फुलपाखरांच्या प्रेमान न पडलेला माणूस सापडणार नाही. बालगोपाळांपासून
ते आजी-आजोबांना देखील फुलपाखरांकडे पाहून मिळणारा आनंद इतर कोणत्याही वस्तूमधून न
मिळणारा. आता फुलपाखरांना स्वतःची ओळख या महाराष्ट्रात मिळणार आहे.
ब्ल्यू मॉरमॉन
((Papilio polymnestor) जातीच्या
मोहक फुलपाखराने आता महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू म्हणून मान्यता मिळवली आहे.
राज्य सरकारने नुकताच तसा निर्णय घोषित करून उडत्या लावण्यावर एकप्रकारे सरकारी
मोहोर उमटली आहे.
मॉरमॉनचं रुप इतकं सुंदर आहे की तो उडता लहानसा मोर म्हणावा लागेल.
लांब पंखांवर आभाळाचा निळा रंग माखून फिरणारा मॉरमॉन पंखांच्या चोहू बाजूने काळाजर्द
असतो. अमावस्येच्या अंधाराचे थोडे काळे तुकडे आपल्या पंखाला चिकटवून बागडणारा
मॉरमॉन रंगीत फुलांवर बसतो तेव्हा एका अप्रतिम लावण्याचा अनोखा संगम होते. ते रूप
पाहून पाहून आपलं तन-मन आनंदानं भरभरून जातं.
मॉरमॉन तसा श्रीलंका आणि भारतात ब-याच ठिकाणी आढळतो. महाराष्ट्राच्या
पश्चिम घाटात आढळणारा मॉरमॉन तसा विदर्भ आणि पश्चिम महाराष्टातही दिसून येतो.
देशात फुलपाखरांच्या 1500 जाती आहेत. रोजच्या जीवनगाडयात आपण कधी
फुलपाखरांकडे लक्ष देत नाही. खरे तर फुलपाखरांचं आयुष्य 2-3 महिन्याचंच असतं.
माझ्या दृष्टीने फुलपाखरू हे मोहकता, लावण्य, अहिंसा आणि निसर्गाच्या सौंदर्याचं
एक उडतं रूप आहे. तूर्तास, राज्य सरकार आणि ब्ल्यू मॉरमॉन बटरफ्लाय या
दोघांनाही खूप खूप शुभेच्छा...!