांच्यासारखा वागतो का? ती माणसंदेखील सह्यवेडी होती. पण, मला सोडून ती अशी स्वतःहून भरकटली नाहीत."

तीच्या या साऱ्या युक्तिवादाने मी अवाक् झालो. माझा थकवा पळून गेला आणि काय उत्तर द्यावे या विचारात मी पुन्हा गुंग झालो…!

(क्रमशः)

✒️मनोज कापडे, 
सह्याद्री पर्वतरांगा, पुणे.
९८८११३१०५९
🏞️🌞🦚🕊️🕊️🕊️

Thursday, 6 July 2023

धुक्यातील नदी

🌷सह्याद्रीच्या कुशीतील आजच्या भटकंतीत ही घाटवाट मला मनोहारी निसर्ग भूमिकडे घेऊन गेली. हिरव्याकंच डोंगर रांगामधील धुक्यात तेथे नदी अगदी निवांत पहुडली होती..!

🏞️⛺🪢🦚🕊️🕊️🕊️

Friday, 30 June 2023

सह्याद्रीचे विचारपुष्प ९

 


🌷सह्याद्रीचे विचारपुष्प ९ :

" सह्याद्रीला यातना कमी नाहीत. लोक कुऱ्हाड चालवतात. आगी लावतात. वणवे पेटतात. उन्हाळा भाजून काढतो. पण, माझा सह्याद्री सुडाने पेटत नाही. तो कुणाचा तिरस्कार, क्रोध करीत नाही.


पहिल्याच पावसानंतर सह्याद्री सारी दुःख विसरून आपल्या माळरानावर पुन्हा हिरवाई आणण्यासाठी  स्वतःला गुंतवून घेतो. हे झुडप बघा पहिल्याच पावसानंतर कसे ठाम उभे राहिले आहे. 


माझ्याही मनात एक माळरान आहे. त्यासाठी जगाला दोष न देता या माळरानाचे नंदनवन करण्यासाठी परिश्रम घेईल. माळरान वाढू न देता तेथे मी  आनंदाचे बी रुजवेन. त्याला चैतन्याची कोमल पालवी आणेन. या पालवीत मग विवेकाचे पक्षी गाणे गातील. निर्मळ व्यवहाराच्या काडीने हृदयी आत्मानंदाचा एक खोपा गुंफेल. आणि, त्याकरिताच या अनमोल सह्य सृष्टीच्या सतत सान्निध्यात राहीन."


🏞️⛺🪢🦚🕊️🕊️🕊️


Wednesday, 28 June 2023

सह्याद्रीचे विचारपुष्प ८

🌷 _सह्याद्रीचे विचारपुष्प ८_ : 

 "भटकंती करताना तेव्हा ही वाट काटेकुटे आणि पानगळीने माखलेली होती. आता ती पाचूपर्ण पालवीने वाट सजलेली आहे. पर्वतरांगेतील त्या स्थानिक माणसाने तेव्हा चुकीची वाट दाखवून मला दुःख दिले होते. आता मात्र तो भाजीभाकरी, पाणी घेऊन योग्य वाट दाखविण्याकरीता माझ्यासाठी त्याच घाटमाथ्यावर ताटकळत उभा असतो.

 _कोणताही माणूस आणि कोणतीही वाट सतत सारखी राहू शकत नाही._ काळ-वेळ परिस्थितीनुसार ते बदलू शकतात. आणि म्हणून कधी दुःख तर कधी सुख देणारी बदलती माणसं, बदलत्या वाटा आनंदाने स्वीकारायला तुम्ही सतत तयार रहायला हवे."

🏞️⛺🪢🦚🕊️🕊️🕊️

सह्याद्रीचे विचारपुष्प ७

🌷सह्याद्रीचे विचारपुष्प ७ : 

गर्दीत, समूहात नसला तर कधीही घाबरु नकोस; गर्दी पुढे गेल्यानंतर मागे उरलेली असीम शांतता तुझ्या मालकीची आहे.

