Saturday, 5 August 2023

सह्य प्रदेशातील सखीचे हळवे रुप

🌷 _सह्य प्रदेशातील सखीचे हळवे रुप_ 

कात टाकलेल्या रुपवान नागणीसारखी अचानक ती समोर आली आणि मी दचकलो. पण, त्याचवेळी तीची भेट झाल्याचा आनंदही झाला होता. 

मी आनंदी आणि ती नाराज होती. काही बोलायचं सोडून तीने मात्र उद्वेगाने माझ्यावर प्रश्नांची सरबत्तीच केली, 

ती : “यात्रिका, हे तुझं वागणं किती विचित्र आहे. दरवेळी माझा जीव असा टांगणीला का लावतोय? आधुनिक वसाहतीत तुझी होणारी घुसमट इथल्या निसर्गात विरघळून टाकण्यासाठी तू जंगलात येतोस हे मान्य. पण, अरे या निसर्गाच्या गाभाऱ्यात फिरता फिरता सहज कोणत्याही भागाकडे जाणे तुला धोक्याचे का वाटत नाही..?"

मी : “आधी तू थोडे शांत होशील का? काही तासांपासून मी तुला शोधतो आहे. हवेत हलका पाऊस आणि मऊ गारवा आहे. पण, तुझ्या शोधात मी वेड्यासारखा फिरून घामाने चिंब झालो आहे. धुके आणि हिरवाईनं हा निसर्ग नटलेला असताना तू मात्र सापडत नव्हती. मी चिंतेत भटकत होतो. त्यामुळे मला या शीळेवर थोडा विसावा घेऊ दे. तुझ्या साऱ्या प्रश्नांना मी उत्तरे देईन.” पर्वत धारेतील सोंडेच्या एका गोलाकार छोट्या पठारावरील शीळेवर थकलेले शरीर सोडत मी उत्तरलो. 

माझ्याकडे दुर्लक्ष करीत ती म्हणाली : "यात्रिका, किती वेळा मी तुझी आर्जव केली. सह्याद्रीच्या कुशीत हजारो वाटा फसव्या आहेत. काही शापित, काही कातळ कड्यात नेणाऱ्या, काही अंधारबनात नेणाऱ्या. तू शोधत असलेल्या समाधान, शांतीच्या स्त्रोताकडे त्यातील अनेक वाटा जात नाहीत. त्या तुला भुलवतात आणि देतात फक्त यातना, दुःख. पण, तू निसर्गात बेधुंद होतोस. मी आणि त्यांच्यातला हाच फरक तू अनेकदा अचानक विसरतोस. मला सोडून फसव्या वाटांच्या सापळ्यात अडकतोस."

मी तीचं बोलणं श्वास रोखून ऐकत होतो. तीच्या रागात माया दडलेली होती. “तू मागे सालेरीला गेलास पश्चिमेला असलेल्या सालोटा दुर्गाला जाण्यासाठी मी उजवीकडे उभी असताना तू दुर्लक्ष केले आणि धुंदीत डावीकडे गेलास. पवित्र रायरीला जाताना बोराट्याच्या नाळेत तू रफी साहेबांची गाणी गात होतास. नाळेत कातळांच्या ठिकाणी मी नसल्याचे पाहून तुला यत्किंचितही भीती वाटली नाही. डावीकडे बालेकिल्ल्याच्या बाजूला तू माझा शोध घेतला नाहीस. उलट गाणं म्हणत समोर कोकणदिव्याच्या डोंगररांगाखालील जंगलात भटकत गेलास. जावळीच्या खोऱ्यात मला पवित्र मानतात आणि कोणीही माझ्याकडे दुर्लक्ष करीत नाही. तू मात्र फुलपाखरांच्या झुंडीमागे जंगलात निघून गेलास. तू भानावर ये. एरवी कधी तू त्या पाळंदे काकांचे, कधी उषाप्रभाताईंचे गोडवे गात असतो; पण त्यांच्यासारखा वागतो का? ती माणसंदेखील सह्यवेडी होती. पण, मला सोडून ती अशी स्वतःहून भरकटली नाहीत."

तीच्या या साऱ्या युक्तिवादाने मी अवाक् झालो. माझा थकवा पळून गेला आणि काय उत्तर द्यावे या विचारात मी पुन्हा गुंग झालो…!

(क्रमशः)

✒️मनोज कापडे, 
सह्याद्री पर्वतरांगा, पुणे.
९८८११३१०५९
🏞️🌞🦚🕊️🕊️🕊️