🏞️⛺🪢🦚🕊️🕊️🕊️

एक प्रभात आणि एक सांज



एक प्रभात आणि एक सांज 

पर्वतावर प्रभात झाली होती. ते काय आहे याचा शोध मी घेऊ लागलो. नाही ते धुकेच होते; पण वणवा पेटल्यानंतर धुराचे लोळ उठावेत आणि आसमंताला भिडावेत तसे ते दृश्य होते. शुभ्र बदकाची पिले आईमागे एका पाठोपाठ ओळीने रस्ता ओलांडतात जावीत त्यासारखा तो नजारा होता. धुक्याचा एक महाकाय गोळा घाटमाथ्यावरून थाटात दरीत उतरला. तीच धुक्यांची राणी असावी. त्यानंतर त्यामागोमाग तिचे अनेक पुंजके पिलांसमान दुडूदुडू धावत तो डोंगरमाथा ओलांडत आणि मग दरीत झेपावत होती. वाटले की याच धुक्याचा एक पुंजका असतो तर किती उधळलो असतो ना!

इकडे काही कृष्णमेघांनी सूर्यप्रकाश उगाच अडवून धरला होता. त्यामुळे गारवा वाढला व पर्वताने स्वतः आपली हिरवी चादर ओढली होती; पण ती अपूर्णच होती. काही केल्या त्याचे शरीर झाकले जात नव्हते. घाटमाथ्यावरच्या या धुक्यात आणि ऊन सावल्यांचा कधी मंद तर कधी वेगवान सरी अंगाखांद्यावर खेळवत मी माझा सारा दिवस उधळून टाकला.

आता सायंकाळ झाली होती.
पर्वत उतरताना एका झोपडीसमोर किती तरी वेळ रेंगाळलो. तेथे उदयाच्या सूर्य गोळ्यासमान एक दिवा लटकत होता. त्यामुळे तो अवघा परिसर स्वप्नातील महाल भासत होता. 

सह्याद्रीच्या कुटीत
आज सूर्य निजला होता
आहे आकाश साक्षीला
आज पर्वत लाजला होता

विलासात या सृष्टीच्या
शुभ्र धुके उधळते अंगणी
अवतरली ही बेधुंद सांज
हरवलीस कुठे सह्य साजणी 


त्या पर्वरांगांमध्ये आकाराला येणाऱ्या नवसृष्टीतील सत्य शोधायला पुन्हा येईन, असे ठरवून मी ती मदभरी सांज अनिच्छेने तेथेच सोडली; आणि उतराईच्या वाटेने चालू लागलो..!

- मनोज कापडे,
सह्याद्री पर्वतरांगा, पुणे,
तारीख २६ जून २०२३

पहिला मॉन्सून

🌷आज सह्याद्रीच्या कुशीत मॉन्सून आगमनाचा सोहळा पार पडला. कोकण पादाक्रांत करीत मॉन्सूनने घाटमाथ्यावर आरोहण केले.

 सुरुवातीला नैऋत्य दिशेला श्यामश्वेत मेघांनी गर्दी केली. पण, ते बरसत नव्हते. त्यानंतर रुसलेल्या मेघांची समजूत काढण्यासाठी एक शीतल पारदर्शक दुलई घेऊन वारा आला. तो मेघांना बरसण्यासाठी विनवू लागला. ती विनंती फळाला आली.

 आता पर्वतरांगेच्या मुखासमोर बरोबर मध्यभागी पठारी भागात मॉन्सूनच्या धारा बरसू लागल्या होत्या. डोंगर माथ्यावरून दिसणारा मॉन्सूनचा तो पहिला अभिषेक पाहून मी प्रसन्न झालो. नतमस्तक झालो. आनंदाच्या सह्य धारेत पहिल्या जलधारांसोबत चिंब बागडलो. 

ऐसी ही पवित्र भटकंती अमृत धारासंगे सफल जाहली..! 
🏞️⛺🦚🕊️🕊️🕊️